दिल्लीत बवाना येथील जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे नेते इमरान हुसैन चांगलेच वादात सापडले आहेत. हुसैन यांच्या नावानं लावण्यात आलेलं पत्रक मोठ्या प्रमाणत व्हायरल झालं आहे. या पत्रकात मुस्लिम मतदारांनी एकत्र येऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकामुळे हुसैन यांच्या अडचणीत वाढ झाली.

२३ ऑगस्टला होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी समस्त मुस्लिम समुदायानं एक होऊन मतदान करावं. मुस्लिम समाजाची मतं विभागली गेली तर त्याचे परिणाम अनेकदा वाईट झाल्याचे समोर आलेत. मतं विभागल्यानं उत्तर प्रदेशमध्ये सत्तापालट झालाय, अशा अनेक उदाहरणांची आठवण त्यांनी या पत्रकामध्ये करून दिलीये. दिल्लीवर मुस्लिम राज्यकर्त्यांची सत्ता होती. इथला लाल किल्ला, कुतुबमिनार हे सगळं आपल्याच पूर्वजांची देण आहे. या तख्ताची चावी आपल्याकडेच आहे. पण आता मुस्लिम बांधवानं फक्त एकत्र येऊन मतदान करण्याची गरज आहे. शत्रूनं चहूबाजूनं आपल्याला वेढलंय. तेव्हा हिच योग्य वेळ असल्यानं सगळ्यांनी मतदान करा नाहीतर शत्रूच्या हातातल्या खेळण्यासारखी आपली अवस्था होईल, असंही या पत्रकात लिहिण्यात आलंय. या पत्रकाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर हुसैन आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर मोठ्या प्रमाणत टीका करण्यात आली.

या पत्रकावर हुसैन आणि अरविंद केजरीवाल यांचे फोटो आहेत. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. पण आपण अशाप्रकारची पत्रकं छापली नाहीत किंवा असं कोणतंही आवाहन पत्रकाद्वारे केलं नसल्याचं हुसैन याचं म्हणणं आहे. केवळ बदनामी करण्यासाठी आणि अडचणीत आणण्यासाठी लोकांनी ही खोटी पत्रकं छापली असल्यांच हुसैन यांनी सांगितलं. तसेच याची रितसर तक्रारही आपण केली असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.