आपल्याकडे कॉपीबहाद्दरांची काही कमी नाही. वर्षभर अभ्यास करण्यात अनेकांना रस नसतो. ऐन परीक्षेच्या काळात रट्टा मारला की झालं असं अनेकांचं गणित असतं. पण ऐनवेळी मारलेला रट्टा प्रश्नपत्रिका सोडवताना आठवणार थोडीच! अशा वेळी पास होण्याचा शेवटचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतो तो म्हणजे कॉपीचा. फार मेहनत न करता पास व्हायचं असेल तर अनेक विद्यार्थी कॉपी करण्याचा मार्ग स्वीकारतात. पूर्वी खिश्यातून चिठ्ठ्या दडवून नेल्या की काम व्हायचं. पण हल्ली कॉपी बहाद्दरांच्या सगळ्या ‘ट्रिक्स’ शिक्षकांना माहिती झाल्यात. तेव्हा परीक्षेच्या काळात कॉपी करणं बंद झालंय. पण काही विद्यार्थी शिक्षकांपेक्षा ‘हुश्शार’ असतात. ते कॉपी करण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही.

वाचा : भारतीय संघातल्या ‘या’ खेळाडूवर सारा टेलर होती फिदा

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात एका तरूणीने कॉपी करण्यासाठी भलतीच शक्कल लढवल्याचे स्पष्ट दिसते आहे. उत्तराच्या चिठ्ठ्या लिहून आणलं की आपण पकडलो जाणार हे तिला माहिती होतं. तेव्हा तिने अजब शक्कल लढवली. कागदाचे अगदी बारीक तुकडे केले आणि त्यावर लहान अक्षरांत तिने काही समीकरणं लिहिली आहेत. हे बारिक तुकडे तिने आपल्या वाढलेल्या नखांच्या आतल्या बाजूला चिकटवले. रेडिटवर एका यूजर्सने हा फोटो अपलोड केलाय. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परीक्षेत कॉपी करण्यापासून रोखणं हे शिक्षकांपुढे मोठं आव्हान आहे. चीनसारख्या देशात तर विद्यार्थांनी कॉपी करू नये यासाठी त्यांना परीक्षेच्या काळात एका मोठ्या हॉलमध्ये बसवलं जातं, एका उंच स्टेजवर उभे राहून शिक्षक या मुलांवर नजर ठेवतात. तर काही परीक्षा केंद्रांत विद्यार्थ्यांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन देखील असतात. याहून कहर म्हणजे काही ठिकाणी विद्यार्थांच्या डोक्यावर घोड्यासारखं झापडदेखील लावलं जातं.

वाचा : ट्रॅफिकला वैतागून तो थेट पोहतच ऑफिसला गेला