नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्या मातोश्रीदेखील चर्चेचा विषय ठरल्या आहेत. मोदींच्या आईच्या प्रत्येक कृतीवर नेटिझन्सचे लक्ष असते. सध्या सोशल मीडियावर नरेंद्र मोदींच्या आईच्या नावाने व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हि़डिओत त्या नृत्य करताना दिसत आहे. मात्र या व्हिडीओचे सत्य अखेर समोर आले आहे.

पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा व्हिडिओ शेअर केला. हिराबेन आपल्या घरात पारंपरिक गुजराती लोकगीतवर नृत्य करत आहेत असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होते. खुद्द किरण बेदींनीच हे ट्विट केल्याने हा व्हिडिओ व्हायरल झाला. अनेकांनी हा व्हिडिओ रिट्वीटही केला. मात्र या व्हिडिओतील महिला मोदींच्या आई नसल्याचे काही सुजाण नेटिझन्सनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले आणि किरण बेदींची नाचक्की झाली. शेवटी किरण बेदींनी स्वतःची चूक मान्य केली. ‘ही महिला कोणीही असली तरी त्यांचा उत्साह मात्र कमालीचा आहे. मी जेव्हा वृद्ध होईल तेव्हा माझाही उत्साह असाच कायम राहिलं अशी मी आशा करते’ असं म्हणत त्यांनी सारवासारव केली.

व्हिडिओमधील महिला हिराबेन नसल्याचे एका युजरने निदर्शनास आणून दिले. हा व्हिडिओ युट्यूबवरदेखील खूप आधीपासून उपलब्ध आहे, तसेच व्हिडिओतील महिला ही हिराबेन यांच्यासारखी दिसत नाही हेदेखील दाखवून दिल्यानंतर बेदींनी आपली चूक सुधारून घेतली.