नुकताच टॉलिवुड अभिनेता जगपति बाबूचा ‘पटेल सर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण, या चित्रपटाच्या चर्चेपेक्षाही त्याचं एका व्यक्तीने जे परीक्षण केलंय त्याचीच चर्चा सर्वात जास्त होत आहे. आता परीक्षण कसं केलंय हे जाणून घ्यायची तुम्हालाही उत्सुकता असेल. तर या पठ्ठ्यानं इंग्रजीत चित्रपटाचं परीक्षण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न इतका मजेशीर होता की याचा व्हिडिओ शेअर करण्यापासून या चित्रपटाचे निर्माते शिरिष कुंदर देखील स्वत:ला रोखू शकले नाही.

अनेकदा इंग्रजीविषयी आपल्या मनात न्यूनगंड असतो, तेव्हा कुठेही इंग्रजी बोलायचं झालं की आधी मनातल्या मनात काही जणांची वाक्यरचना करायला सुरूवात होते. त्याचंही तसंच झालं. त्याला कॅमेरासमोर या चित्रपटाविषयी काही मुद्दे मांडायचे होते. पण इंग्रजी वाक्यांची मनात रचना करून कॅमेरासमोर बोलेपर्यंत त्याची पुरती तारांबळ उडली. चित्रपटाची स्तुती करण्याच्या नादात त्याने दोन तीन चुकीचे शब्दही वापरले तेव्हा वाक्याचे अर्थही बदलले गेले. पण पठ्ठ्याने हार न मानता शेवटपर्यंत अगदी प्रामाणिक प्रयत्न केले.

याचा व्हिडिओ इतका व्हायरल होतोय की तो पाहून झाल्यानंतर ‘बिकॉज इंग्लिश इज अ फनी लँग्वेज’ हा अमिताभ बच्चन यांचा डायलॉग तुम्हाला आठवल्यावाचून राहवणार नाही.