देशात आणि विदेशातही अनेक स्पर्धा होत असतात. यामध्ये हल्ली कुत्र्यांच्या हुशारीवरील स्पर्धाही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. यामध्ये आपल्या पाळीव कुत्र्याला योग्य ते ट्रेनिंग देऊन त्याला चांगल्यारितीने सजवून या स्पर्धेत सहभागी केले जाते. यामध्ये खरा कस असतो तो त्या कुत्र्यांच्या मालकांचाच. नुकतीच एक अनोखी स्पर्धा आयोजित कऱण्यात आली होती. कसली माहितीय? सर्वात अस्वच्छ आणि आळशी कुत्र्याची. यामध्ये सहभागी झालेल्या एका कुत्र्याने या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावत तब्बल १ लाख रुपयांचे बक्षीसही मिळवले आहे. या स्पर्धेचे हे २९ वे वर्ष होते.

या कुत्र्याचे नाव मार्था असून ती मेस्टीफ ब्रीड जातीची आहे. मार्था तीन वर्षांची असून ती कॅलिफोर्नियातील आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मार्थाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. तिच्या आळशीपणामुळे लोक तिला ओळखायला लागले होते. जेव्हा जेव्हा मार्थाला स्टेजवर बोलवले जात होते तेव्हा तेव्हा ती जमिनीवर डोके ठेऊन झोपत होती, त्यामुळे ती आळशी असल्याचे सिद्ध होत होते. तिची एकूण शरीररचना पाहता ती अतिशय कुरुप दिसत होती. तिचा मालक जिंडलर याच्या म्हणण्यानुसार, त्यानी मार्थाला एका अपघातातून वाचविले होते. त्यावेळी ती जवळपास दृष्टीहीन होण्याची शक्यता होती. मात्र अनेक शस्त्रक्रियांनंतर तिला दिसायला लागले.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य १३ कुत्र्यांमधून सरस ठरत मार्थाने हे बक्षिस मिळवले आहे. या बक्षिसामध्ये तिला जवळपास एक लाख रुपये आणि न्यूयॉर्कची ट्रीप भेट म्हणून मिळाली आहे.