नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले योगी आदित्यनाथ चांगलेच चर्चेत आले आहेत. या पदाच्या शर्यतीत असलेल्या अनेक आघाडीच्या नावांना एेनवेळी मागे टाकत भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री झालेल्या योगी आदित्यनाथ यांचं नाव या पदासाठी जाहीर झाल्याझाल्या ट्विटरवर त्यांचं नाव ट्रेंडिंगमध्ये आलं. राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असणाऱ्यांना सोडलं तर योगी आदित्यनाथ हे नाव सर्वसामान्यांसाठी तसं अपरिचितच. त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी जनतेत साहजिकच उत्सुकता आहे. कोण आहेत हे? काय करतात? या प्रश्नांचं उत्तर आतापर्यंत बहुधा सगळ्यांना माहीत असेल पण उत्तरे प्रदेशातल्या आजवरच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळे असणारे योगी आदित्यनाथ यांची दिनचर्या कशी असते त्यांचं खाणंपिणं कसं असतं याविषयी आता नव्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.

आपल्या नावाप्रमाणेच योगी आदित्यनाथांचा दिवस योगाभ्यासाने सुरू होतो. योगा आणि ध्यानधारणा झाल्यावर ते जो नाश्ता करतात त्यात पपई, दलिया, सफरचंद इत्यादींचा समावेश असतो असे त्यांचे जवळचे सहकारी सांगतात. त्यासोबत ते ताकही पितात. दिवसभर ते भरपूर पाणी पितात.

योगी आदित्यनाथांना पपई फार पसंत आहे आणि एकंदरीतच त्यांच्या आहारामध्ये फळांचं प्रमाणही भरपूर आहे. याशिवाय त्यांच्या आहारात उकडलेली कडधान्यंसुध्दा जास्त प्रमाणात असतात. दुपारच्या जेवणाच्या वेळी ते काही चपात्या आणि कडधान्य असा हलका आहार घेतात. रात्रीच्या जेवणही ते हलकं घेतात असं त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

योगी आदित्यनाथ हे हलका आणि सात्त्विक आहार घेतात असं त्यांच्या सहकारी सांगत असले तरी यानंतर उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याचा कारभार सांभाळताना हा हलका आहार त्यांना साथ देईल का हेच बघावं लागेल.