सन १६३८.
महाराष्ट्राची भूमी थोरल्या दुष्काळातून आता सावरली होती. कमकुवत झालेली अहमदनगरची निजामशाही वाचविण्यासाठी चाललेले शहाजीराजांचे प्रयत्न फोल ठरले होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी शरणागती पत्करून आदिलशाहीची चाकरी धरली होती. ते कर्नाटकात निघून गेले होते. अजून बहुधा बालशिवाजी आणि जिजाबाई यांचे वास्तव्य शिवनेरीवरच होते. पुणे जहागिरीची देखरेख करण्यासाठी दादोजी कोंडदेव यांची नियुक्ती करण्यात आली होती. जहागिरीच्या प्रदेशात लावणी-संचणीची व्यवस्था लावण्याचे काम त्यांनी सुरू केले होते. तरीही अस्मानी आणि सुलतानी संकटांनी अंधारलेल्या या प्रदेशात नवी पहाट अजून उजाडायची होती. त्यासाठी अजून चार वर्षांचा अवधी होता. १६४२ मध्ये शिवराय बंगळुरातून पुण्यास परतणार होते.
याच काळात देहूच्या पंचक्रोशीत तुकाराम महाराज समाजात सद्विचारांची लावणी-संचणी करीत होते. १६३३ पासून, म्हणजे गेल्या सुमारे पाच वर्षांपासून ते अभंगरचना करीत होते. त्यांच्या भजन-कीर्तनाची कीर्ती पंचक्रोशीत निनादत होती. बारा मावळातले बारा बलुतेदार, बळीभद्र कुणबी त्यांच्या अभंगवाणीवर जीव टाकू लागले होतेच, पण देहूचे कुळकर्णी महादाजी पंत, चिखलीचे कुळकर्णी मल्हारपंत, पुण्याचे कोंडोपंत लोहोकरे, तळेगावचे गंगाराम मवाळ यांच्यासारखे कित्येक ब्राह्मणही त्यांच्या भजनी लागले होते.
धर्मशास्त्रानुसार ‘गुरू तो सकळांसी ब्राह्मण’ असे असताना ते काम हा शूद्र कुणबी-वाणी करीत होता. सेंदरी हेंदरी दैवते, तंत्र, शाक्त असे पंथ-मार्ग तर तो धिक्कारीत होताच, पण वैदिक कर्मकांडांलाही विरोध करीत होता. ‘तीर्थी धोंडापाणी। देव रोकडा सज्जनी’, ‘काय काशी करिती गंगा। भीतरि चांगा नाही तो’ असे सांगून पुरोहितशाहीच्या पोटावरच पाय आणण्याचा प्रयत्न करीत होता. वर ‘गोब्राह्मणाहिता होऊनी निराळें। वेदाचें तें मूळ तुका म्हणे’ असे सांगतानाच ‘तुका म्हणे कांही। वेदा वीर्य शक्ति नाहीं’ असे जाहीर करून थेट वेदांनाच आव्हान देत होता. कर्मकांडे टाळून साध्या सरळ सोप्या भक्तीमार्गाचा प्रचार करणाऱ्या या कुणबीवाण्याला सहन करणे आता कट्टर वैदिकांना अशक्य झाले होते. रामेश्वरभट्ट हे त्यांतलेच एक.
सत्तरी पार केलेला हा वृद्ध ब्राह्मण मूळचा पुण्याजवळच्या वाघोलीचा. त्यांचे घराणे ऋग्वेदी आश्वलायन मौन भार्गव गोत्री. वडिलांकडून चालत आलेली वाघोलीच्या कुलकर्णीपणाची आणि जोशीपणाची वृत्ती त्यांच्याकडे होती. शिवाय बहुळ, चिंचोसी आणि सिंदेगव्हाण या गावांचेही ते कुलकर्णी, जोशी होते. या वृत्तीवरून त्यांचे भाऊबंदांशी वाद झाले होते. ती भांडणे न्यायालयात गेली होती आणि त्याला कंटाळून ते योगसाधनेकडे वळले होते. वतन सोडून आळंदीला जाऊन राहिले होते. ज्ञानेश्वरांवर त्यांची भक्ती होती. ल. रा. पांगारकर, वा. सी. बेंद्रे यांच्यासारख्या तुकाराम चरित्रकारांनी त्यांचा सच्छील वगैरे शब्दांत गौरव केलेला आहे. पांगारकरांनी तर – ‘आतां प्राकृत भाषेंत अधिकारसंपन्न शूद्रालाही धर्मरहस्य सांगायला हरकत नाहीं. कारण धर्मरहस्य भगवत्कृपेनें कोणत्याही जातीच्या शुद्धचित्त मनुष्यांत प्रगट होतें. ही गोष्ट सिद्ध करून देण्याला तुकोबाचा छळ होऊन ते त्यांत यशस्वी व्हावयास पाहिजे होते व या छळाचा कस होण्याचा मान रामेश्वरभटास मिळाला!’ अशा शब्दांत रामेश्वरभट्टांची भलामण केली आहे. अशा या सच्छील रामेश्वरभट्टांनी तुकोबांवर दिवाणात दावा केला. संतचरित्रकार महिपतबाबा भक्तलीलामृतात रामेश्वरभट्टांबद्दल सांगतात –
‘त्याणें तुकयाची सत्कीर्ति पूर्ण। परस्परें केली श्रवण।
ऐकोनि द्वेष उपजला मनें। म्हणे पाखंड पूर्ण माजविलें।।
यासि उपाय योजावा निका। देशोधडी करावा तुका।’
तुकारामबुवांची सत्किर्ती ऐकूण या ‘सच्छील’ वैदिकाच्या मनात द्वेष उपजला आणि त्याने तुकारामांना देशोधडी लावण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने दिवाणात अर्ज केला.
‘म्हणे तुका शूद्र जातीचा निश्चित।
श्रुति मथितार्थ बोलतो।।
हरिकीर्तन करूनि तेणें।
भाविक लोकांसि घातलें मोहन।
त्यासी नमस्कार करिती ब्राह्मण।
हे आम्हांकारणें अश्लाघ्य।।
सकळ धर्म उडवूनि निश्चित।
नाममहिमा बोले अद्भुत।
जनांत स्थापिला भक्तिपंथ।
पाखांड मत हें दिसे।।’
महिपतबुवांच्या या श्लोकांतून रामेश्वरभट्टांसारख्या वैदिक ब्राह्मणांच्या तळपायाची आग मस्तकी कशामुळे जात होती ते समजते. रामेश्वरभट्टांनी तुकारामांवर खटला गुदरला. तुकाराम सांगतात- ‘केला चौघाचार नेलों पांचामधीं।’ चौघाचारांपुढे, पंचांपुढे नेणे, दिवाणांत घालणे ही तेव्हाची पद्धत. त्यानुसार ग्रामाधिकाऱ्याकडे तुकोबांविरुद्ध तक्रार करण्यात आली. ती ऐकून ‘चित्ती क्षोभला ग्रामाधिकारी’. त्याने देहूच्या पाटलास आदेश दिला, की ‘तुक्यासि बाहेरी दवडावा.’ आपल्या मतांच्या विरोधात असणाऱ्यांना आपला भाग सोडून जाण्यास सांगणे ही रीत तशी जुनीच.
तुकोबा या प्रसंगाबाबत लिहितात-
‘काय खावें आतां कोणीकडे जावें।
गावात रहावें कोण्या बळें।।
कोपला पाटील गांवींचे हे लोक।
आता घाली भीक कोण मज।।
आतां येणें चवीं सांडिली म्हणती।
निवाडा करिती दिवाणांत।।
भले लोकीं याची सांगितलीं मात।
केला माझा घात दुर्बळाचा।’
गावचा पाटील कोपला आहे. विरोधातील लोक संतापले आहेत. गाव सोडून जाण्याचा निवाडा दिवाणात झाला आहे. याचे कारण काय, तर एका ‘भल्या माणसाने’ घात केला. तुकारामांनी ‘चव सांडली’, अशी तक्रार केली. तुकोबा ‘भले लोकी’ म्हणून येथे ज्यांचा उल्लेख करतात ते रामेश्वरभट्टच. हा उल्लेख अर्थात उपहासाने आलेला आहे. पण मौज अशी की पांगारकरांसारखे चरित्रकार हे तुकोबांनी रामेश्वरांना दिलेले प्रमाणपत्र मानत आहेत! रामेश्वरांच्या आणि अन्य विरोधातील लोकांच्या मते, तुकोबांनी चव सांडली म्हणजे नेमके काय केले? तर ते आपल्या कवितांमधून श्रुतींचा मथितार्थ सांगतात. हे त्यांचे पहिले पाप. दुसरे पाप म्हणजे त्यांना ब्राह्मण नमस्कार करतात. आणि तिसरे पाप म्हणजे हरिकीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भाविक लोकांना मोहविले. या पापांची शिक्षा त्यांना भोगावीच लागणार होती. त्यांपैकी पहिली शिक्षा होती गाव सोडून जाण्याची. ज्या गावात तुकोबांच्या विठोबाचे मंदिर होते, ज्याची इतकी वर्षे सेवा केली, जेथे त्यांच्या पूर्वजांचे घर होते, आनंदओवरी होती, कुटुंबीय होते, सगेसोयरे होते, ते सोडून जाण्याची, तडीपारीची ही शिक्षा. सर्वत्र अंदाधुंदी असल्याच्या त्या काळात अशी शिक्षा मरणप्रायच. पण त्याहून अधिक भयंकर शिक्षा तुकारामांना देण्यात येणार होती.
महिपतीबुवांनी सांगितलेल्या चरित्रानुसार, हा आदेश मिळाल्यानंतर तुकोबा रामेश्वरभट्टांना भेटण्यासाठी तातडीने वाघोलीला गेले. त्यावेळी रामेश्वरभट्ट स्नानसंध्येस बसले होते. त्यांना तुकोबांनी दंडवत घातले आणि तेथेच हरिकीर्तन मांडले. तुकोबांना वाटले असावे, आपले अभंग ऐकून या द्विजश्रेष्ठाचे मन द्रवेल. पण तो वैदिक धर्माचा अभिमानी ब्राह्मण म्हणाला, ‘तूं तरी यातीचा शूद्र निश्चित।। कवित्व बोलसी कीर्तनांत। त्यात अर्थ उमटत श्रुतीचे।। अधिकार नसतां बोलसी कैसें। शास्त्रविरुद्ध आम्हांसि दिसे। तरी वक्तया आणि श्रोतयांस। रौरव असे यातना।।’ – तू अधिकार नसतानाही जो धर्म सांगतो आहे तो शास्त्रांविरोधात आहे. तो ऐकल्यास तुझ्याबरोबरच श्रोत्यांनाही रौरवनरकात पडावे लागेल. या पापकृत्याचा नाश करायचा एकच मार्ग होता. तो म्हणजे तुकोबांनी कविता करणे थांबविणे. आता प्रश्न उरला तो आधीच केलेल्या अभंगांचा. त्यांचे काय करायचे? रामेश्वराने सांगितले, ‘लिहिले कवित्व आपुल्या हातें। बुडवीं उदकांत नेऊनी।।’
ही धर्माची सेन्सॉरशिप. कोणाही कवीला, लेखकाला त्याच्याच हातून त्याचे साहित्य नष्ट करण्यास सांगणे म्हणजे जणू आत्महत्या करण्यासच भाग पाडणे. खरे तर येथे विचारांचा मुकाबला विचारांनी करता आला असता. पण धार्मिक कट्टरतेला मुळात विचारांचेच वावडे असते. विरोधी ते संपविणे, हेच त्यांचे ध्येय असते.
तुलसी आंबिले tulsi.ambile@gmail.com

The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
Sangli
सांगली : तक्रार मागे घेण्यासाठी हॉस्पिटलकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी
Shivsena Madha
सोलापूर : माढ्यात भाजपचा उमेदवार बदलण्यासाठी शिवसेनेचाही दबाव
Appointment of financial institution
विरार-बोळींजमधील घरांच्या विक्रीसाठी वित्तीय संस्थेची नियुक्ती