बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांवर तुटून पडलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्याला पाकिस्तानी कलाकारांची गरजच का पडते, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ‘आपल्या देशात कलाकार नाहीत का ? आपल्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी पाकिस्तानी कलाकारांची आवश्यकताच काय ?’, असे प्रश्न राज ठाकरे यांनी विचारले आहेत. पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेणाऱ्या सलमान खानलाही राज ठाकरेंनी रडारवर घेतले आहे. ‘तुम्हाला इतका त्रास होत असेल, तर आम्ही तुमच्या चित्रपटांवरही बंदी घालू’, अशी टीका राज ठाकरेंकडून करण्यात आली आहे.

राज ठाकरेंनी सलमान खानच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘सीमेवर आपले जवान आपल्यासाठी लढत आहेत. जर त्यांनी शस्त्रे खाली ठेवली तर शत्रूंशी कोण लढणार ? सीमेचे रक्षण कोण करणार ? सलमान खान ?’, अशी टीका राज ठाकरेंनी केली. पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी चुकीची असल्याचे वक्तव्य सलमानने केले होते.

‘आपल्या देशात कलाकारांची कमतरता आहे का ? पाकस्तानी कलाकारांची गरजच काय ?’, या राज ठाकरेंच्या प्रश्नावर ट्विटरकरांनी टिकेची झोड उठवली आहे. काही ट्विटरकरांनी राज ठाकरे यांचे पाकिस्तानच्या माजी खेळाडूंसोबतची छायाचित्रे पोस्ट करत ‘भारतात क्रिकेटपटूंची कमतरता आहे का ? आपल्याला छायाचित्रे काढण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंची आवश्यकता का भासते ?’, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

एका ट्विटर वापरकर्त्याने राज ठाकरेंचे पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम सोबतचे छायाचित्र शेअर करत ‘स्वत: सेलिब्रिटींना बिरयानी खाऊ घालतात आणि जनतेला देशभक्ती शिकवतात’, अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेच्या चित्रपट विभागाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकारांना पाकिस्तानात निघून जाण्याचा इशारा दिला होता. मायदेशात परतण्यासाठी मनसेने पाकिस्तानी कलाकारांना ४८ तासांची मुदत दिली होती. मात्र आता पाकिस्तानी कलाकारांविरोधात भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंना ट्विटरकरांनी त्यांच्या पाकिस्तानविरोधी भूमिकेवरुन रडारवर घेतले आहे.

tweet