मार्शल आर्टमध्ये काही ना काही साहसी प्रकारांचे प्रयोग अनेकदा होताना दिसतात. आपल्यातील ताकद अजमावण्यासाठी कोणी हाताने कौलं फोडतात तर कोणी नारळ. असाच एक प्रयोग आंध्र प्रदेशातील एका मार्शल आर्ट खेळाडूने नुकताच केला आहे. त्याने आपल्या हाताने अतिशय टणक असे आक्रोड फोडले आहेत. आता एखादं-दोन आक्रोड फोडणे ठीक आहे पण या पठ्ठ्याने एका मिनिटात तब्बल २१२ आक्रोड फोडले आहेत तेही एका दमात.

हाताने आक्रोड फोडणे याची आपण कल्पनाही करु शकत नाही. मात्र प्रभाकर रेड्डी या खेळाडूंने या स्पर्धेत चक्क हाताने आक्रोड फोडत विजेतेपद पटकावले आहे. स्पर्धेची वेळ सुरु झाली तसे रेड्डी यांनी विजेच्या वेगाने आक्रोड फो़डण्यास सुरुवात केली आणि एका मिनिटांत २१२ आक्रोड फोडले. प्रभाकर रेड्डी यांचा हा आक्रोड फोडतानाचा व्हिडिओ गिनिज बुकने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

हे आक्रोड एका टेबलवर एका रेषेत मांडण्यात आले होते. इतकेच नाही तर एकही आक्रोड आधीच फुटलेला नाही ना याचीही तपासणी करण्यात आली होती. रेड्डी हे ३५ वर्षांचे असून हे रेकॉर्ड करण्यासाठी ते मागील काही दिवसांपासून सराव करत होते. याआधी अशाप्रकारे हाताने आक्रोड फोडण्याचा विक्रम पाकिस्तानमधील मोहम्मद राशिद यांच्या नावावर होता. त्यांनी एका मिनिटात २१० आक्रोड फोडले होते. राशिद यांचा हा विक्रम प्रभाकर यांनी मोडला असून त्यांची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.