सोशल मीडियावर पराराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या चांगल्याच सक्रिय असतात. आतापर्यंत मदतीची याचना करणा-या एकालाही त्यांनी निराश केले नाही. ट्विटरवर मदतीची मागणी करताच स्वराज यांनी जमेल तशी मदत केली आहे. कालच त्या नियमित तपासणीसाठी एम्स रुग्णालयात दाखल झाल्या पण रुग्णालयात असताना त्यांनी एका परदेशी महिलेला व्हिसा मिळवून देण्यास मदत केली आहे. नेत्याने स्व:तापेक्षा लोकांच्या समस्यांना आधी प्राधान्य द्यायचे असते हे स्वराज यांनी दाखवून दिल्यामुळे सोशल मीडियावर देखील त्यांचे कौतुक होत आहे. इंडोनेशीयाची नागरिक असलेल्या शफिका बानो या महिलेने वैद्यकीय व्हिसासाठी स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. वैद्यकिय व्हिसा मिळण्यास तिला अडचणी येत होत्या. चैन्नईतल्या अपोलो रुग्णालयात शफिका बानो हिच्या पतीची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे. परंतु त्यांना व्हिसा मिळण्यासाठी अडचणी येत होत्या म्हणून तिने स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी केली. स्वराज यांनी देखील तिच्या मागणीला लगेच उत्तर देत तातडीने व्हिसा मिळेल अशी सोय केली आहे. शफिका ही मुळची पाकिस्तानी नागरिक आहे पण आपण इंडोनेशीयाचे नागरिकत्त्व स्वीकारले असल्याचेही तिने स्वराज यांना सांगितले. काही दिवसांपूर्वी स्वराज यांनी एका नवरदेवालाही मदत केली होती. या नवरदेवाची पत्नी पाकिस्तानी नागरिक असल्याने तिला व्हिसा मिळत नव्हता. नोव्हेंबर महिन्यात लग्न होणार असल्याने या नवरदेवाने स्वराज यांना मदतीसाठी साकडे घातले होते. त्याच्याही ट्विटची स्वराज यांनी तातडीने दखल घेतली होती.