सततचे नागरी युद्ध आणि तालिबान्यांची दहशत यामुळे आपला जीव वाचवून काही अफगाणिस्तानी नागरीक देश सोडून गेले. आजूबाजूच्या देशांत गेल्या कित्येक वर्षांत ते निर्वासित म्हणूनच राहत आहेत. इतरांच्या दृष्टीने ते निर्वासित असले तरी त्यांनी आश्रयदात्या देशाला आपले घर मानून तिथेच संसार थाटले. त्यामुळे तिथल्या निर्वासितांच्या छावणीत रमलेल्यांना जर त्या देशांने काही दिवसांतच मायदेशी परतायला सांगितले तर…? असाच प्रसंग एका मुलावर ओढवला आहे. त्याची ही काहाणी फेसबुकवर फिरते आहे. या पोस्ट निमित्ताने निर्वासितांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधले गेले आहे.
पाकिस्तानातल्या पेशावर येथल्या शाळेत अफगाणिस्तानमधून आलेला निर्वासित मुलगा शिकत आहे. गेल्या दशकभराहूनही अधिक काळ त्याचे कुटुंब या ठिकाणी राहते. पण पाकिस्तानने या निर्वासितांना ३१ मार्च २०१७ पर्यंत अफगाणिस्तानमध्ये परतण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या मुलाला नाईलाजाने शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला घ्यावा लागला. हा मुलगा नववीत शिकत आहे. शाळेचा दाखला मिळाल्यानंतर आता काही दिवसांतच तो अफगाणिस्तानमध्ये परतणार आहे. तिथे गेल्यावर शिक्षणाला मुकावे लागणार हे या मुलाला चांगलेच ठावूक आहे त्यामुळे त्याला रडू अनावर झाले. उज्वल भविष्याची आशा घेऊन तो आला होता मात्र त्याचे स्वप्न पूर्ण भंगले. जिथे शिक्षणाची सोडाच पण सुरक्षेचीही हमी नाही अशा देशात पुन्हा जायला त्याचे मन मानत नाही. ‘पाकिस्तान फेसबुकने’ त्याची ही काहाणी समोर आणली आहे. अफगाणिस्तानमध्ये परतल्यावर त्याचे काहीच भविष्य उरणार नाही. जगण्याची त्याची धडपड सुरू होईल त्यामुळे त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करण्याचे आवाहन या पोस्ट मार्फत केले आहे.