टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटाची कथा माहितीये ना, लग्नानंतर घरात टॉयलेट नसल्याने जयाने दिलेला लढा आणि अखेर तिच्या लढ्याला आलेले यश आपण पाहिले. घरात शौचालय असणे हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे आणि तो तिला मिळायला हवा या चित्रपटातील गोष्टीचा आदर्श घेत मेरठमधील एका मुलीने अशाचप्रकारचे धाडस दाखविले आहे. आपल्या सासरी शौचालय असल्याशिवाय आपण लग्न करणार नाही अशी मागणी या मुलीने केली आणि विशेष म्हणजे तिच्या सासरकडून ही मागणी मान्य करण्यात आली. मेरठमधील फलावदा याठिकाणी ही घटना घडली असून शौचालय बांधण्याचे काम सुरुही झाले आहे.

मेरठमधील या दोघांचे लग्न आई-वडिलांच्या मान्यतेनुसार ठरले आहे. मुलगा पदवीधारक असून तो एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. तर मुलगी १२ वी पास आहे. लग्न ठरल्यानंतर मुलाने आपल्या घरातील सर्वांची मुलीशी ओळख करुन दिली. एकमेकांशी बोलत असताना मुलीने सहज घरात शौचालय आहे की नाही याबाबत चौकशी केली. तेव्हा घरात शौचालय नसून सर्व स्त्रिया त्यासाठी जंगलात जात असल्याचे सांगितले. याशिवाय अनेक वर्षांपासून असेच सुरु असल्याचेही त्याने मुलीला सांगितले.

यावर स्वच्छ भारत अभियानांतर्गत घराघरांत शौचालय बांधण्याचे काम सुरु असून बदल घडवायचा असेल तर घरात शौचालय असणे आवश्यक आहे असे सांगितले. इतकेच नाही तर घरात शौचालय झाल्यावरच आपण लग्नासाठी तयार आहोत असेही मुलीने सांगितले. मुलाच्या कुटुंबियांनी मुलीची ही मागणी मान्य केली असून शौचालयाच्या बांधकामास सुरुवात झाली असल्याचे ‘नवभारत टाइम्स’ने आपल्य वृत्तात म्हटले आहे.