स्वत:ची कार किंवा स्कूटर असणाऱ्यांचं एक बरं असतं. कुठे जायचं म्हटलं की काढली गाडी की झालं काम. पण बाकीच्यांसाठी रिक्षा, बसशिवाय पर्याय नाही. मुंबईसारख्या शहरात लोकल ट्रेन म्हणजे शहराची जीवनवाहिनी मानली जाते.  दररोज लाखो प्रवासी त्यांच्या रक्तवाहिन्या ताणत रोजच्या रोज या लोकल ट्रेन्समधून प्रवास करतात. परत स्टेशनवर पोचायलासुध्दा रिक्षा, टॅक्सी, बसची धावपळ.कामाला जाण्याआधीच अर्धा जीव गेलेला असतो.

आता रोजची हीच ट्रेन तुमच्या घरात आली तर? म्हणजे स्टेशनवर झोपा असं नाही. ही ट्रेन तिच्या तिच्या रोजच्या मार्गानेच थेट तुमच्या बिल्डिंगमध्ये आली तर?

मुंबईकरांच्या दृष्टीने स्वप्नवत असलेली ही स्थिती या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी प्रत्यक्षात आहे. हे शहर आहे चीनमधलं. चोंगकिंग नावाच्या या शहरातल्या अशा अनेक ‘बिल्डिंगमधून’ ही ट्रेन जाते. या शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच अशी तयार केली गेली आहे.

या शहराची लोकसंख्या प्रचंड आहे.  त्यामुळे इथे बिल्डिंगची संख्या खूपच जास्त आहे. इथल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून इथे नवी ट्रेन सिस्टिम तयार करण्यासाठीही जागा नव्हती. त्यावर तोडगा म्हणून इथल्या इंजिनिअर्सनी थेट इमारतींमधूनच या ट्रेन्स नेण्याची आयडिया काढली.

ही भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आणण्यात चीनचे इंजिनिअर्स यशस्वी ठरले. या बिल्डिंगमध्येच त्यांनी रेल्वे स्टेशन तयार केलं. पाहा व्हिडिओ.

आता आपल्या बिल्डिंगमधूनच अशी ट्रेन जाणार म्हटल्यावर त्या सगळ्या आवाजाचा आणि धडधडाटाचा त्या बिल्डिंगच्या रहिवाशांना त्रास  तर होणारच. हा त्रास टाळण्यासाठी चक्क आवाज न होणारी ट्रेन या इंजिनिअर्सनी विकसित केली.

मुंबईत किंवा भारतात असं काही होऊ शकलंही असतं का? किंबहुना असं करायचं ठरवलं जरी असतं तरी काय काय घोळ घातला गेला असता याचा फक्त विचारच केलेला बरा!