प्रवास करताना कुठल्याही रेल्वे स्टेशनवर पाण्याची बाटली घ्यायची झालीच तर तिच्यासाठी दोन एक रुपये आपल्याला जास्तच मोजावे लागायचे. अर्थात आता ही गोष्ट बंद झालीय पण पाण्यासाठी मूळ किंमतीपेक्षाही जास्त पैसे मोजण्याचा वाईट अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल. या जगात प्रत्येक जण नफा कमवण्याचा विचार करतो तेव्हा लोकांचा विचार कोण करेल? पण काही लोक याला अपवाद असतात. पैशांपेक्षाही त्यांना माणुसकी महत्त्वाची वाटते. एखादी वस्तू विकून त्यातून नफा कमावण्यापेक्षा लोकांचे आशीर्वाद, पुण्य कमावण्यातच त्यांचा आनंद दडलेला असतो.

सध्या फेसबुकवर व्हायरल होत असलेला फोटो हेच तर सांगतो. रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशाला मोफत पाणी वाटण्याचे पुण्यकर्म हे गृहस्थ करतात. फेसबुकवर राघव गाखर यांनी एक सुंदर पोस्ट शेअर केलीये. मध्य प्रदेशमधल्या एका रेल्वे स्थानकावरचा हा फोटो आहे. या फोटोबरोबर राघव यांनी एक प्रसंगही लिहिला आहे. सध्या मध्य प्रदेशमधले तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षाही जास्त आहे. प्रत्येक प्रवासी स्टेशनवर पाणी विक्रेता किंवा पाणपोई दिसली की आपली तहान भागवण्यासाठी तिथे तुटून पडतात. अर्थात इथे जास्तीचे पैसे आकारण्याचे प्रकार होतच असतात यात शंका नाही. पण फोटोमधले गृहस्थ या सगळ्यापेक्षाही वेगळे होते. स्टेशनवर असलेल्या प्रवाशांना ते मोफत थंड पाणी देत होते. स्थानकावर ट्रेन थांबली की ते पाणी घेऊन धावत यायचे. शक्य असेल तितक्या प्रवाशांना ते आपल्या जवळचं थंड पाणी देतात आणि याबदल्यात एकही रुपया ते प्रवाशांकडून घेत नाहीत. आजच्या जगात जो तो पैनपै जमवण्यासाठी झटतो. अशा जगात पुण्य कमावण्यासाठी झटणारे फारच कमी भेटतात नाही का!