कार किंवा दुचाकी चालवताना तुम्हाला फोनवर बोलायची सवय आहे? मग हा व्हिडिओ नक्की पाहा. गाडी चालवताना फोनवर बोलण्याची सवय आपल्याला कुठे घेऊन जाऊ शकते याचे हे उत्तम उदाहरणच. त्यामुळे तुमच्यावरही असा प्रसंग ओढावू शकतो हे या व्हिडिओमधून समोर येत आहे. जगभरात अपघात रोखण्यासाठी कठोर नियम आहे. वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नका असा नियम आहे. पण या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

चीनमध्ये ग्वांग्शी येथे मुख्य रस्ता खचल्याची घटना समोर आली. रस्ता खचला त्याच्या काही वेळानंतर एक दुचाकीस्वार तिथून जात होता, पण फोनवर बोलण्याच्या नादात रस्ता खचल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. तो थेट या खड्ड्यात जाऊन पडला. आता पुढे काय झाले हे वेगळे सांगायला नकोच…विशेष म्हणजे हा खड्डा इतका मोठा होता की तिथून बाहेर पडताना त्याची दमछाक झाली. आता हा रस्ता अचानक कसा खचला? फोनवर बोलत असला तरी त्याला इतका मोठा खड्डा दिसला नाही का? असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. पण फोनवर बोलत असल्याने हा अपघात झाला हे मात्र नक्की.

रस्ता खचल्याने या मार्गावर ३२ फूट लांब आणि ६ फूट खोल खड्डा पडला आहे. सुदैवाने या अपघातात त्या तरुणाचे किरकोळ दुखापतीवरच निभावले. अपघातानंतर तो स्वतःच खड्ड्यातून बाहेर आला. हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत ८४ हजार यूजर्सनी हा व्हिडिओ पाहिला असून १६०० जणांनी तो लाईक केला आहे. तर ९७४ जणांनी हा व्हिडिओ शेअर करत दुचाकी चालविताना काळजी घेण्याचे आवाहन यातील अनेकांनी केले आहे. त्यामुळे जर गाडी चालविताना फोनवर बोलणे टाळलेलेच बरे. नाहीतर किमान गाडी बाजूला घेऊन तुम्ही फोन घेऊ शकता. अन्यथा तुमच्या बाबतीतही असा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.