अनेकदा काही लोकांना आपल्या हातातली वस्तू सोडून शेवटच्या क्षणी भलतीच वस्तू घेण्याची वाईट सवय असते. आता सोप्पं उदाहरण घ्यायचं झालं तर साडीच्या दुकानातलंच घ्या ना! इथे महिला साडी खरेदीला येतात, एक साडी विकत घ्यायचं पक्क होतं पण दुसऱ्या महिलेच्या हातात त्यापेक्षा जरा बरी साडी दिसली की त्यांचा पुरता संभ्रम उडतो. ही घेऊ की ती घेऊ असा गोंधळ उडतो आणि मग दुसऱ्या व्यक्तीच्या हातात दिसणारी तशीच साडी घेण्याचा त्यांचा हट्ट असतो. अशीच सवय एका चिनी महिलेला भारी पडली. एका नर्सरीमध्ये ती काही फुलझाडं खरेदी करायला आली होती. तिने काही ऑर्किडची झाडं खरेदी केली आणि ती निघाली. पण निघताना तिच्या मनात एक वेगळाच विचार चमकून गेला.
तिला नर्सरीत आणखी काही ऑर्किडची फूलं दिसली. आता ही फूलं काय आणि ती फूलं काय सारखीच असा विचार तिच्या डोक्यात आला, आणि तिने नर्सरीतून विकत घेतलेली फूलझाडं तिथूच ठेवली आणि कोणाचं लक्ष नसताना दुसरी काही ऑर्किडची रोपटी उचलली. काही वेळानंतर जेव्हा नर्सरीच्या मालकाने पाहिलं तेव्हा त्याला हार्ट अॅटकच यायचा बाकी होता कारण या महिलेनी शे पाचशे नाही तर तब्बल १९ कोटी किंमत असलेली रोपटी पळवली होती. त्याने लगेचच पोलिसांना फोन केला आणि याची माहिती दिली.

वाचा : १३६ किलोंवरून ६४ किलो वजन करून दाखवलंच!

या नर्सरीमध्ये जगातील सर्वात दुर्मिळ अशी ऑर्किडची प्रजाती आहे. ज्याला वाढण्यासाठी ८ वर्षे मेहनत घ्यावी लागते. एवढं मोठं नुकसान झाल्याने मालक टेन्शमध्ये होताच. शेवटी पोलिसांनी काही तासांत या महिलेला अटक केली. विशेष म्हणजे जेव्हा तिला या रोपट्यांची किंमत समजली तेव्हा तिलाही धक्का बसला. आपण घेतलेल्या ऑर्किडपेक्षा ही दुसरी ऑर्किडची रोपटी जरा चांगली दिसत होती तेव्हा तिने सहज ती उचलली होती. तिच्याकडून रोपटी मिळाल्यानंतर कुठे मालकाच्या जीवात जीव आला. तिच्याकडून अनावधानाने ही चूक झाली म्हणून मालकानेही तिला माफ केलं.