पिळदार शरीर कमावण्यासाठी कोण कधी काय करेल सांगता येत नाही. कोणाला व्यायामाची आवड असते म्हणून, कोणी आपले व्यक्तीमत्त्व तयार करण्यासाठी तर कोणी मुलींना इंप्रेस करण्यासाठी बॉडी बनवत असतो. ब्रेडली मार्टिन या २८ वर्षीय तरुणाचे बॉडी बनवत असतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याला अमेरिकेतील सोशल मीडियाचा स्टार, फिजिक कॉम्पिटिटर आणि फिटनेस गुरु म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. कोण आहे हा ब्रेडली आणि कशामुळे तो इतका प्रसिद्ध झाला जाणून घेऊया…

ब्रेडली आपल्या फिटनेस आणि बॉडीसाठी प्रसिद्ध असून त्याचा स्वतःचा एक व्हिडिओ चॅनेलही आहे. आपले फॉलोअर्सही आपल्यासारखेच फिट आणि हेल्दी रहावेत यासाठी सोशल मीडिया अकाऊंटवरुन तो फिटनेस आणि डाएट याविषयीची माहिती शेअर करतो. ब्रेडलीने वयाच्या १५ व्या वर्षांपासून जीमला जायला सुरुवात केली. काही वर्षांतच त्याला योग्य ते प्रशिक्षण आणि आहार याबाबात माहिती मिळाली. त्यानंतर २००६ मध्ये त्याने आपला स्वतःचाच ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरु केला. २०१४ मध्ये त्याला खरी ओळख मिळाली आणि तो फिटनेस गुरु म्हणून ओळखला जाऊ लागला.

याच वर्षी ब्रेडली याने आपला फिटनेस व्हिडिओ चॅनेल सुरु केला असून तो या माध्यमातून डाएट आणि वर्कआऊटविषयीचे व्हिडिओ शेअर करतो. चाहत्यांना आपले व्हिडिओ आवडल्यानंतर त्याने आपल्या ऑनलाइन कामात वाढ केली. सध्या तो जगातील मोठ्या फिटनेस गुरुंमधील एक असल्याचे बोलले जात आहे. ६.३ फूट असलेल्या या फिटनेस गुरुचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असून त्याला ‘जिम मॉन्स्टर’ म्हटले जाते. इन्स्टाग्रामवर त्याचे २५ लाख फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या १ लाख ३४ हजार आहे, तर फेसबुकवर त्याला २९ लाख लोक फॉलो करतात. इतकेच नाही तर त्याचे यू-ट्युब पेज असून ११ लाखांहून अधिक सबस्क्राइबर आहेत. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो मात्र सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरत आहेत. मुलींना उचलून तो वेटलिफ्टींग करत असल्याचे त्याने शेअर केलेल्या अनेक फोटोंमधून आपल्याला दिसते.