टीव्हीवरच्या चॅनल्सच्या गर्दीत इनसिंक चॅनल दिसतं आणि अनपेक्षितपणे रिमोट बाजूला ठेवला जातो. शास्त्रीय संगीतावर आधारित हे चॅनल गेली तीन र्वष संगीतप्रेमींचं मनोरंजन करत आहे. चोवीस तास शास्त्रीय संगीताची मेजवानी देणारं हे चॅनल लोकप्रिय आहे.

‘इनसिंक’ असा शब्द गुगलवर टाकून तुम्ही मराठीत अर्थ विचारलात तर उत्तर येतं- ‘जुळणारे’. इनसिंकपेक्षा सिंक्रोनाइझ किंवा सिंक्रोनायझेशन या संकल्पनेशी आपण परिचित आहोत. एकत्रीकरणाची प्रक्रिया असा त्याचा ढोबळमानाने अर्थ होतो. विविध प्रवाह त्यांच्या विवक्षित गुणवैशिष्टय़ांसह एकत्र येणं आणि त्यातून मिश्र कोलाज तयार होणं असं काहीसं इनसिंकमध्ये अपेक्षित असतं. बुद्धिजीवी, इंटलेक्च्युअल वाटू लागलं ना. पण तसं काहीच नाही. टीव्हीवरच्या भारंभार चॅनल्समध्ये इनसिंक नावाचा चॅनल आहे. नावातच असा बुद्धिवादी विचार दडलेला. मग त्या चॅनलवर काय पाहायला मिळेल असं कुतुहल दाटलं आणि मग एक सफर केली इनसिंकची.

जागतिकीकरणाचा टप्पा टीव्ही इंड्रस्टीसाठी फारच महत्त्वाचा. विचारांची, तंत्रज्ञानाची वेस विस्तारून आर्थिक भरारी घेण्याचं बळ जागतिकीकरणातूनच मिळालं. आपल्याकडे मुळातच टीव्हीचं आगमन उशिरा झालं. सुरुवातीला टीव्हीचा वावर शहरांपुरता मर्यादित होता. गेल्या दहा वर्षांत छोटय़ा गावांपर्यंत टीव्हीने कक्षा रुंदावल्या. मात्र त्यापूर्वी टीव्ही बघण्याची संकल्पना पार्टटाइम होती. दिवसभराच्या रगाडय़ातून सुटका झाली की चार घटका मनोरंजनासाठी आधार इतक्यापुरताच टीव्ही मर्यादित होता. चोचले, चंगळ किंवा अभिरुची असं काहीही टीव्हीशी संलग्न होण्याचे दिवसच नव्हते. आसपासच्या जगातल्या गोष्टी सांगणाऱ्या बातम्या, कृषीविषयक कार्यक्रम, साध्या सोप्या मालिका, चित्रगीत ही पायाभूत संरचना होती. जागतिकीकरणानंतर टीव्ही इंडस्ट्रीत पैशाचा ओघ वाढला. परदेशी कंपन्या, माणसं यांना भारत उत्तम मार्केट असल्याचं उमगलं. साचेबद्ध विचारांपलीकडे जाऊन लाइफस्टाइल अर्थात विशिष्ट विषयांना वाहिलेले चॅनेल तयार होऊ शकत नाही हा विचार रुजला. यातूनच २४ तासाच्या वृत्तवाहिन्यांची दुकानं फोफावली. लहान मुलांसाठी फँटसी विश्व उलगडणारी कार्टून्स चॅनल्स जोम धरू लागली.

प्रादेशिक वाहिन्यांनी उचल खाल्ली. लेटेस्ट पिक्चरची गाणी, प्रोमो, ट्रेलर्स, टीझर्स दाखवणाऱ्या म्युझिक चॅनल्सचं उखळ पांढरं झालं. शास्त्रीय संगीत हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक. संगीताची आवड जोपासणाऱ्या शहरांमध्ये मैफली होतात, गान महोत्सव नियमित होतात. पण हे सगळं टीव्हीवर आणण्याचा प्रयत्न होत नसे. याचं कारणही साहजिक होतं. संगीत आदळआपट मंडळी अर्थात डीजे गटाची गाणी आवडणारा वर्ग मोठा आहे. पसाराभर वाद्यांच्या गोंगाटात गाण्याचे शब्द कळू नयेत असा हल्लीचा ट्रेण्ड आहे. मधुरता, गेयता, लय, सूर यापेक्षा पार्टी किंवा धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी हमखास वाजवता येतील अशा कर्कश गाण्यांना पसंती असते. रिक्षातही ढॅणढॅण आवाजात हीच गाणी ऐकवली जातात. त्याचवेळी शास्त्रीय संगीत म्हणजे काही तरी कठीण, जटिल असं रुढ आहे. शास्त्रीय संगीत ऐकून समजण्यासाठी कान तयार असावा लागतो, तुम्ही दर्दीच असावे लागते, असे गैरसमज उगाचच पसरलेले आहेत. यातूनच टीव्ही आणि शास्त्रीय संगीत यांची फारकत झाली. सरकारी वाहिनीवरदेखील पाऊलखुणा सदरातले कार्यक्रम सोडले तर शास्त्रीय संगीताला दूरच ठेवले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत सधन असणारे आणि त्याच वेळी कलासक्त मंडळींची संख्या वाढू लागली. प्रत्येक वेळी कामधामं सोडून मैफलीला जाणं शक्य नसतं. शास्त्रीय संगीत कळत वगैरे नाही पण कानाला गोड लागतं. ऐकलं तर सुकून मिळतो अशी मंडळीही बरीच आहेत. अशा वर्गाचा लसावि काढून २०१३ मध्ये रतीश तागडे यांनी एक प्रयोग सादर केला. शास्त्रीय संगीताला वाहिलेलं २४ तासांचं चॅनेल- इनसिंक.

व्यवसायाने कंपनी सेक्रेटरी असणाऱ्या रतीश तागडे यांनी हा घाट घातला. रतीश यांच्याकडे संगीत संदर्भातील तीन पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेत. इंदूर येथील देवी अहिल्या विद्यापीठात व्हायोलिन विषयात त्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. इव्हेंट मॅनेजमेंटच्या अंतर्गत त्यांनी असंख्य संगीत मैफली, रजनींचे आयोजन केले. असेच कार्यक्रम ऑडिओ व्हिज्युअल फॉरमॅटमध्ये आणले तर या विचारातून हा चॅनेल सुरू झाला. नफा हा एकमेव उद्देश समोर ठेवून चॅनेल सुरू न झाल्याने व्यवस्थापन संरचनाही वेगळी आहे. संगीत क्षेत्रात ज्यांचं नाव घेतल्यावर आदराने कानाला हात लावला जातो असे पंडित शिवकुमार शर्मा, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार आणि गायक शंकर महादेवन, पंडित हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद रशीद खान, निलाद्री कुमार, तबलावादक विजय घाटे अशी जाणकार मंडळी चॅनेलच्या सल्लागार मंडळावर आहेत. चॅनलवर कुठल्या स्वरूपाचे कार्यक्रम असावेत, शास्त्रीय संगीताची सोप्या भाषेत मांडणी कशी करता येईल या दृष्टीने हे सल्लागार मंडळ काम करते.

चॅनल चालवणे अत्यंत कठीण गोष्ट आहे. चांगल्या प्रॉडक्शन मूल्यांसह कार्यक्रमांची निर्मित्ती करणे सोपे नाही. शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्यांनी चॅनलवरचे कार्यक्रम नुसते पाहून चॅनलचा गाडा हाकणे शक्य नाही. त्यासाठी पुरेशा जाहिराती मिळणे अत्यावश्यक आहे तरच निधी निर्माण होऊ शकतो. तीन वर्षांनंतरही चॅनलवर फारशा जाहिराती नसतात. प्रेक्षकांसाठी ही सुखद गोष्ट असली तर चॅनलच्या प्रकृतीला ते चांगले नाही. लोकाश्रय वाढवण्यासाठी या चॅनलवर आता जुन्या चित्रपटातील गाणी लावली जातात. हल्लीच्या गाण्यांमध्ये दम नाही म्हणणाऱ्यांसाठी ही गाणी खजिनाच आहे मोठा. ही नवीन अ‍ॅडिशन असली तरी मूळ गाभा तसाच आहे.

‘रागा’ नावाचा कार्यक्रम आहे. एक विशिष्ट राग अशी संकल्पना घेऊन नामवंत गायक तसंच वादक तो राग सादर करतात. शास्त्रीय संगीताचा अभ्यास असलेल्या मंडळींना ही पर्वणीच. मात्र ज्यांना जुजबी कळतं किंवा काहीही कळत नाही त्यांना ऐकण्यासाठी आणि कान तयार होण्यासाठी उत्तम संधी आहे. विशिष्ट प्रहरी विशिष्ट राग अशीच संरचना अस्तित्वात होती. त्यानुसारच कार्यक्रम योजलेला असतो. गूंज या शब्दांतच नादमयता आहे. साहजिकच या कार्यक्रमात काही तरी अस्सल ऐकायला मिळेल याची खात्री होती. आणि झालंही तसंच. फ्युजन या शब्दांतच विविध मिश्रणांची गंमत आहे. याच गमतीचा अनुभव फ्युजन कॅफे या कार्यक्रमात घेता येतो. शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत यांचा अनोखा मेळ साधत तयार झालेल्या कलाकृती हे कार्यक्रमाचे वैशिष्टय़. अनेक दिग्गज गायक आणि वादक कार्यक्रमात भन्नाट कलाविष्कार सादर करतात. दोन विभिन्न विचारधारा एकत्र केल्यानंतरही तयार होणारी कलाकृती किती अनोखी असू शकते याचा प्रत्यय या कार्यक्रमातून येतो. बॅण्ड ही युवा पिढीची खास ओळख. शास्त्रीय संगीताला बॅण्डची जोड दिली तर काय निर्माण होऊ शकतं याचा प्रत्यय या कार्यक्रमात येतो. शास्त्रीय संगीत म्हटल्यावर रागदरबारी मैफलीची अनुभूती मिळावी अशी दर्दीची इच्छा क्लासिकली युवर्स कार्यक्रमाद्वारे पूर्ण होऊ शकते. अनेक दिग्गज तसंच नवीन कलाकारांच्या रेकॉर्डेड किंवा लाइव्ह मैफलींचा आस्वाद घेता येऊ शकतो. गायक, त्याला साथ करणारी मंडळी, साथीला तंबोरा, तबला अशी ठाशीव मैफल घरबसल्या ऐकायला मिळणं म्हणजे सुखच नाही का! संगीत म्हणजे सर्वोत्तम शक्तीला आपलंसं करणाचा राजमार्ग. भजन हा त्यातला महत्त्वाचा प्रकार. आपल्या संस्कृतीतील बहुतांशी भाषांमध्ये गोड भजनं आहेत. ही भजनं गोड गळ्याद्वारे आळवली गेली तर क्या बात है- एक तूही है. दैनंदिन व्यापातून मुक्त व्हावं आणि सगळे ताणतणाव बाजूला ठेऊन निवांतपणे ऐकावं असा हा कार्यक्रम. चॅनेल्सच्या भाऊगर्दीत भजन ऐकायला मिळणं दुर्मीळच. त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे ओअ‍ॅसिसच. शास्त्रीय संगीतातील दिग्गजांना वंदन करण्याचा दिवस म्हणजे त्यांचा वाढदिवस. इनसिंक कार्यक्रम प्रत्येक दिग्गजांच्या वाढदिवसाला सुरेल भेट देतात. कलाकाराच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा आणि त्या कलाकाराची खास ओळख असलेली गाणं किंवा धून पाश्र्वसंगीत म्हणून वाजत असतं. यानिमित्ताने आपल्याला दिग्गजांची अनायासे माहिती मिळते आणि कानही तृप्त होतात. कर्नाटक संगीताला वाहिलेला कर्नाटिकम हा असाच बावनकशी प्रकार. ‘तेरे सूर मेरे गीत’ कार्यक्रमाअंतर्गत १९५० ते १९८० कालावधीतल्या शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपटातील गाण्यांची मेजवानी असते. पाश्र्वगायन, सुफी, गझल, लोककला हा असा मोठा परीघ व्यापणारा कार्यक्रम म्हणजे म्युझिकल कनेक्ट. अनेक कलाकारांच्या खासगी मैफली, परफॉर्मन्सेस ऐकायला मिळतात.

वेगळा विचार करता येणं नावीन्य नाही. तो विचार अंगीकारून निभावणं खडतर गोष्ट आहे. नफा-तोटय़ाच्या ताळेबंदात संगीतासारख्या मुक्तछंदाला मापणं तसं अन्यायकारीच. मात्र विचार पक्का असेल तर प्रवाहाविरुद्धची गोष्टही प्रत्यक्षात साकारता येतं याचं हे चॅनेल उत्तम उदाहरण ठरावं. आजची तरुण पिढी म्हणजे एमटीव्ही, व्हीटीव्ही आणि बाबा सहगल ते यो यो हनी सिंग यांच्या पार आहारी गेली आहे, अशी वाक्यं ज्येष्ठ नागरिकांच्या तोंडी कायम असतात. पण हीच तरुण मंडळी कटय़ारच्या निमित्ताने शास्त्रीय संगीताला आपलं म्हणते तेव्हा नव्या पिढीचा सूर सच्चा असल्याची ग्वाही मिळते. इनसिंक हा असाच एक सच्चा प्रयत्न. बाजारू गणितांच्या अर्थकारणात तो किती काळ तग धरेल, त्यांना स्वरूप बदलावे लागेल का हे येणारा काळच ठरवील. सर्फिग करताना काही मिनिटं का होईना सूरमयी होण्याची संधी मिळतेय. तिचं सोनं करा!
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com