अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेले वर्षभर हैदोस घातलाय. सत्तेची सूत्रं हातात घेतल्यावरही त्यांनी बेछूट वक्तव्य करणं सोडलं नाहीये. अध्यक्षपद हाती आल्यावर त्यांनी पत्रकारांना ‘सर्वात अप्रामाणिक माणसं’ असं संबोधून नवा वाद ओढवून घेतल. त्यांचा शपथविधी होत असतानाही अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये, खुद्द वाॅशिंग्टनमध्ये हजारोंचे मोर्चे निघाले होते. या सगळ्या अमेरिकनांचा ट्रम्प अध्यक्ष होण्याला जबरदस्त विरोध होता. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आॅनलाईन लोकप्रियतेवरही होत अमेरिकन अध्यक्षांचं अधिकृत ट्विटर अकाऊंट बराक ओबामांनी सोडल्यावर आणि या अकाऊंटचा ताबा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आल्यावर या अकाऊंटच्या जगभरातल्या अनेक फाॅलोवर्सनी फाॅलो करणं सोडून दिलं.

पण काही केल्या आपलं ट्विटर अकाऊंट ट्रम्पना फाॅलो करणं सोडतच नाहीये हे लक्षात आल्यावर हे नेटिझन्स गोंधळले.

ट्रम्प अध्यक्ष झाल्यामुळे अमेरिकन तसंच जागतिक राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचं मानलं जातं. आजवर लोकशाही मूल्यं, वृत्तपत्र स्वातंत्र्य तसंच सर्वसमावेशकता यांचा आपल्यापुरता का होईना पुरस्कार करणारी अमेरिका ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली आणखीनच संकुचित होते आहे की काय असं विचारण्याजोगी परिस्थिती निर्माण व्हायला लागलीये.

त्याचंच एक स्वरूप म्हणून ट्विटर आता नव्या अध्यक्षांना सक्तीने फाॅलो करायला लावणार की काय अशी शंका ट्रम्पविरोधकांच्या मनात येत त्यांचा राग आणखीच वाढला. पण ही ट्विटरकडून झालेली एक चूक असल्याचं उघड झालं.

अमेरिकेचे पहिले सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या बराक ओबामांचं जुनं ट्विटर अकाऊंट ‘पोटस ४४’ या नावाने ट्विटरवरच आर्काईव्ह होणार आहे.

पोटस ४४ (POTUS 44) म्हणजेच ‘प्रेसिडेंट आॅफ द युनायटेड स्टेट्स’चा शाॅर्ट फाॅर्म. त्यातला ४४हा आकडा बराक ओबामा अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष असल्याचं दर्शवतो. अमेरिकन अध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर हँडलचं नाव आहे @POTUS बराक ओबामा पायउतार झाल्यावर या अधिकृत हँडलवरनं @POTUS 44 कडे जाणं यूझर्सना सोपं व्हावं यासाठी ट्विटरने त्यांच्या प्रोग्रॅममध्ये काही बदल केले होते. पण या बदलांदरम्यान काही ‘बग’ निर्माण होत डोनाल्ड ट्रम्पना ‘अनफाॅलो’ करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्विटर यूझर्सचा ‘पिच्छा’ डोनाल्ड ट्रम्प सोडायला तयार नव्हते. या सगळ्या प्रकाराबाबत ट्विटरच्या सीईओंनी माफी मागितली आहे.