‘तूझे गुलाबाच्या पाकळीप्रमाणे नाजूक ओठ’ किंवा ‘डाळिंबांच्या दाण्याप्रमाणे लालचुटूक ओठ’ अशी ओठांना कितीतरी विशेषणं लावली असतील पण हे फोटो पाहून हि-यांसारखे तुझे ‘नाजूक’ ओठ असंच म्हणावं लागेल, आता तुम्ही म्हणाल ओठ हि-यांसारखे कसे असतील? पण फॅशनच्या दुनियेत काहीही होऊ शकतं बुवा, हि-याचेच काय सोन्याचे ओठ इथे पाहायला मिळाले तरी नवल वाटायला नको.

प्रसिद्ध लिप डिझायनर व्लाडा हिने एका मॉडेलच्या चेह-यावर हे लिप आर्ट केलं आहे. या मॉडेलचे ओठ सजवण्यासाठी व्लाडाने वेगवेगळ्या आकाराचे तब्बल ८० हिरे वापरले आहेत. या हि-यांची किंमत ऐकूनच घाम फुटेल. जवळपास १७ लाख २२ हजार किंमतीच्या हि-यांचा तिने ओठ सजवण्यासाठी वापर केला आहे, व्लाडा ही लिप डिझायनर म्हणून प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्रामवर जवळपास साडेसहा लाख फॉलोअर्स आहेत. वेगवेगळ्या युक्त्या वापरून ती ओठ सजवते किंवा रंगवते. व्लाडाचा सध्याचा हा हि-यांचा लिप लूक जगातला सगळ्यात महागडा लिप लूक ठरला आहे. व्लाडा लिप इडिटर इन चिफ म्हणून ओळखली जाते. जगप्रसिद्ध फॅशन मॅगझिनमध्ये जर ओठांवर एखादे आर्टिकल किंवा जाहिरात असेल तर त्यात ओठांचा मेकअप कसा असावा याबाबत ती मार्गदर्शन करते. तसा आपल्या इथे हा ट्रेंड फारसा रुजू झाला नाही, त्यामुळे आपल्याला याचे अप्रुप नसेलही पण आंतरराष्ट्रीय फॅशनविश्वात मात्र तिच्या या कलेचे फारच कौतुक होतं.

lips-2