नवऱ्याला मंडईत भाज्या आणायला पाठवणं म्हणजे काही महिलांसाठी डोकेदुखीच असते. घरकामातच एवढा वेळ जातो की मंडईत जाऊन भाज्या आणयला सवड कुठे असते? तेव्हा ‘अहो येताना भाजी घेऊन या!’ असे फर्मान ‘होम मिनिस्टर’कडून सर्रास सोडलं जात. पण स्वारी भाज्या आणायला मंडईत गेली की काहीतरी गडबड करणार हे नक्की! कोणती भाजी हवीय, किती किलो हवी आहे, भाजीवाल्याला किती पैसे द्यायचे, तोलमोल करताना काय अस्त्र वापरायचं अशा शंभर सुचना नवरेबुवांना दिल्या तरी त्यांच्या लक्षात राहतं थोडीच. वांगी सांगितली तर कारली आणतील, मेथी सांगितली तर पालकाची जुडी घेऊन येतील अशी परिस्थिती घरोघरी असते.

वाचा : व्वा! शेफला सुट्टी देण्यासाठी मालकाने आठवडाभरासाठी हॉटेलच ठेवलं बंद

हा आता आपल्या ‘अहों’कडून तसली चुक होऊ नये म्हणून काहीजणी भाज्यांची यादीच लिहून देतात, पण यादी देऊन आणि सूचना करूनही पालथ्या घड्यावर पाणीच! तेव्हा एका महिलेने भन्नाट शक्कल लढवली आहे. टॉमेटो, बटाटे, कांदे घेताना ते कसे घ्यावेत त्यांच्या आकार कसा असावा, मेथी, पालकाची पानं कशी निवडून घ्यावीत याचं चित्र काढून त्याची इत्थंभूत माहिती एका महिलेने आपल्या पतीला दिली आहे. इरा लोंढे असं तिचं नाव असून तिने नवऱ्यासाठी तयार केलेली भाज्यांची यादी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.