तुकोबा एक संत-कवी म्हणून अजरामर झाले.

त्यांचे काव्य अ-भंग होते, ते अ-भंगच राहिले. मराठी भाषेला ललामभूत झाले.

Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

तुकोबांची कविता रांगडी. सह्य़ाद्रीच्या डोंगरासारखी. खडबडीत. पण आपल्या कडय़ाकपारींमध्ये अर्थाची कितीतरी आभाळं सामावून घेणारी; तरीही साधी, सरळ आणि थेट. कोणताही आडपडदा नसलेली. मराठी मातीतल्या संज्ञा, संकल्पना, संस्कारांनी सजलेली. मनाला भिडणारी. आपल्याच मनातले बोलणारी. म्हणूनच ती येथील अवकाशात भरून राहिली. बोलीतून उगविलेली ही कविता बोलीचा भाग झाली. या अभंगांतील ओळी किती सहजतेने आज मराठीभाषकांच्या ओठांवर रुळल्या आहेत.

‘येथे पाहिजे जातीचे’, ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण’, ‘सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे’, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले’, ‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात’, ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळगोमटी’, ‘पोट लागले पाठीशी, हिंडवी ते देशोदेशी’, ‘चणे खावे लोखंडाचे..’, ‘नाही निर्मळ जीवन, काय करीत साबण’, ‘महापुरे झाडे जाती..’, ‘आले देवाचिया मना..’, ‘माझिये जातीचे मज भेटो कोणी’, ‘मोले घातले रडाया..’, ‘मन करा रे प्रसन्न..’, ‘मढय़ापाशी करुणा गेली’.. किती वाक्प्रचार, किती सुभाषिते.. ही शब्दांची रत्ने देऊन तुकोबांनी मराठीला खरोखरच श्रीमंत केले.

केशवकुमारांनी एका विडंबन कवितेत ‘आम्हांस वगळा, गतप्रभ जणू होतील तारांगणे’ असा मराठीतल्या सालोमालो कवींचा उपहास केला आहे. परंतु तुकोबांनी केलेला हा ‘अक्षरांचा श्रम’ मराठी भाषेतून वगळला तर खरोखरच या भाषेचे तारांगण ओकेबोके वाटेल. ही तिची ताकद आहे.

परंतु ही शक्ती केवळ शाब्दिक रचनेतूनच येत नसते. तशी रचना म्हणजे ‘अनुभवावाचून सोंग संपादणी.’ अशी ‘वांझेने दाविले ग-हवार लक्षण। चिरगुटे घालून वाथयाला।।’ – पोटाला चिंध्या गुंडाळून गर्भारपणाचे लक्षण मिरविणारी कविता मराठीत मोप आहे. तुकोबांच्या शब्दांची थोरवी ही, की त्यामागे अनुभवातून आलेली शहाणीव होती. प्रचंड नैतिक ताकद होती. ही ताकद आली होती ‘सत्यासाठी माझी शब्दविवंचना’ या बाण्यातून. तिला जोड होती माणुसकी या कालातीत मूल्याची. सनातनी वैदिक धर्माशी केवळ तुकोबांचाच नव्हे, तर तमाम वारकरी संतांचा आणि त्यांच्या भक्तीपरंपरेचा संघर्ष झाला तो या मूल्याच्या जपणुकीपायी. संत हे काही जात्युच्छेदक निबंध लिहीत नव्हते. ते त्यांना अभिप्रेतही नव्हते. त्यांचे म्हणणे साधेच होते, की-

‘उंच नीच काही नेणे भगवंत। तिष्ठे भावभक्ती देखोनियां।।’

हा भगवंत ‘सजन कसाया विकू लागे मांस’ असे तुकोबा गाथ्यातून सांगतात किंवा ‘महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे। तया प्रायश्चित्त काही देहत्याग करिता नाही।।’ असे स्पष्ट बजावून ‘वर्णअभिमाने कोण झाले पावन’ असा सवाल करतात, तेव्हा त्यातील विचार निव्वळ आध्यात्मिक असूच शकत नसतो. सनातनी वैदिकांचा विरोध होता तो त्याला. ‘शूद्र’ तुकोबा गेले म्हणून तो विरोध संपला नव्हता.

वस्तुत: ‘..आणि क्काय सांगू माउली तुम्हांला, पाहता पाहता तुकोब्बाराय असे विमानात बसून सदेह वैकुंठगमनाला गेले..’ असे कीर्तनकारांनी सांगावे आणि आपल्यासारख्या भोळ्या-भाबडय़ांनी टाळावर टाळ हाणत मान डोलवावी- हे गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेले आहे. हा झाला आपल्या श्रद्धेचा भाग. पण त्यापलीकडे जाऊन समोर येणारे तर्कही कधीतरी समजून घेतले पाहिजेत.

तुकोबांच्या निर्याणानंतरच्या काळात देहूतील वातावरण कसे असेल?

म्हणजे आपल्या गावातील एका विठ्ठलभक्ताला वैकुंठाला नेण्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णूने खास विमान पाठविले म्हटल्यावर त्याच्या कुटुंबीयांना तेथे केवढा मान आला असेल! जिजाई, कान्होबा, तुकोबांची मुले यांना लोकांनी किती डोक्यावर घेतले असेल! देहूतील पुढाऱ्यांनी नक्कीच श्री तुकोबा माउली स्मारक समिती स्थापन केली असेल!

प्रत्यक्षात तुकोबा गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना देहू सोडून जावे लागले. जिजाईंना आपल्या दोन्ही मुलांसह माहेरी निघून जावे लागले. तुकोबांचे बंधू कान्होबाही गाव सोडून गेले. तेही त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची शेतीवाडी गावात असताना. ‘माझें बुडविलें घर। लेकरें बाळें दारोदार। लाविलीं काहार। तारातीर करोनि।।’ हे कान्होबांचे उद्गार आहेत. तुकोबांकडची काही जमीनही नंतर मंबाजीने बळकावली. पुढे सुमारे वीसेक वर्षांनी तुकोबांच्या मुलांनी देहूत जाऊन मंबाजीशी लढून तो तुकडा परत मिळवला असा इतिहास सांगण्यात येतो.

याचा अर्थ स्पष्ट आहे. तुकोबांना हयातीत विरोध झाला. वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी त्यांना ‘मृत्युरूप’ आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही छळ सोसावा लागला. एवढेच नव्हे तर पुढेही- अगदी कालपर्यंत या महाराष्ट्रातील सनातनी वैदिक धर्मानुयायांकडून तुकोबांचा द्वेष केला जात होता.

‘सुज्ञ शिवाजी राजा न म्हणे तुकयासी काय साधू निका

तत्पंडित प्रधाना न कळे गुण समज फार आधुनिका’

ही मोरोपंतांची आर्या. ती दुसऱ्या बाजीराव पेशव्यास उद्देशून लिहिली आहे. हा बाजीराव कसा, तर ‘त्यांचें अर्धे आयुष्य उपासतापास, जप-ध्यान, पाठप्रार्थना आणि यात्रा यांत व स्नानसंध्यासह पूजाअर्चा, होमहवन यांत जातें’ असा. तो मोठा वैदिक धर्मानुयायी. त्यामुळे तुकारामांचे अभंग म्हणजे ‘शूद्रकवन’- तेव्हा त्यांवर बंदी घालावी असे त्याचे मत होते. त्यावर मोरोपंत पराडकरांनी उपहासाने हे म्हटले आहे, की शिवाजींसारखा सुज्ञ राजा ज्या तुकोबांना खरा साधू मानतो आणि त्यांच्या पंडित पेशव्याला मात्र तुकोबांचे गुण कळत नाहीत. किती आधुनिक समज आहे त्याची! याच बाजीराव पेशव्याच्या मनात तुकारामांबद्दल एवढी अढी, की त्याने देहूत असलेल्या तुकोबांच्या अभंगांच्या काही वह्य़ा मागून नेल्या आणि त्या नष्ट केल्या. असेच दुसरे उदाहरण आहे श्रीवर्धन येथील. तेथील देशकुलकर्णी कर्णिक यांच्या दप्तरांत सापडलेल्या एका पत्रातून तुकोबांबाबत सनातन्यांच्या मनात कसा द्वेष होता हे समजते. हे पत्र १८०७ मधील आहे. श्रीवर्धन येथील देवळात कथेप्रसंगी ‘कासीनाथ गोसावी व त्याचे बंधू बापाजी’ या कथेकऱ्याने ‘तुकाराम तुकाराम’ असे म्हणावयास सांगितले तेव्हा तेथील सनातन्यांचे पित्त खवळले. ते म्हणाले, ‘आम्ही ब्राह्मण असता तुकाराम वाणगट असता आम्हास भज्यन करावयासी सांगता त्यास आम्ही करणार नाही.’ त्यावरून वाद झाला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत आले. ही हकिकत इतिहासाचार्य राजवाडे यांच्या ‘शंभर वर्षांपूर्वी तुकाराम बोवा देहूकर यांच्या योग्यतेबद्दल तंटा’ या शीर्षकाच्या लेखातली. ही उदाहरणे सुटी नाहीत. ती एका माळेतील आहेत. तिचा एक पदर हरिजनांच्या प्रवेशामुळे पंढरीचा विठ्ठल बाटणार म्हणून आधीच मूर्तीतील सत्त्व एका घागरीत काढून घेणाऱ्या आणि त्यानंतर विठ्ठल मंदिरात पायही न ठेवणाऱ्या सनातनी वैदिकांपर्यंत पोचतो आहे.

तुकोबांच्या अभंगांवर पोसलेल्या मराठी मातीत हा सनातनी विचार वाढतो आहे. वारकरी संप्रदायातील काही मुखंडच त्याला खतपाणी घालत आहेत. परिणामी ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ वाढत चालला आहे. भक्तीमार्गाने ईश्वरप्राप्ती, त्यात मधे कोणत्याही दलालाची आवश्यकता नाही, ही तुकोबांची शिकवण बाजूला सारत पुन्हा अवघा समाज कर्मकांडे, तीर्थयात्रा नि सत्संगांच्या सोहळ्यांकडे वळविला जात आहे. वस्तुत: वारकरी संप्रदाय ही हिंदू धर्मातील सुधारणावादी चळवळ. परंतु ‘उभ्या बाजारात कथा’ आणून ‘कीर्तनाचा विकरा’ करणाऱ्या पोटभरूंनी वारकरी संतांना चमत्कार करणाऱ्या बाबा-बुवांच्या पंगतीत आणून बसविले आणि अवघा बट्टय़ाबोळ केला.

खरे तर ‘गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ’ अशा प्रकारे क्षुद्र देवतांची संभावना करणारे, ‘उदकीं कालवी शेण मलमूत्र। तो होय पवित्र कासयानें।।’ असा सवाल करीत आजच्या गोभक्तांनाही झिणझिण्या आणणारे, ‘अंतरीं पापाच्या कोडी। वरी वरी बोडी डोई दाढी।।’ असे म्हणत तथाकथित ‘संतां’ना लाथाडणारे, ‘नवसे कन्यापुत्र होती। तरी कां करणे लागे पती।।’ असा बुद्धिनिष्ठ सवाल करणारे तुकोबा ही खरी मराठी माणसाची संस्कृती आहे. तो खरा मराठी बाणा आहे. संतांनी तो जागविला म्हणून शतकांच्या अंधारातून सतराव्या शतकात येथे शिवरायांसारखा सूर्य उगवला.

संतांचे नाव घेत मराठी माणसाला पुन्हा सनातनी श्रंखलांत अडकवू पाहणाऱ्या तथाकथित वारकरी मुखंडांना असा हा तुकोबा नकोच आहे. आपल्या अभंगांतून सामाजिक नैतिकतेचा, बंडखोरीचा आदर्श घालून देणारा तुकोबा या पुरातनाच्या पूजकांना नकोसा असला, तरी समाज-संस्कृतीचा गाडा व्यवस्थित चालावा यासाठी हाच तुकोबा आवश्यक आहे. त्यांचे खरे चरित्र, खरी प्रतिमा समजून घेणे आवश्यक आहे.

वर्षभर आपण येथे तसा प्रयत्न केला. तुकोबांच्या शब्दांत सांगायचे तर ‘करविली तैसीं केली कटकट। वाकडें कीं नीट देव जाणें।।’

तुकोबाचरित्रातील गुरूउपदेशासारखे प्रसंग, जिजाऊंसारख्या महत्त्वाच्या व्यक्ती, तुकोबांचे सांसारिक-पारमार्थिक जीवन अशा अनेक बाबींना येथे जागेअभावी स्पर्शही करता आला नाही. तुकोबांचे काव्य- त्यांनी अभंगांप्रमाणेच श्लोकही लिहिलेत, मराठीप्रमाणे दखनी हिंदीतही रचना केल्यात- त्याबद्दल लिहायचे राहून गेले..

त्याबद्दल पुन्हा कधीतरी, कुठेतरी..

तूर्तास- आमुचा राम राम घ्यावा!

तुलसी आंबिले  tulsi.ambile@gmail.com

(समाप्त)