आपल्या आजूबाजूला कितीतरी ब्रँडचे आउटलेट्स असतात. ज्यामध्ये आपण खरेदी करतो किंवा त्या ब्रँडच्या वस्तू वापरतो. कादाचित हे ब्रँड विदेशी असतील असे आपल्याला वाटते. पण, हे ब्रँड विदेशी नाही तर ते देशी ब्रँड आहेत. अशाच पाच विदेशी वाटणा-या पण भारतीय असलेल्या ब्रँडची आपण माहिती घेणार आहोत. जेणकरून तुम्ही जेव्हा कधी ब्रँडच्या वस्तू खरेदी कराल तेव्हा देशी ब्रँडच्या वस्तू खरेदी करण्याचा अभिमान तुम्हाला वाटेल.

सीसीडी : सीसीडी म्हणजे कॅफे कॉफी डे. तरुणांचे सगळ्यात आवडते ठिकाण. तिच्या किंवा त्याच्यासोबत बसून मनसोक्त गप्पा मारण्यासाठी तरुणांची सर्वाधिक पसंती सीसीडीला असते. सीसीडी ही कॅफेची साखळी भारतीय असून बंगरुळूमध्ये त्याचे मुख्यालय आहे. साधरण २० वर्षांपूर्वी वी. जी सिद्धार्थ यांनी हा कॅफे सुरु केला. अनेक शहरांत सीसीडीच्या शाखा आहेत. इतकेच नाही तर ऑस्ट्रेलिया, चेक प्रजासक्ताक, मलेशिया, इजिप्त या ठिकाणी सीसीडीच्या शाखा आहेत.
लॅक्मे : महिलांमध्ये प्रसिद्ध असलेला लॅक्मे हा कॉस्मेटिक ब्रँड भारतीय आहे. विशेष म्हणजे टाटा समूहाचा हा ब्रँड आहे. साधरण १९५२ मध्ये या हा ब्रँड स्थापन करण्यात आला. असे म्हणतात की जवाहर लाल नेहरू यांनी जेआरडी टाटा यांना सौंदर्यप्रसाधनांचे उत्पन्न भारतात घेण्याची विनंती केली होती. त्याकाळी विदेशी सौंदर्यप्रसाधनांनवर भारतीय महिला खूप खर्च करत होत्या त्यामुळे त्यांनी स्वदेशी सौंदर्यप्रसाधनांवर भर देत लॅक्मे ही कंपनी सुरू केली.

एमआरएफ टायर्स : एमआरएफ टायर्स ही देखील देशी कंपनी आहे. मद्रास टायर्स फॅक्टरी ‘एमआरएफ’ या नावाने ओळखली जाते. भारतातील टायर्स बनवणारी ही मोठी आणि नावाजलेली कंपनी आहे पण त्याचबरोबर परदेशातही मोठ्या प्रमाणात या कंपनीचे टायर्स निर्यात केले जातात. चेन्नई येथे या कंपनीचे मुख्यालय आहे.

रॉयल एनफील्ड बुलेट : तरुणांमध्ये रॉयल एनफील्ड बुलेट खूपच प्रसिद्ध आहे. चालवावी तर बुलेट असे अनेक तरुणांचे मत असते.  ही भारतीय कंपनी असून १९४८ पासून ती बुलेट बनवत आहे. चेन्नईत बुलेट बनवण्याचे काम चालते.
दा मिलानो हायडिझाईन : ब्रँडेड लेदर बॅगमधले हे आघाडीचे नाव आहे. ही इटालियन कंपनी आहे असे अनेकांना वाटत असले तरी ही मूळची भारतीय कंपनी आहे. दिल्लीमध्ये याचे मुख्यालय आहे. जगभरातील महिला वर्गामध्ये हा ब्रँड प्रसिद्ध आहे.