रिपोर्टिंग हे आव्हानात्मक असते तितकेच ते आनंद देणारेही क्षेत्र आहे. अनेकदा काही गमतीशीर घटनांमुळे या क्षेत्रातील लोकांमध्ये जिवंतपणा कायम राहतो असे म्हणता येऊ शकेल. आयर्लंडमध्ये नुकतीच एक अतिशय मजेशीर घटना घडली. ‘टीव्ही ३’ या आयरीश वाहिनीसाठी वार्तांकन करणारा रिपोर्टर काही वेळासाठी टीव्हीच्या फ्रेममधूनच बाहेर गेला. आता हे कसे काय झाले? असा विचार तुम्ही नक्कीच करत असाल. तर वाऱ्याच्या वेगामुळे हा रिपोर्टर छत्रीसोबत फ्रेममधून बाहेर ओढला गेला.

अंगाने काहीसा बारीक असणारा हा रिपोर्टर वेगाने वारा आल्याने बाजूला फेकला गेला. त्यामुळे माणसाला बाजूला फेकणाऱ्या या वाऱ्याची गती काय असू शकते याचा अंदाज तुम्ही लावू शकता. पाऊस येत असल्याने एक रिपोर्टर छत्री घेऊन वार्तांकन करत होता. डेरीक हार्टीगन असे या रिपोर्टरचे नाव आहे. तो अशाप्रकारे फ्रेममधून बाहेर पडल्याने चॅनल पाहणाऱ्यांचे आयते मनोरंजन झाले विशेष म्हणजे हा क्षण कॅमेरात कैद झाला असून तो ऑनस्क्रीनही दाखविण्यात आला. आपल्या मोडक्या-तोडक्या छत्रीबरोबर सावरण्याचा प्रयत्न करत हा रिपोर्टर पुन्हा फ्रेममध्ये आला खरा. मात्र त्याची अवस्था अतिशय लाजीरवाणी झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत होते. याचवेळी चॅनलच्या न्यूजरुममध्ये असणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांना आपले हासणे थांबवता आले नाही आणि ते कसे हासत होते हेही कॅमेराने टिपले आहे.

केरळमध्येही नुकतीच अशाप्रकारची घटना घडली होती. हवामानाचे रिपोर्टींग करताना एका रिपोर्टरच्या अंगावर अचानक समुद्राच्या लाटा आदळल्या होत्या आणि या तो वाहून जातोय की काय अशी अवस्था निर्माण झाली होती. या लाटेच्या तडाख्याने त्या बिचाऱ्याची छत्रीही मोडली होती. पण बिचाऱ्याने स्वत:ला सावरत वार्तांकन पूर्ण केलं.