‘शादी का लड्डू जो खाये पछताये जो ना खाये वो भी पछताये’ असं हिंदीत अनेकदा म्हणतात, आता लग्न करूनही पश्चाताप होतो आणि न करूनही पश्चाताप. तेव्हा लग्न केलेलंच बरं असं म्हणत गुजरातच्या एका व्यावसायिकाने लग्न केलं  खरं. पण वर्षभरातच लग्नामुळे तो असा काही त्रस्त झाला की त्याच्या लग्नाची गोष्ट  थेट घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचली. आता कोणत्याही लग्नात गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली म्हणजे त्या नात्याचा शेवट कटू वादविवादानेच होणार हे नक्की. त्यातून वर्षभरात लग्न मोडलं त्यामुळे घरच्यांना टेन्शन येणार ते वेगळं. पण या नवऱ्याने मात्र घटस्फोटानंतर असं काही केलं ज्याने सध्या तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

‘झाला घटस्फोट आणि सुटला एकदाचा पिच्छा बायकोपासून’ असं त्याला झालं होतं. घटस्फोटाचा त्याला एवढा आनंद झाला की आजूबाजूचे शेजारीपाजारी, मित्र परिवार, नातेवाईक यांना मिठाई वाटण्याचा सपाटाच त्याने लावला. आकर्षक बॉक्समध्ये पॅक केलेलेली जवळपास ५० किलो मिठाई त्याने घटस्फोटाच्या आनंदात मित्रपरिवार आणि शेजाऱ्यांना वाटली असल्याचे वृत्त ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिले आहे. वरून या आकर्षक मिठाईच्या बॉक्सवर घटस्फोट झाल्याच्या आनंदात मिठाई वाटत असल्याचे त्याने लिहिले होते. गुजरातच्या रिकेंश या व्यावसायिकाने हा प्रकार केला आहे.

लग्न झाल्यापासून आपली पत्नी कुटुंबियांपासून वेगळं होण्यास सांगत होती. पण मला ते मान्य नव्हते. यावरून आमचे सतत वाद व्हायचे. शेवटी वर्षभरानंतर आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असेही रिंकेशने सांगितले. याच आनंदातून त्याने जवळच्या व्यक्तींना मिठाई वाटली. हल्ली ब्रेकअप वगैरे झाले की ब्रेकअप पार्टी करण्याची तरूणाईमध्ये पद्धत आहे, तेव्हा यात काही नवीन नाही. पण घटस्फोटाच्या आनंदात गावभर मिठाई वाटण्याचा प्रकार नेटिझन्सने यापूर्वी कधी पाहिला नसेल हे नक्की. थोडक्यात काय जग बदलत चाललंय, येथे कधी काय होईल आणि कोणाला काय सुचेल हे सांगता येत नाही.