क्रिकेट एके क्रिकेट हेच समीकरण असलेल्या आपल्या देशात पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर हे सगळं पॅकेज कबड्डीला मिळवून देणं ही अर्थातच सोपी गोष्ट नव्हती. स्टार स्पोर्ट्सने ‘प्रो कबड्डी’च्या माध्यमातून कबड्डीसारख्या देशी खेळाच्या बाबतीत हे आव्हान पेलून दाखवले आहे.

मुंबईत गगनचुंबी टॉवर्सच्या गर्दीत एक चाळ. संध्याकाळची वेळ. चाळीलगतच्या उपलब्ध जागेत शामियाना उभारलेला. व्यासपीठावर किमान ४० ते ५० खुच्र्या. डाव्या कोपऱ्यात विंगेत पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्हे, प्रमाणपत्रांची चळत मांडलेली. उजव्या बाजूला पोडियम. तारस्वरात बोलणारा कार्यकर्ता कम अँकर. त्याच्या कानात प्रॉम्प्टिंग करणारी मंडळी. चाळीच्या चारही बाजूंना भव्य कबड्डी स्पर्धेचे होर्डिग लागलेले. स्थानिक नगरसेवक, आमदार (तात्या, अण्णा, बाबासदृश टोपणनाव) यांच्या प्रेरणेने असा स्पष्ट उल्लेख. वातावरणात एकूणच लगबग. काहीतरी वेगळं बघायला मिळणार म्हणून परिसरातली लहान मुलं बागडताना दिसतात. उद्घाटनीय सामन्यात खेळणारे संघ, त्यांचे प्रशिक्षक वॉर्मअप करून जर्सी परिधान करून तय्यार होतात. सातला सुरू होणारा कार्यक्रम लवकरच सुरू होईल असं पावणेआठला सांगण्यात येतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे आणि ज्यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन आहे ते माननीय महोदय कुठल्या तरी कामात अडकलेले. इकडून कार्यकर्त्यांचे सतत फोन सुरू. जमलेली गर्दीही मॅच सुरू होत नसल्यामुळे वैतागलेली. डीजेवरची गाणी ऐकूनही कंटाळा आलेला. मॅच सुरू करावी तर महोदयांचा अपमान व्हायचा आणि थांबावं तर खेळाडू आणि प्रेक्षकांचा अंत किती पाहणार अशा द्विधा मन:स्थितीत संयोजक. निर्णय कोणालाच घेता येत नाही. अखेर साडेआठला महोदय येतात. पाच हजारची फटाक्यांची माळ लागते. नमस्कार चमत्कार होतात. भाषणबाजी सुरू होते. शाल, श्रीफळ सगळं आटोपतं. समोरची मंडळी फारच खोळंबलेली आहेत हे जाणून नऊ वाजून दहा मिनिटांनी माननीय महोदयांच्या हस्ते नाणेफेक होते. आणि पुढच्या पाच मिनिटांत सामन्याला सुरुवात होते. कबड्डी सामन्यांचे हे वर्षांनुवर्षे चालत आलेलं चित्र. संघटक कोणीही असो, शहर कोणतंही असो, या चित्रात बदल नाही.

mumbai chembur to jacob circle monorail marathi news
स्वदेशी बनावटीच्या मोनोचे तीन डबे मुंबईत, उर्वरित नऊ मोनोरेल डिसेंबरपर्यंत ताफ्यात दाखल
Loksatta viva A glamorous celebration of fashion Lakme Fashion Week Geo World Garden
लॅक्मे फॅशन वीकची सेलिब्रिटी मांदियाळी
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: “मुंबईचा राजा…” अहमदाबादमध्ये रोहित शर्माच्या चाहत्यांनी केलं हार्दिक पांड्याला ट्रोल, VIDEO व्हायरल
Girls intimate Holi Celebration Inside Delhi Metro
“अंग लगा दे रे, मोहे रंग…”, मेट्रोमध्ये तरुणींच्या अश्लील डान्समुळे ओशाळले प्रवासी! Viral Video पाहून संतापले नेटकरी

मात्र स्टार स्पोर्ट्सने जाणीवपूर्वक बदल घडवून आणला. मातीत खेळला जाणारा म्हणजे रबिश अशी संभावना होणाऱ्या खेळाला त्यांनी टीव्हीला साजेशा स्वरूपात कसं आणलं हे जाणून घेणं रंजक आहे. एका खेळाला व्यवसायधिष्ठित प्रारूपात आणणं अवघड आहे, पण विचारपूर्वक निर्णय घेत स्टार स्पोर्ट्सने हे शिवधनुष्य पेललं आहे. यासाठी त्यांनी काही कठोर निर्णय घेतले आणि त्यावर ते ठाम राहिले. प्रो कबड्डीमुळे पैसा, प्रसिद्धी, स्थैर्य मिळालेल्या सर्वसाधारण कुटुंबातल्या खेळाडूंच्या कहाण्या वाचकांसमोर येत आहेत. पण हा प्रकल्प यशस्वी करून दाखवण्यासाठी पडद्यामागे होणारे प्रयत्न दुर्लक्षित राहतात. प्रो कबड्डीचा चौथा हंगाम नुकताच संपला. त्यानिमित्ताने या प्रयत्नांचा घेतलेला वेध.

  • मातीवर होणाऱ्या कबड्डीच्या स्पर्धा पाहायला भारी वाटतात. पण प्रक्षेपणाच्या दृष्टीने ते गैरसोयीचं आहे. माती उधळते तसंच सगळ्यांनाच अशा वातावरणात खेळता येईलच अशी खात्री नाही. दमा, अस्थमा, अ‍ॅलर्जी असू शकते. स्पर्धेत सहभागी होणारे विदेशी खेळाडू मातीवर खेळायला तयार होणार नाहीत. स्पर्धेचे सामने इनडोअर होणार असल्याने मातीचे मैदान तयार करता येणार नाही. हे लक्षात घेऊन मॅटवरच सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. डांबरी रस्त्याला पर्याय झालेले पेव्हर ब्लॉक जसे निखळतात तसं मॅटचं होऊ नये यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. जिगसॉ पझलप्रमाणे जोडण्यात येणारे मॅट एकसंध राहावे यासाठी काळजी घेण्यात येते. यासाठी एक स्वतंत्र चमूच तयार करण्यात आला आहे. प्रत्येक स्टेडियममध्ये सामने सुरू होण्यापूर्वी दोन दिवस ही मंडळी जातात आणि मॅट अंथरतात. टीव्हीवर कुठला रंग चांगला दिसेल यासाठी विविध रंगांच्या मॅटची चाचणी घेण्यात आली. प्रक्षेपणासाठी निळ्या आणि जांभळ्याकडे झुकणाऱ्या रंगाला पसंती देण्यात आली. हा रंग डोळ्याला सुखावतो. सौम्य वाटतो आणि प्रकाश परावर्तित करतो.
  • देशभरात कबड्डी सर्वस्वी नवीन नाही. प्रत्येकाने शाळेत हा खेळ खेळलेला असतो. अन्य खेळांमध्ये ‘एक विरुद्ध एक’ मुकाबला असतो किंवा ‘संघ विरुद्ध संघ’ अशी सांघिक लढत होते. मात्र कबड्डीत ‘एक विरुद्ध सात’ असा थरार रंगतो. कॉन्टॅक्ट स्पोर्ट अर्थात शारीरिक जवळीकता असणाऱ्या या खेळातला थरार टिपण्यासाठी तब्बल १८ कॅमेरे तैनात केले जातात. १३ बाय १० मीटरच्या क्रीडांगणावरचा प्रत्येक क्षण प्रेक्षकांपर्यंत नेण्याचं काम हे कॅमेरे करतात. प्रॉडक्शन कन्सोलवर निर्मात्यासमोर १८ फीड उपलब्ध होतात. उदा. काशिलिंग आडकेची ‘हनुमान उडी’ प्रसिद्ध आहे. तो नक्की काय करतो हे असंख्य कॅमेरे टिपतात. यापैकी सगळ्यात उत्तम चित्रण निर्माता पक्कं करून दाखवतो. याव्यतिरिक्त ‘हँड हेल्ड’ नावाचा अत्याधुनिक कॅमेरा घडामोडी टिपत असतो. एखादी चढाई सुरू असताना, टाइम आउटदरम्यान प्रशिक्षक खेळाडूंना सूचना देत असताना हा कॅमेरा त्यांच्या मागून चित्रीकरण करतो. आपण मैदानावर तिथेच आहोत असा भास हे चित्रीकरण देतं. हा कॅमेरा म्हणजे जटिल मशीन असतं. झाडाला वेल लटकावी तसं या मशीनने कॅमेरामनच्या शरीराला वेढलेलं असतं. या कॅमेऱ्याचं वायरींचं जंजाळ सांभाळण्यासाठी साहाय्यक असतो. खर्चीक असा हा कॅमेरा खास प्रो कबड्डीसाठी राखून ठेवण्यात आला आहे. मुख्य कोर्ट, डगआउट, पंच, सामनाधिकारी, समालोचक, सेलिब्रेटी कक्ष आणि चाहते या सगळ्यांवर बारीक नजर असते. प्रो कबड्डी लीग रुजण्यासाठी खेळ सर्वार्थाने दिसणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच कॅमेऱ्याद्वारे सर्वसमावेशक चित्र टिपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.
  • प्रो कबड्डी लीगच्या निमित्ताने विविध स्तरातल्या लोकांनी या खेळाला आपलंसं केलं आहे. त्यांना कबड्डी म्हणजे काय हे उमगू लागलं. याचं कारण ग्राफिक्स. सामना सुरू असताना मोठय़ा आकाराची ग्राफिक्स टीम अविरत राबत असते. दोन्ही संघांची गुणसंख्या दर्शवणारा धावफलक, कोणाची चढाई आहे? निर्णायक चढाई आहे का? यशस्वी चढाया किती, अपयशी चढाया किती? खेळाडूंची वैयक्तिक आकडेवारी, बोनस गुण, लाल-पिवळे-हिरवे कार्डाबद्दल माहिती हे सगळं सातत्याने अपडेट होत राहतं. कबड्डी सामन्याचा वेग प्रचंड असतो. त्याच वेगाने या गोष्टी चाहत्यांना स्क्रीनवर दिसतात. सोप्या भाषेत ठसठशीतपणे गोष्टी दिसत असल्याने सामन्याची स्थिती काय हे सहजपणे कळतं. कबड्डीचा गंधही नसलेल्या माणसाला एक सामना पाहिल्यावर किमान बेसिक कळू लागेल अशा पद्धतीने ग्राफिक्सची रचना करण्यात येते. प्रेक्षकांना ग्राफिक्सद्वारेच घडामोडी समजत असल्याने कुठलीही चूक होऊन चालत नाही.
  • अटेन्शन स्पॅन ही संकल्पना टीव्हीविश्वात लोकप्रिय आहे. गॅझेट्स आक्रमणानंतर लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी होऊ लागला आहे. क्रिकेट म्हणजे खेळांचा राजा. कसोटी क्रिकेटला अव्हेरल्यानंतर एकदिवसीय क्रिकेट आलं. आता तेही रटाळ आणि वेळखाऊ वाटू लागलं आणि ट्वेन्टी-२० आलं. पाच दिवसांहून आता तीन तासांचं क्रिकेट लोकप्रिय झालं आहे. कबड्डी सामन्याचा कालावधी ४० मिनिटांचा पक्का करण्यात आला. कालावधी इतकाही नको की प्रेक्षक कंटाळतील आणि इतका कमी नको की सामना संपला कधी कळू नये. टेलिव्हिजन प्रक्षेपणासाठी नियम बदलण्यात आले. सातत्याने रिकाम्या चढाया होऊ लागल्या तर नीरस होईल हे लक्षात घेऊन तिसरी चढाई निर्णायक (डू ऑर डाय रेड) करण्यात आली. यामुळे चुरस टिकून राहते. चढाईपटूला चढाईसाठी ३० सेकंद एवढाच कालावधी निश्चित करण्यात आला. त्यातही १० सेकंद शिल्लक राहिल्यावर बझर वाजू लागतो. जेणेकरून चढाईपटूला समजतं की आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे. वेळेची वेसण अत्यंत काटेकोरपणे पाळली जाते. स्थानिक कबड्डीच्या सामन्यांमध्ये होणारा उशीर पाहून स्टार स्पोर्ट्सने एक ठोस वेळापत्रक तयार केलं. सामन्याआधीचा कार्यक्रम+खेळाडूंच्या मुलाखती+ प्रसिद्ध व्यक्तीद्वारे राष्ट्रगीत गायन+नाणेफेक असं साडेसात ते आठ अध्र्या तासाचं पॅकेज तयार करण्यात येतं. थेट प्रक्षेपण असल्याने यात उशीर, चालढकल होऊन चालत नाही. मध्यंतरादरम्यान बच्चेकंपनीची मैत्रीपूर्ण लढत खेळवण्यात येते. सामना संपल्यावर पुरस्कार वितरण सोहळा असतो. मात्र हे दिलेल्या वेळेतच आटोपलं जातं. रात्री ८ ते १० वेळेदरम्यान जाहिरातींचे स्लॉट विकलेले असतात. त्याद्वारे निधी निर्माण होत असल्याने वेळेची शिस्त पाळली जाते.
  • खेळताना खेळाडू कबड्डी कबड्डी म्हणतात का? एकमेकांशी काय बोलतात? प्रतिस्पध्र्याना उद्देशून आक्षेपार्ह भाषा वापरतात का? हे सगळं टिपण्यासाठी मॅटखाली कळणारही नाही असे माइक बसवण्यात आले आहेत. याद्वारेच चढाई पकडींच्या दरम्यानचा ध्वनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. याव्यतिरिक्त खेळाची लोकप्रियता वाढण्यात इंग्रजी आणि हिंदी भाषेतील समालोचन महत्त्वाचे ठरले आहे. माजी खेळाडू खेळातले जाणकार आहेत. मात्र सतत अर्थपूर्ण प्रवाही बोलणं त्यांना जमणं अपेक्षित नाही. यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं.
  • कबड्डी खेळणारे बहुतांशी खेळाडू आर्थिकदृष्टय़ा सर्वसाधारण घरातले आहेत. जे खेळाडूंचं तेच पंच, सामनाधिकाऱ्यांना लागू. कॅमेऱ्यासमोर दिसणं, इंग्रजी-हिंदी भाषेत मुलाखती देणं, पंचतारांकित हॉटेलांमध्ये वावर हे सगळंच त्यांच्यासाठी नवीन होतं. त्यांचं नवखेपण, बुजरेपणा जगाला दिसू नये यासाठी स्टार स्पोर्ट्सतर्फे कार्यशाळांचं आयोजन करण्यात येतं. अभिनेता आणि संवादक बोमन इराणी यांनी खेळाडूंना तसंच तांत्रिक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. कॅमेऱ्याला आत्मविश्वासाने सामोरं जात जाहिराती, प्रोमो, कार्यक्रम यांमध्ये कसं सहभागी व्हावं यासाठी विशेष सत्र आयोजित करण्यात येतं. तांत्रिक अधिकाऱ्यांच्या तुकडय़ा करण्यात आल्या आहेत. ते आलटून-पालटून काम करतात. त्यांच्यातील बाँडिंग वाढावं यासाठीही काही उपक्रम राबवले जातात. थेट प्रक्षेपणादरम्यान संकलनाला वाव नसतो. मुलाखतीदरम्यान खेळाडू गोंधळून जाऊ नये यासाठी असंख्य रंगीत तालमी घेतल्या जातात. अँकरिंग करणाऱ्या मंडळींनाही कबड्डी नवीन होतं. बोलताना त्यांच्याकडून त्रुटी राहून हसं होऊ नये यासाठी त्यांचे रीतसर क्लासेस घेण्यात आले. दर दिवशी अँकर काही तरी नवीन माहिती चाहत्यांसमोर आणतात. त्यांना हे पुरवण्यासाठी एक रिसर्च टीम काम करीत असते.
  • खेळाची स्पर्धा असली तरी भारतीय चाहत्यांना संगीत आणि एकूणच सांस्कृतिक माहौल आवडतो. याची पुरेपूर जाणीव असलेल्या स्टार स्पोर्ट्सने त्यानुसार आखणी केली. सामन्यादरम्यान ‘ये दुनिया का खेल है’ नावाचं गुणगुणायला लावणारं शीर्षकगीत वाजत राहतं. मैदानात प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी डीजे असतो. असंख्य प्रकारचे रंगीबेरंगी प्रकाशझोत विहरत असतात. शक्यतो दररोज एका सेलिब्रेटीला आणण्याचा संयोजकांचा प्रयत्न असतो. ही व्यक्तीच राष्ट्रगीत म्हणते. राष्ट्रगीताचं समूहगान वातावरणात उत्साह भरते. परंतु थेट प्रक्षेपणात राष्ट्रगीत म्हणताना कोणतीही गडबड होऊ नये यासाठी सामन्याआधी दोन तास रंगीत तालीम घेण्यात येते. त्यानंतर सेलिब्रेटीच्या आवाजात राष्ट्रगीत रेकॉर्ड करण्यात येतं. थेट प्रक्षेपणाच्या वेळी रेकॉर्डेड आवाजाला ओठांच्या हालचाली मॅच करणं एवढंच सेलिब्रेटीचं काम. बॉलीवूड बादशाह अमिताभ बच्चन यांचा आवाज हुकमी एक्का. त्यांच्या आवाजात स्पर्धेच्या जाहिराती रेकॉर्ड करण्यात आल्या.

क्रिकेटला जनाधार आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) यशस्वी झाली. क्रिकेटकडून प्रेरणा घेत बहुतांशी खेळांमध्ये लीग सुरू झाल्या. मात्र आर्थिक घोळ आणि असंख्य कारणांमुळे या लीग डबघाईला आल्या. प्रो कबड्डी लीगला स्टार स्पोर्ट्सनं एक व्यावसायिक प्रारूप म्हणून पाहिलं. अर्थातच नफा कमावणं हा त्यांचा उद्देश होता. यात वावगं काहीच नाही. सुरुवातीला मशाल स्पोर्ट्स कंपनीच्या उपक्रमाचे स्टार स्पोर्ट्सकडे प्रक्षेपण अधिकार होते. मात्र लीगच्या पहिल्या हंगामानंतर त्यांनी मशाल स्पोर्ट्समध्ये गुंतवणूक करीत थेट लीगचं पालकत्व मिळवलं. नफा कमावण्यासाठी आणि टीव्हीला साजेसं आऊटपूट होण्यासाठी त्यांनी विविध क्लृप्त्या लढवल्या. याचा फायदा त्यांना झाला आणि त्याबरोबरच कबड्डीपटूंना श्रीमंत होण्याचा मार्ग गवसला. कबड्डीपटू ‘ब्रॅण्ड’ झाले. कबड्डीच्या संघाचंही र्मचडायझिंग होऊ लागलं. हा सकारात्मक परिणाम समजून घेण्यासाठीच केलेला हा खटाटोप!
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com