तुम्ही कधी १५३ किलोंचा सामोसा पाहिलात का? नाही ना? मग हा पाहा जगातील सर्वात मोठा सामोसा. या सामोसाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलीय. विशेष म्हणजे लंडनमधल्या मशिदीमध्ये हा सामोसा तयार करण्यात आलाय.

मशिदीमधील कर्मचारी आणि काही स्वयंसेवकांनी मिळून तो तयार केलाय. मंगळवारी२२ ऑगस्टला हा सामोसा तयार करण्यात आला. तो तयार करण्यासाठी पंधरा तास लागले. या सामोसाचे वजन १५३ किलो आहे. एवढा मोठा सामोसा तयार करणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. सामोसाची पारी तयार करणं, त्यात सारणं भरणं खूपच कठीण काम होतं पण सगळ्यांनी हे मोठं आव्हान पूर्ण केलं. विशेष म्हणजे तो तयार करताना सामोसाचा त्रिकोणी आकार बिघडणार नाही याची काळजी घेण्यात आली.

लंडनमधल्या अनेक स्वयंसेवकानी तो तयार करण्यासाठी हातभार लावला. याआधी २०१२ मध्ये उत्तर इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड कॉलेजने ११० किलो वजनाचा सामोसा बनवून विक्रम नोंदवला होता. हा समोसा तयार करण्यात आल्यानंतर गरिबांना तो वाटण्यात आला.