चमकदार पायांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या फोटोत एक संभ्रम असा आहे की तेल लावल्याने या पायाला चकाकी आली आहे की प्लॅस्टीक गुंडाळल्यामुळे हे पाय चमकत आहेत हे मात्र कळत नाही. त्यामुळे हे कोडे उलगडण्याची जणू स्पर्धाच सोशल मीडियावर सुरू आहे. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ‘ऑप्टीकल इल्यूशनचा’ हा प्रकार आहे. या प्रकारात कोणताही फोटो पाहिला की त्याबद्दल तर्क लावणे जरा कठीणच जाते. पाहताच क्षणी हे फोटो बघणा-याला संभ्रमात टाकतात. ट्विटरवर आणि इन्स्टाग्राम व्हायरल झालेल्या फोटो बाबातही तसेच काहीसे झाले आहे.

कोणाला हे पाय तेल लावल्यामुळे चकाकत असल्याचे वाटतात, तर कोणी पातळ प्लॅस्टिक पायाला गुंडाळल्यामुळे ही चकाकी आल्याचे सांगते, तर कोणी पायाला पांढरा रंग मारल्यामुळे हे पाय असे दिसत असल्याचा तर्क काढला. msbreeezyyy या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पहिल्यांदा हा फोटो शेअर करण्यात आला. सोशल मीडियावर याची खूपच चर्चा झाल्यानंतर या अकाऊंटवरून त्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. ब्रशने पांढ-या रंगाचे फटकारे पायावर ओढले आहेत पण ऑप्टिकल इल्यूशनमुळे मात्र ते बघणा-याला समजून येत नाही. काही दिवसांपूर्वी बॅगचा असाच एक फोटो व्हायरल झाला होता. ही बॅग सगळ्यांनाच पांढ-या रंगाची दिसत असली तरी तिचा मूळ रंग हा निळा होता. गेल्यावर्षी ऑप्टीकल इल्यूशन प्रकारात मोडणारा ड्रेसचा फोटो इंटरनेटवर चांगलाच प्रसिद्ध झाला होता. ड्रेसचा रंग निळा की काळा हेच कोणालाही ओळखता येत नव्हते.