दोन दिवसांपूर्वी विराट कोहली आणि शिखर धवनने शेअर केलेल्या एका लहान मुलीच्या व्हिडिओनं सोशल मीडियावर खूपच खळबळ माजवली होती. आपल्या मुलीला अभ्यासातलं काहीच लक्षात राहत नाही म्हणून आई चिमुकलीशी खूपच कडकपणे वागत होती. आईचा जाच मुलीच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. त्यातून सुटका व्हावी यासाठी ती मुलगी गयावया करत होती. कहर म्हणजे आईनं मुलीला मारतानाचा व्हिडिओ देखील काढला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला.

पालक म्हणून आपल्या मुलांशी कधी नरमाईनं किंवा कडकपणे वागणं गरजेचं आहे. पण हा कडकपणा कधी आणि केव्हा असावा यासाठीही प्रत्येक पालकानं दक्ष असलं पाहिजं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या छोट्या मुलींच्या पालकांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. या मुलीचा आणि व्हिडिओ तयार करणाऱ्या तिच्या आईचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी गायक आणि संगीत दिग्दर्शक दुओ तोशी duo toshi आणि शरीब शबरी sharib shabari यांची भाची आहे. ती तीन वर्षांची असून, तिचं नाव हया आहे. ‘हा व्हिडिओ तिच्या आईनं व्हॉट्सअॅपच्या फॅमिली ग्रुपवर शेअर करण्यासाठी तयार केला होता. हया खूपच हट्टी आहे, तिला खेळायला जायचं होतं, पण आई पाठवत नव्हती म्हणून ती रडत होती. आम्ही हयाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो ती आमच्या सगळ्यांची खूप लाडकी आहे. पण अभ्यास करण्यासाठी तिच्या खूप मागे लागावं लागतं. खेळामुळे ती अनेकदा अभ्यासाकडे दुर्लक्ष करते. ओरडा मिळाला की ती रडते पण लगेच पुढच्याक्षणी ती खेळायला बाहेर पडते’ असंही ते म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी क्रिकेटपटू शिखर धवन आणि रॉबिन उथप्पा यांनीही हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत, पालकांनी मुलांचा अभ्यास घेताना थोडा संयम दाखवण्याचं आवाहन केलं होतं. विराट कोहलीनंही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला होता. युवराज सिंगनं देखील हा व्हिडिओ शेअर करून नाराजी व्यक्त केली होती. मुलांचं संगोपन करण्याची ही पद्धत नाही, असं म्हणत युवीनं आपला राग व्यक्त केला होता.