जगात खवले मांजराची सर्वाधिक तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. आंतराष्ट्रीय पातळीवर या प्राण्याची इतक्या मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते की तस्करीमुळे हा प्राणी जवळपास नामाशेष होण्याच्या मार्गावर आला आहे. विलुप्त होत चाललेल्या प्रजातीच्या तस्करीवर रोख लावण्यासाठी जोहान्सबर्गमध्ये गेल्याच आठवड्यात परिषद घेण्यात आली. त्यातून ही माहिती समोर आली आहे. आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत खवले असणा-या मांजराला मोठी मागणी असल्याने त्यांची  तस्करी  मोठ्याप्रमाणात केली जात आहे. गेल्या दशकभरात १ लाखांहून अधिक खवले मांजरांची तस्करी करण्यात आली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांची चीन आणि व्हिएतनाम या दोन्हीं देशांत मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याचे समजते. या दोन्ही देशांत औषधांसाठी या प्राण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात जातो.
या मांजराच्या पाठीवर असलेल्या खवल्यांना मोठी मागणी आहे. त्याचप्रमाणे अनेक देशांत त्याच्या मांसांला देखील मोठी मागणी आहे, त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येते. गेल्या दशकभरात इतक्या मोठ्या प्रमाणात या प्राण्याची तस्करी वाढली असून तस्करीमुळे हा प्राणी जवळपास विलृप्त होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. खवले मांजराच्या एकूण चार प्रजाती या आशिया आणि आफ्रिका खंडात आढळतात. त्यातली आशियायी प्रजाती ही जवळपास विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे तर आफ्रिकेतील खवले मांजरांची संख्या ही झपाट्याने घटते आहे.