इंग्रजीमध्ये एक सुंदर कविता आहे ‘डोन्ट क्वि्ट’ नावाची. ‘जेव्हा आयुष्य खूप संकटांनी भरलेलं असतं, अडचणीतून बाहेर निघण्याचा कोणताही मार्ग तुम्हाला सापडत नाही तेव्हा खचून जाऊ नका, थोडा वेळ विश्रांती जरूर घ्या पण हार मानू नका.’ असा त्या कवितेचा आशय होता. देवेंद्र दवेचंही आयुष्य या कवितेसारखंच आहे. आयुष्यात अनेक संकटं आली पण या संकटावर मात करून तो यशस्वी झालाच. कुरिअर बॉय, वेटरपासून ते बिझनेझ मॅनेजर होण्यापर्यंतची त्याची कहाणी परिस्थितीशी झगडणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

देवेंद्रच्या घरची परिस्थिती अगदीच वाईट होती. वडिलांना पोलिओ झाला होता. त्यातून कर्जाचा डोंगर अशा परिस्थितीत कुटुंबियांना देवेंद्रचाच आधार होता. देवेंद्रला शिकण्याची इच्छा होती पण परिस्थितीला ते मान्य नव्हतं. दहावीपर्यंत त्याने कसं बसं आपलं शिक्षण पूर्ण केलं. पण कॉलेजमधली फी काही परवडणारी नव्हती शिवाय घरची जबाबदारी अंगावर होतीच. तेव्हा एकीकडे कॉलेज तर दुसरीकडे छोटी मोठी कामं करत तो घरचा भार सांभाळत होता. कुठे कुरिअर बॉयची नोकरी, कुठे हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी करून तो कॉलेज आणि नोकरी असं दोन्ही सांभाळायचा. पण नोकरीच्या नादात आपल्याला कॉलेजमध्ये जाता येत नाही याचेही दु:ख त्याला सतावात होते.

त्याने CAT ची परीक्षा देण्याचे ठरवले. पण त्यातही तो तिनदा अपयशी ठरला. पुढे मुद्रा इन्स्टिट्यूटची प्रवेश परीक्षा तो यशस्वी झाला आणि इथेच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आता कुठे आपण चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ असं त्याला वाटतं होतं पण शिक्षणाचा खर्च मोठा होता. आधीच वडिलांनी कर्ज बुडवल्यामुळे कर्जही मिळत नव्हते. आता सारे काही संपले असे वाटत असताना त्याला एका व्यक्तीच्या मदतीने बँकेकडून शिक्षणासाठी कर्ज मिळाले. त्यानंतर घर आणि कॉलेज अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत त्याने शिक्षण घेतले. कॉलेजमधून देवेंद्रला चार लाख रुपयांची शिष्यवृत्तीही मिळाली. देवेंद्रने याच कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. ‘नॅशनल लेव्हल केस स्टडी कॉम्पिटिशन’मध्ये त्याला दुसरा क्रमांक मिळाला असून, यासाठी देवेंद्रला ५६ लाखांचे पॅकेज देखील मिळाले.