आपण अनेकदा ऑफिसला जाण्यासाठी रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्सीने प्रवास करतो. अनेकांकडे स्वत:ची गाडी देखील असते. हा प्रवास कधीकधी अधिक आरामदायी व्हावा यासाठी काहीजण एसी टॅक्सीनेही येतात. अर्थात त्यासाठी खिशाला मोठी कात्री लागते ते वेगळं. काहीवेळा ऑफिसच्या कामासाठी विमानाने येणं-जाणंही होतं. पण रोज काही कोण ऑफिसला विमानाने येत जात नसणार हे नक्की. पण अमेरिकेत राहणारा एक माणूस असा आहे जो रोज ऑफिसला विमानाने ये-जा करतो. कर्ट असं त्यांचं नाव आहे. व्यवसायाने तो मेकॅनिकल इंजिनिअर आहे. सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये त्याची स्वत:ची टेक कंपनी आहे.

वाचा : ‘बिक गई है गॉरमिंट’ म्हणणाऱ्या त्या महिलेचं जगणं केलं मुश्किल

तो लॉस एन्जलिसला राहतो. सकाळी साडेआठ नऊच्या सुमारास कर्टला ऑफिसला पोहोचायचं असतं. तेव्हा पहाटे पाच वाजता त्याच्या दिवसाची सुरुवात होते. सकाळी उठून तयारी केल्यानंतर वीस मिनिटांचा प्रवास करून कर्ट विमानतळावर पोहोचतो, त्यानंतर काही मिनिटांत विमान सॅन फ्रॅन्सिस्कोला रवाना होतं. ९० मिनिटे प्रवास करून साडेसातच्या सुमारास तो ऑकलंड एअरपोर्टवर पोहोचतो. तिथे कर्टने आपल्यासाठी आणखी एका गाडीची सोय केलेलीच आहे. तेव्हा तिथून पुन्हा अर्ध्या तासाचा प्रवास करून कर्ट एकदाचा ऑफिसला पोहोचतो. पहाटे पाच वाजता त्याचा जो प्रवास सुरू होतो तो रात्री ११ वाजता संपतो. आठवड्यातले पाच दिवस कर्ट विमानानेच ऑफिसला ये जा करतो. कर्ट जेव्हा आपल्या विमान प्रवासाबद्दल लोकांना सांगतो तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आता एवढा प्रवास करायचं म्हणजे हा माणूस किती पैसे प्रवासावर खर्च करत असणार याचं तुम्हालाही कुतूहल असेल. तर महिन्याला कर्ट आपल्या विमान प्रवासावर दीड लाख रुपये खर्च करतात. आता कर्टची एवढी मोठी कंपनी आहेच तेव्हा प्रवासावर महिन्याला एवढी रक्कम खर्च करणं त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट नसेल हे नक्की!