घरात झुरळ, पाल किंवा खेडेगावात अगदी साप आला तरीही आपण समजू शकतो. मात्र एका घरात चक्क मगर घुसली, तीही मध्यरात्री. नशीबाने या घरात राहणाऱ्या लोकांच्या हे वेळीच लक्षात आल्याने दुर्घटना टळली. उत्तराखंडमधील हरिव्दारमध्ये अल्वालपूर गावात राहणाऱ्या नरेंद्र कुमार यांच्या घरात मध्यरात्री ही मगर आली. ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने त्यांनी घरातील व्यक्तींना बाहेर काढले. वेळीच घरातील लोकांना बाहेर काढल्याने सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

याठिकाणच्या स्थानिकांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून गावात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे गावात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे या पाण्याबरोबर ही मगर वाहत गावात आली असावी आणि काही वेळाने ती या घरात शिरली असण्याची शक्यता आहे. मात्र या मगरीला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे कैद केले.

याविषयी कुमार यांना विचारले असता ते म्हणाले, घरात मगर आल्याचे लक्षात येताच मी माझ्या कुटुंबातील सदस्य आणि घरी आलेले पाहुणे यांना तातडीने घराच्या बाहेर काढले. घराची सर्व दारे लावून तिला बंद करुन ठेवले. वनविभागाचे लोक आल्यावर त्यांनी अतिशय शिताफीने तिला आपल्या जाळ्यात पकडले. व्हिडिओमध्ये या कर्मचाऱ्यांनी मगरीला कशाप्रकारे कैद केले हे दिसू शकते.