भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशामधलं वैर साऱ्या जगाला ठावूक आहे आणि याच शत्रूत्त्वाच्या भावनेमुळे अनेकदा सोशल मीडियावर दोन्ही देशांच्या राजकारणी, खेळाडू, कलाकार मंडळींना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा मंडळींना ट्रोल करण्याची एकही संधी दोन्हीकडचे नेटीझन्स सोडत नाही. आता विराट कोहलीचंच घ्या ना. गेल्या आठवड्यात विराटनं शिक्षक दिनाच्या दिवशी एक ट्विट केलं होतं. ज्या क्रिकेटर्सना पाहून तो लहानाचा मोठा झाला, ज्यांच्या खेळाचा प्रभाव त्याच्यावर होता त्या सगळ्यांप्रती त्याने आपली भावना व्यक्त केली होती.

या यादीत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान, जावेद मियाँदाद आणि इंजामम-उल-हक यांच्या नावाचाही समावेश होता. विराटचं हे ट्विट पाकिस्तानच्या सोशल मीडियावरही व्हायरल झालं. अर्थात या ट्विटवरून अनेकांनी विराटची टेर खेचण्याचा प्रयत्न केला. ‘जर कोणाचा आक्षेप नसेल तर ट्विट करणारा हा सज्जन माणूस आहे तरी कोण असा मला प्रश्न विचारावासा वाटतो?’ असं ट्विट सयैदा आलिया अहमद या महिलेने केले. पण तिचा हा खोचक प्रश्न पाकिस्तानमधल्या विराटच्या चाहत्यांना काही रुचला नाही असंच दिसतंय.

तेव्हा एका पाकिस्तानी चाहत्यांनी तिला सडेतोड उत्तर दिलं. ‘हा विराट कोहली असून भारतीय क्रिकेट संघाचा तो कर्णधार आहे. तो उत्तम बॅट्समन आहे आणि त्याच्यापाठीमागे भिंतीवर दिग्गज खेळाडूंचं नाव लिहिलं आहे ‘ असं उत्तर विराटच्या पाकिस्तानी चाहता फरिदने दिलं. सयैदाला दिलेल्या या सडेतोड उत्तरामुळे त्याने सगळ्यांचंच मन जिंकलं आहे. फरिदाच्या या उत्तरानं विराटचे फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमध्येदेखील तितकेच चाहते आहे हे दिसून येत.