भारत आणि पाकिस्तान यांच्यात ओव्हलच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागला. या मेगा फायनलकडे भारत आणि पाकिस्तानच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष लागून होते. पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर भारतीयांकडून सोशल मीडियावर भावनिक संदेश फिरताना दिसले. तर पाकिस्तानी चाहत्यांचा आनंद ओसंडून वाहत असतानाच इंग्लंडमधील पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा डान्स सध्या चांगलाच व्हायरल झालाय.
विशेष म्हणजे इंग्लंडमध्ये रंगलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून इंग्लंडला पराभूत करुन पाकिस्तानने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मायदेशात इंग्लंडच्या संघाला पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागले असले तरी इंग्लंडमधील क्रिकेट चाहत्यांनी खिलाडूवृत्तीने या अंतिम सामन्याचा आनंद घेतला. यात पोलिसांने पाकिस्तानी चाहत्यांसोबत केलेल्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर या व्हिडिओची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानच्या विजयानंतर मैदानात आनंद साजरा होत असताना गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी हा पोलीस कर्मचारी तिथे पोहोचला होता मात्र, तो स्वत:च क्रिकेट चाहत्यांच्या आनंदात रंगून गेला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३३९ धावा केल्या होत्या. मागील दहावर्षाचा भारत पाकिस्तान यांच्यातील इतिहास पाहाता, भारतीय संघाचे पारडे अधिक जड असल्याच्या चर्चा सामन्यापूर्वी रंगल्या होत्या. मात्र, ओव्हलच्या मैदानावर दहावर्षाचा इतिहास खोडून काढत पाकिस्तानने दमदार कामगिरी केली. पाकिस्तानने या सामन्यात भारतीय संघाला तब्बल १८० धावांनी पराभूत केले. या सामन्यानंतर भारतीय पराभवासंदर्भात सोशल मीडियावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. पाकिस्तानी संघाने रविवारचा सामन्यात अविस्मरणीय खेळी केली असल्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना ईदच्यापूर्वी मोठ्या आनंदाचा उत्साह दिसून येत आहे. पाकिस्तानी संघाने चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरुन पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना एका अर्थाने जणू  ईदीच दिली आहे.