अमुक एका विद्यार्थ्यांने शाळेची फी भरली नाही म्हणून त्याला शाळेतून बाहेर काढ असे प्रकार अनेकदा घडले आहे. शाळेची फी पालकांकडून भरण्यास उशीर झाला की शिक्षा मुलांना मिळते. कित्येक पालकांनी तर फी वाढीविरोधात आंदोलने केल्याच्या घटनाही शहरात पाहायला मिळल्या आहेत. ‘फी भरणे परवडत नसेल तर मुलांना शाळेत पाठवू नका’ अशीही टोकाची धमकीवजा सूचना पालकांना मिळाल्या आहेत. पण छत्तीसगढची शाळा यापेक्षाही वेगळी आहे. पालकांनी शाळेची फी भरली नाही तरी चालेल पण त्या बदल्यात गावात झाडे नक्की लावा असे ही शाळा आवर्जून सांगते त्यामुळे शाळेने चालवलेला हा उपक्रम आदर्श उपक्रम ठरत आहे. शाळेच्या या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

VIDEO : जेव्हा जंगलाची राणी गावात येते

छत्तीसगढमधल्या बारगाई गावातील शिक्षा कुटीर शाळेने अनोखा उपक्रम राबवला आहे. ही शाळा पालकांकडून फी ऐवजी वृक्षारोपण करुन घेते.  पालकांनी फीच्या बदल्यात झाडे लावायची अशी अट या शाळेची आहे. त्यामुळे या शाळेत शिकणा-या कोणत्याही विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ही शाळा पैसे घेत नाही. या शाळेत ३ ते ४ वयोगटातील जवळपास ३४ मुले शिकतात. यातल्या एकाही विद्यार्थ्यांच्या पालकाकडून फी घेण्यात आली नसल्याचे शाळेतील एका शिक्षिकेने एएनआय या वृत्तवाहिनीला सांगितले. या फीच्या बदल्यात मात्र प्रत्येक पालकांसाठी वृक्षारोपण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर पालकांनी लावलेली झाडे मेली तर त्या जागी दुसरी झाडे लावणे पालकांसाठी अनिवार्य असणार आहे. शाळेच्या या उपक्रमाला गावक-यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गावकरी आपल्या मुलांना शाळेत पाठवून फीच्या बदल्यात वृक्षारोपण करत परतफेड करत आहे. हा उपक्रम सुरू झाल्यानंतर गेल्यावर्षभरात गावात जवळपास ७०० झाडे गावात लावण्यात आल्याचे समजते आहे.