गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर आसाममधील एका शाळेमधल्या ध्वजारोहणाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोनं सगळ्यांची मनं जिंकली, ‘हीच खरी देशभक्ती आहे’ यांसारख्या लाखो प्रतिक्रिया या फोटोवर आल्या. खरं तर राज्याला पुराच्या पाण्यानं वेढलंय. लोक बेघर झालेत, राहायला जागा नाही, खायला अन्न नाही; तरीही ही मुलं स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यासाठी शाळेत पोहोचली होती. अशा बिकट परिस्थितीतही या मुलांनी ध्वजारोहण करून देशभक्ती दाखवून दिली. म्हणूनच या शाळेतले शिक्षक, विद्यार्थी सगळेच कौतुकास पात्र ठरले. पण या व्हायरल फोटोमागचं सत्य माहिती आहे का?

वाचा : अबब!…ओबामांच्या ‘त्या’ ट्विटला 2901479 ‘लाईक्स’, 1180967 ‘रिट्विट’

Video : असा दुर्मिळ योग पुन्हा कधीही जुळून येणार नाही!

हा आसाममधल्या धुबरी येथील नशकारा प्राथमिक शाळेतला फोटो आहे. या शाळेत सहायक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या मिझानूर रेहमान यांनी हा फोटो फेसबुकवर पोस्ट केला. या फोटोनं फक्त देशातल्या माध्यमांचे नाही; तर आंतरराष्ट्रीय माध्यमांचंही लक्ष वेधून घेतलं. पण यामागंच सत्य काही वेगळंच होतं. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या नियमानुसार सरकारी शाळेत कोणाताही कार्यक्रम झाला असेल तर त्याचा पुरावा म्हणून एक फोटो शिक्षण विभागाकडे पाठवावा लागतो. नियमाप्रमाणे शाळेत झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाचे फोटो गुवाहटीच्या शिक्षण विभागाकडे पाठवणं अनिवार्य होते. त्यासाठी या कार्यक्रमाचे फोटो काढण्यात आले. शाळेत ध्वजारोहणासाठी दहा ते पंधरा विद्यार्थी आले होते. शाळेच्या मैदानात पुरामुळे गुडघाभर पाणी साचलं होतं. इतर विद्यार्थी हे सुरक्षित ठिकाणी उभे होते. पोहता येणाऱ्या दोन मुलांना ध्वजारोहणासाठी पुढे बोलावण्यात आलं. रेहमान यांनी पोस्ट केलेला हा फोटो एक लाखांहून अधिक यूजरने शेअर केला आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर रेहमान यांनी सगळ्यांचे आभार मानले. आपला देश महान आहे. पूरग्रस्त परिस्थितीतही देशाबद्दलची देशभक्ती दाखवण्यात आम्ही यशस्वी झालो, असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.