जगातील सर्वात अवघड वाट त्याने चक्क सायकलवर पूर्ण केली आहे, तीही अगदी कमी वेळात. विशेष म्हणजे हा तरुण आहे महाराष्ट्राचा. नाशिकच्या श्रीनिवास गोकुळनाथ याने जगातील सर्वात अवघड सायकल रॅली पूर्ण करत देशाचे आणि विशेषतः महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. सोलो विभागात ११ दिवस १८ तास ४५ मिनीटे प्रवास करत गोकुळनाथने अनोखा इतिहास रचला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ‘रेस अॅक्रॉस अमेरिका’ या स्पर्धेत अशाप्रकारे कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. यामध्ये ४९०० किलोमीटरचा प्रवास त्याने यशस्वीपणे पार केला आहे. याबरोबरच नागपूरमधील डॉ. अमित समर्थ यानेही अतिशय उत्तम कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव रोशन केले आहे.

ही रॅली पूर्ण करणाऱ्या ९ जणांमध्ये गोकुळनाथ सातव्या क्रमांकावर तर समर्थ आठव्या क्रमांकावर आहे. समर्थ याने ५ हजार किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. ही रेस ख्रिस्तोफ स्ट्रेसर याने पहिला क्रमांक पटकावत जिंकली आहे. सह्याद्री सायकलिस्ट या ग्रुपमधील ४ जणांच्या टीमने ही स्पर्धा ८ दिवस १० तासांत पूर्ण केली आहे. दिलेल्या वेळेत ही रेस पूर्ण करण्यासाठी दररोज जवळपास ४०० किलोमीटर सायकल चालवावी लागते. यामध्ये दिवसातील काही तासच विश्रांतीसाठी मिळतात. त्यामुळे अनेक आव्हानांशी सामना करत हे रायडर्स स्पर्धेत यश मिळवतात.

मागील तीस वर्षात केवळ तीन भारतीयांनी या स्पर्धेतील सोलो प्रकारात भाग घेतला असून त्यातील एकानेही ही स्पर्धा शेवटपर्यंत पूर्ण केलेली नाही. या स्पर्धेविषयी गोकुळनाथ म्हणाला, मी या स्पर्धेच्या सुरुवातीपासून अनेक भावनिक आंदोलने अनुभवली. मात्र कठोर प्रयत्नांना पर्याय नव्हता. त्यामुळे माझ्या प्रयत्नांचे फळ मिळाले असल्याचा आनंद झाला आहे. याआधी समिम रिजवी आणि अलिबागच्या सुमित पाटील यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असून जवळपास २० लाख रुपयांची अर्थिक तरतूदही गरजेची असते.
भारतातही अशाप्रकारच्या स्थानिक स्तरावरील स्पर्धांची आवश्कता असल्याचे मत सतीश पत्की यांनी व्यक्त केले. यावेळी जिंकलेल्या स्पर्धकांचेही त्यांनी अभिनंदन केले. एका दशकापूर्वी पत्की यांनी सायकलिंगच्या उपक्रमाला चालना दिली होती.