भारत हा कृषिप्रधान देश आहे. पण दुर्दैव म्हणजे आजच्या पिढीने शेतीकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीड यासारख्या संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. मेहनत करूनही पिकांना योग्य भाव मिळत नाही. शिवाय कर्जाचा डोंगर उभा राहतो तो वेगळाच. म्हणून गावाकडे स्वत:ची शेती असूनही तिच्याकडे पाठ फिरवत अनेकजण छोटा मोठा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करताना दिसत आहे. पण हीच शेती एका गरीब शेतकऱ्याला सधन बनवू शकते याची कल्पना केली आहे का कधी? चला तर मग अशा रिक्षाचालकाला भेटूया ज्याने आपल्या रिक्षा चालवण्याचा व्यवसाय सोडला आणि शेती करण्याचा मार्ग स्वीकारला. एका स्वयंसेवी संस्थेकडून या शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन मिळाले. मग काय महिन्याला तुटपुंज्या कमाईवर घर चालवणारा हा शेतकरी बघता बघता लक्षाधीक्ष बनला. या शेतकऱ्याचे नाव आहे अमर सिंह.

अमर सिंह मुळचे राजस्थानमधल्या भरतपूर येथे राहणारे. घरची परिस्थिती बेताची. त्यांची गावात ५० एकर जमीन होती. पण घराच्या परिस्थितीमुळे ती जमीन त्यांना विकावी लागली. घर चालवायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर होताच. त्यांनी रिक्षा चालवण्याचा पर्याय निवडला. पण यातूनही फारशी कमाई होत नव्हती. एके दिवशी जाहिरात वाचून त्यांना शेती करण्याची कल्पना सुचली. हाती ७ एकर जमीन होती. या जमिनीत त्यांनी आवळ्याचे उत्पादन घ्यायला सुरूवात केली. कमी पैशात आणि कमी जागेत तेच उत्पादन त्यांना शक्य होते. पुढे एका स्वयंसेवी संस्थेचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. आवळ्याच्या पिकापासून त्यांनी मोरावळा बनवायला सुरूवात केली. आपले हे उत्पादन त्यांनी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने बाजारात विकले. यात त्यांना भरघोस फायदा मिळू लागला. कोणे एके काळी पोट भरण्यासाठी रिक्षा चालवणारे अमर सिंह आज याच आवळ्यामुळे वर्षाला २५ लाखांच्या आसपासची उलाढाल करतात.