भारतीय संस्कृतीने जगाला भूतदया शिकवली. मुक्या जनावरांवर प्रेम करायला शिका अशी आपली संस्कृती सांगते पण दुसरीकडे मात्र काही लोक हीच मुल्ये पायदळी तुडवताना दिसतात. गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांना अमानूषपणे मारले गेल्याच्या घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. अशातच अमानूषतेचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुत्र्याने गाडीच्या चाकावर लघुशंका केली म्हणून मुंबईतील वसईत राहणा-या एका व्यक्तीने झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर गाडी चढवली. यात कुत्रा गंभीर जखमी झाला आहे.

‘Feed a Stray. Everyday’ नावाच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकण्यात आली. बाला मानी या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट टाकण्यात आली असून यात व्हिडिओ देखील जोडला आहे. वसई भागातील हा व्हिडिओ असून कुत्र्याने गाडीच्या चाकावर  लघुशंका केली म्हणून सौरभ दुखंडे नावाच्या व्यक्तीने  त्याच्या अंगावर गाडी चढवली. त्यामुळे जोपर्यंत त्याला अमानुष कृत्याबद्दल शिक्षा होत नाही तोपर्यंत ही पोस्ट शक्य असेल तितक्या लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्धात एफआयआर नोंदवली आहे. पण त्याला या गुन्ह्यासाठी लगेचच बेल देखील मिळू शकतो. काही महिन्यांपूर्वी दोन विद्यार्थ्यांनी कुत्र्याला छतावरून खाली फेकून दिले होते. त्यानंतर त्याचा व्हिडिओही इंटरनेटवर टाकला होता. तर गेल्याच महिन्यात भटक्या कुत्र्यांवर कोणताही इजाल सरकारकडून होत नसल्याने केरळ काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी पाच कुत्र्यांना मारून त्यांना काठीला उलटे टांगले होते. त्यानंतर कुत्र्यांचे मढे खांद्यावर घेऊन त्यांनी निषेध केला होता. या घटनेमुळे प्राणीप्रेमी संघटना नाराज झाल्या होत्या.

वसईतल्या या घटनेनंतर पुन्हा एकदा प्राण्यांवरील हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहे. या कुत्र्याच्या अंगावरुन गाडी गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे तसेच त्याची वाचण्याची शक्यताही कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.