आपली एखादी गोष्ट हरवली तर आपण पार हैराण होऊन जातो. सुरुवातीला काही दिवस आपण ही गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करतोही, मात्र काही दिवसांनी आपण तोही नाद सोडून देतो. मग आता ती गोष्ट आपल्याला परत कधीच मिळणार नाही असा आपला पक्का समज होतो. यातही ही गोष्ट विशेष असेल तर विचारायलाच नको. ती वस्तू हरविल्याचा सल कित्येक दिवस आपल्या मनात राहतो.

कॅनडामध्ये नुकतीच एक घटना घडली. एका ८४ वर्षांच्या या महिलेला १३ वर्षांपूर्वी हरवलेली आपली अंगठी सापडली. मॅरी ग्रॅम्स असे त्यांचे नाव असून ही अंगठी कुठे सापडली हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. या महिलेला १३ वर्षांपूर्वी हरवलेली आपली साखरपुड्याची अंगठी अंगणात सापडली तीही एका गाजरात अडकलेली. याबाबत ग्रॅम्स म्हणाल्या, आपली अंगठी हरविल्याचे मी माझ्या पतीला कधीच सांगितले नाही, मात्र माझ्या मुलीला ते माहित होते. आता इतक्या वर्षांनंतर साखरपुड्याची अंगठी सापडल्याने मला खूप आनंद झाला आहे. ही अंगठी गाजरात अशी अडकली आहे की मी तिला सहज बाहेरही काढू शकत नाही.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

त्यांची सून कॉलीन डेली हिला शेतात काही काम करताना ही अंगठी सापडली. हे शेत १०५ वर्षांपासून या कुटुंबाकडे आहे. डेली म्हणाली शेतातून गाजर काढत असताना एक गाजर वेगळेच असल्याचे तिच्या लक्षात आहे. जेव्हा तीने हे गाजर धुतले तेव्हा अंगठी तिच्या नजरेस पडली आणि तिने आपल्या नवऱ्याला सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी मिळून ग्रॅम यांना अंगठी सापडल्याचे सांगितले. त्यांचा या घटनेवर विश्वासच बसत नव्हता. मात्र अंगठीमधून हे गाजर कसे वाढले याबाबत आश्चर्य असल्याचे डेली म्हणाली. ग्रॅम्स यांना ही अंगठी आपल्या बोटात बसते का हे पाहण्याची खूप उत्सुकता होती. त्यांनी ती अंगठी स्वच्छ केली आणि आपल्या पतीने घातलेल्या त्याच बोटात ती अंगठी घालून पाहिली. आश्चर्य म्हणजे ही अंगठी त्यांना इतक्या वर्षांनंतरही अतिशय योग्य पद्धतीने बसत होती.