आपल्या शालेय वर्षांमध्ये अनेक शिक्षिका व शिक्षक आपल्याला भेटतात. त्यातले काही आपल्या आवडीचे असतात तर काही नसतात. काही शिक्षकांचं शिकवणं आपल्याला खूप आवडतं. त्यांच्या शिकवण्यातून आपल्याला नवी दिशा मिळते, नवीन गोष्टी कळतात. तर काहींच्य़ा शिकवण्याच्या पद्धतीमुळे आपल्याला त्यांचं शिकवणं कंटाळवाणं वाटू शकतं

‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’चा फॉर्म्युला आता जुना झालाय. मारझोडीपेक्षा मुलांना नीट समजावून सांगत त्यांना शिकवण्याची पद्धत आता रूजू लागली आहे. तरीही काही शिक्षक मुलांना मारहाण करतातच.

सध्या व्हायरल झालेला व्हिडिओ याच प्रकारचा आहे. यामध्ये एका मुलीने चुकीचं वागल्याने तिला तिची शिक्षिका ओरडताना दिसत आहे. रागाच्या भरात शिक्षिका त्या मुलीला कानाखाली वाजवते. पण पुढे जो गोंधळ होतो तो या शिक्षिकेला अपेक्षित नसावा.

या शिक्षिकेने रागाच्या भरात त्या मुलीला कानाखाली लगावली खरं. पण त्यानंतर त्या विद्यार्थिनीने खवळून शिक्षिकेलाच मारलं. आणि त्यानंतर सुरू झालेलं महाभारत आवरायला अख्ख्या वर्गालाच उतरावं लागलं.

व्हिडिओमध्ये या मुलीने जे केलं ते निश्चितच अयोग्य आहे. आपल्या शिक्षकांवर हात उगारणं हे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरत नाही. पौगंडावस्थेतल्या मुलांना शिकवताना त्यांची काळजी घेताना संयम ठेवून त्यांच्या भावनांचा मान राखत बोलता आलं पाहिजे. या  व्हिडिओमध्ये या दोघींनीही वापरलेली संवादाची पध्दत निश्चितच योग्य नाही. या दोघींनी त्याचा विचार नंतर केलाच असेल. पण या व्हिडिओमुळे या दोघांची आणि त्या ज्या शाळेत आहेत त्या शाळेची नाहक प्रसिध्दी झाली. विचार करायला लावण्याजोगी बाब आहे.