रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडून असलेल्या या महाकाय प्राण्याच्या मृतदेहानं ब्रेन्ट स्ट्रीरटॉन यांना यंदाचा ‘वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इअर’चा किताब मिळवून दिला. अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी जगभरातील हजारो फोटोग्राफर्सने वेगवेगळे फोटो पाठवले होते. त्यातल्या काही खास फोटोंची निवड अंतिम स्पर्धेसाठी झाली. या स्पर्धेत ब्रेन्ट यांनी टिपलेल्या फोटोनं बाजी मारली, पण फक्त सर्वोत्कृष्ट फोटोच्या किताबासाठी ब्रेन्टनं नक्कीच तो फोटो काढला नव्हता. सध्या अवैध शिकार वन्य प्राण्याच्या जीवावर उठली आहे आणि त्याकडेच जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी ब्रेन्ट यांनी तो फोटो टिपला.

Diwali 2017 : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाली भारतभूमी, अंतराळवीराची भारतीयांना खास भेट

जमिनीवर वावर असलेला गेंडा हा हत्तीनंतर दुसरा महाकाय प्राणी. आशिया आणि आफ्रिका खंडात प्रामुख्याने आढळणाऱ्या या प्राण्याची शिंगासाठी शिकार केली जाते. त्यांच्या शिंगाना मोठी किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात आहे. त्यातून पारंपरिक चिनी आणि थायी औषधांमध्ये त्यांच्या शिंगाचा वापर केला जातो, म्हणून आफ्रिकेतले शिकारी आपलं पोट भरण्यासाठी आणि रग्गड पैसा कमावण्यासाठी गेंड्यांची शिकार करतात. गेंड्यांची शिकार करणं कायद्यानं गुन्हा आहे तरीही फॉरेस्ट रेंजरच्या नजरेत धूळ फेकून इथले स्थानिक शिकार करतात. २०१६ मध्ये ब्रेन्ट आफ्रिकेत गेले होते. तेव्हा नॅशनल जिओग्राफीकने गेंड्यांच्या अवैध शिकारीवर प्रकाश टाकणारी एक मोहिम हाती घेतली होती, त्या मोहिमेचा भाग म्हणून ब्रेन्ट या परिसरात होते.

वाचा : रशियन जोडप्याचं फोटोशूट पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल

गेंडा पाणी पिण्यासाठी तलावाकाठी आला होता, तेव्हा काही शिकाऱ्यांनी त्याला बेशुद्ध केलं, फॉरेस्ट रेंजरला कळण्याआधीच त्यांनी शांतपणे या गेंड्याचे शिंग कापले आणि तिथून पळून गेले. हा सारा प्रकार खूपच धक्कादायक होता असंही ब्रेन्ट म्हणाले. आफ्रिकेतल्या अनेक अभयारण्यात हे प्रकार खुलेआम सुरू असतात, हे सारं प्रकरण जगासमोर आणण्यासाठी मी तो फोटो टिपला, असंही ब्रेन्ट म्हणाले. ब्रेन्टने टिपलेला फोटो इतका प्रभावी होता की या प्रश्नात अनेकांनी लक्ष घालायला सुरूवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेत गेंड्याची संख्या सर्वाधिक आहे, जगातील ८० टक्के गेंडे या भागात आढळतात. दरवर्षी येथे शिंगासाठी हजारो गेंड्यांना अमानुषपणे ठार केले जाते. २००८ मध्ये ८३ गेंड्यांची हत्या करण्यात आली, २०१४ मध्ये हा आकडा इतका वाढला की १,०५४ गेंड्याची शिकार करण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. वाढत्या शिकारीमुळे या प्राण्याचं अस्तित्त्व धोक्यात आलं आहे म्हणूनच या फोटोमधून ब्रेन्ट यांनी अवैध शिकारीवर जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.