स्थळ: जबलपूर जिल्हाधिकारी कार्यालय

वेळ साधारण दुपारची. सरकारी आॅफिसेसमध्ये असते तशी नेहमीची वर्दळ पण जनसुनवाई असल्याने जास्त गर्दी होती.

एक माणूस एका बाईला हातात उचलून घेऊन आला. जिल्हाधिकारी कार्यालयात आत येईन त्याने जाहीर केलं की मला या मुलीशी लग्न करायचं आहे.

या अनपेक्षित घटनेने तिथले सर्वजण काहीसे अवाक झाले. पण या दोघांची कहाणी उपस्थित अधिकारी आणि इतरांनी एेकली आणि आपले डोळे पुसत त्यांनी या दोघांना विवाह नोंदणी कार्यालयात पाठवलं. ‘राजस्थान पत्रिका’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हे दोघे होते डाॅ. समीरन बाला आणि त्यांची होणारी पत्नी मीना. मीनाला चालता येत नाही. आणि म्हणूनच तिला आपल्या हातांनी उचलून तिला समीरनने जिल्हाधिकारी कार्यालयात आणलं होतं! हा व्हिडिओ व्हायरल झालाय. पाहा.


सौजन्य- जबलपूर पत्रिका फेसबुक पेज

डाॅ समीरन मूळचे कोलकात्याचे, पण आपल्या डाॅक्टरी पेशानिमित्त ते जबलपूरमध्ये राहत होते. जबलपूरजवळच्या एक गावात त्यांनी मीनाला पाहिलं आणि एका क्षणात ठरवलं की हीच आपली होणारी पत्नी.

लहानपणी पोलियो झालेल्या मीनाला वेळीच उपचार न मिळाल्याने तिचे पाय लुळे पडले आणि तिला चालता येईनासं झालं. पण अशा परिस्थितीतही तिने जिद्दीने शिक्षण सुरू ठेवलं. २० वर्षांची मीना आता बीए पूर्ण करत आहे.

समीरनने ठेवलेल्या या प्रस्तावामुळे स्वत: मीना आणि तिचे कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. समीरन आपल्या निर्णयावर ठाम होता. मीनाने आणि तिच्या कुटुंबीयांनीही या लग्नाला आनंदाने संमती दिली.

मीनाला जिल्हाधिकारी कार्यालयात एखाद्या व्हीलचेअरवर बसवूनही समीरन आणू शकला असता. पण आपल्या होणाऱ्या पत्नीला स्वत:च्या हातांनी उचलून प्रेमाने विवाह नोंदणी कार्यालयात घेऊन जाणाऱ्या समीरनचं खरं प्रेम कळतं. आणि या दोघांच्या आयुष्यात सुरू होणाऱ्या या नव्या पर्वाची अतिशय चांगल्या प्रकारे सुरूवात करण्याची समीरनची आसही या घटनेवरून स्पष्ट दिसते. या अनोख्या जोडप्याची सगळीकडे चर्चा होते आहे.