गॅझेट्सनी आपलं आयुष्य व्यापून टाकलं आहे. मग आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या टीव्ही मालिका आणि त्यातल्या व्यक्तिरेखा तरी याला अपवाद कशा असतील?

टीव्ही मालिका हिंदी असो वा मराठी. एक कथा असते. कथेत पात्र असतात. हिरो, हिरोइन, घरातले, खलनायक अशी पात्रांची वर्गवारी होते. काही पात्रांना पडद्यावर अधिक वेळ चमकता येतं. काही पात्रं तोंडी लावण्यापुरती असतात. मालिका सुरू होते. दर बुधवारी समोर येणाऱ्या टीआरपीच्या आकडय़ांनुसार मालिकाचा ट्रॅक ठरतो. माहिती तंत्रज्ञानामुळे मालिका निर्मिती आणि एकूणच सादरीकरणात मोठय़ा प्रमाणावर बदल झाला आहे.

डेली सोप अर्थात दैनंदिन मालिकेतही चित्रपटासारखी कॅमेऱ्याची कमाल अनुभवायला मिळू शकते. तंत्रज्ञानाचा आणखी एक आविष्कार विविध मालिकांमध्ये पाहायला मिळतो आहे. आतापर्यंत दोन पात्रं समोरासमोर बोलायची. एका फ्रेममध्ये दोन माणसं एकमेकांशी बोलताना कथानक घडायचं. वाचिक अभिनय, शरीराची हालचाल, समोरच्या व्यक्तीच्या हावभावाला प्रतिसाद देणं, समोरच्या अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या ऊर्जेशी साधम्र्य राखत प्रसंग साकारणं हे पैलू अनुभवता यायचे.

फोन आणि त्यातही स्मार्टफोन्सच्या आगमनानंतर आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा आयाम बदलला आहे. थेट समोरासमोर बोलण्यापेक्षा टेक्स्ट करणं ही आपली सवय झाली आहे. फेसबुकवर तासन्तास बोलणारी माणसं समोर आल्यावर तितक्या सहजतेने बोलू शकत नाहीत. व्हॉट्सअ‍ॅपवर भराभरा टाइप करणारी मुलं-मुली तोच व्यक्ती समोर आला तर गप्पांची मैफल रंगवू शकत नाहीत. संवाद साधताना, वाढवतानाच कुठे तरी एकटं विलग होणं तंत्रज्ञानाने आपल्याला भाग पाडलं आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर छप्पन्न ग्रुपमध्ये अ‍ॅक्टिव्ह असणारी माणसं प्रत्यक्षात एकटीच असतात. किंवा फेसबुकवर ज्यांच्या पोस्ट्सला धडाधड लाइक्स, कमेंट्स येतात ती माणसं प्रवाहापासून, लोकांपासून दूर असतात. हे एकत्र येताना विखुरणं आपल्या मालिकांमध्ये दिसू लागलंय. बहुतांशी मालिकांमध्ये लग्न, प्रेम हाच गाभा असतो. प्रेम बहरण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये संवाद आवश्यक आहे. पूर्वीचे चित्रपट, मालिका यांमध्ये हा संवाद आऊटडोअर अर्थात बाह्य़ ठिकाणी घडत असे. पण तात्काळ संवादाची माध्यमं वाढल्यानं मालिकांमधील प्रसंग व्हॉट्सअ‍ॅपने व्यापले जातात. अभिनेता आणि अभिनेत्रीपेक्षा ते माध्यम महत्त्वाचं होऊन जातं. कारण कॅमेरा त्या अ‍ॅप्लिकेशनच्या पडद्यावर असतो. चेहऱ्यावरच्या अभिनयापेक्षा कलाकार किती भराभर टाइप करू शकतात याचं महत्त्व वाढलंय. टाइप करताना अभिनेत्रीच्या बोटांवरचं नेलपॉलिश भाव खाऊन जातं.

एरव्ही हिरो हिरोइन एकमेकांना भेटण्याचा प्रसंग असेल तर त्यांचे कपडे, अ‍ॅक्सेसरीज, केसांची स्टाइल, पादत्राणं सगळ्याचा विचार करायला लागायचा. आता ही प्रक्रियाच बदलली आहे. हिरो टी-शर्ट आणि ट्रॅकसूटमध्ये गच्चीत येरझाऱ्या मारत टाइप करतोय आणि हिरॉइन घरातल्याच सलवार कमीझ किंवा गाऊनमध्ये दिवाणावर लोळत त्याला उत्तर देतंय हे चित्र बहुतांशी मालिकांमध्ये कॉमन झालंय. मालिका आणि त्यातले कलाकार यांना फॅन फॉलोइंग असतं. ते कोणत्या वस्तू वापरतात, कोणत्या स्वरूपाचे कपडे घालतात, एखादी विशिष्ट लकब असं सगळं त्यात यायचं. पण आता मालिकेची निर्मिती करताना कलाकार कोणता फोन वापरतात. तो फोनचा ब्रॅण्ड खपणीय आहे का, तो फोन वापरणं हिरो किंवा हिरॉइनने वापरणं सयुक्तिक दिसेल ना याची काळजी घ्यावी लागते. हिरॉइन श्रीमंत आणि हिरो गरीब असेल तर फोनही तसेच दाखवावे लागतात. अनेकदा यात ब्रॅण्डिंगचा मुद्दा असल्याने फोनच्या कंपनीचे नाव आणि लोगो झाकला जाईल अशी व्यवस्था केली जाते किंवा थेट ब्लरच केला जातो. मात्र अ‍ॅप्लिकेशन कोणतं हे सहज दिसतं. एकूणच मानवी गुणवैैशिष्टय़ांपेक्षा स्मार्टफोन्सची वैैशिष्टय़ं महत्त्वाची ठरतात. संवाद म्हणताना डोळे, चेहरा आणि एकूणच शरीराची हालचाल कळीची असते. पण आता लक्ष अ‍ॅप्लिकेशनच्या स्क्रीनवर असल्याने स्मार्टफोनची तब्येत नीट असणे गरजेचे होते. असंख्य ज्येष्ठ कलाकार केवळ देहबोलीतून प्रसंग खुलवतात. संवाद असेल किंवा नसेल त्यांना चिंता नसते. परंतु नवी मंडळी गॅझेटमय असल्याने त्यांच्या वावरण्यात, प्रतिसाद देण्यात यांत्रिक ठोकळेपण जाणवते. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा स्मार्टफोन अविभाज्य घटक होतोय. साहजिकच मालिकांची कथानकांमध्ये मोबाइल संभाषणं, त्यावरचे व्हिडीओ, त्याच्या चालू किंवा बंद होण्याच्या कहाण्या, पुरावे यांचा समावेश असतो. संवादही तसेच रचलेले असतात. त्यामुळे कलाकार मागे राहतो आणि गॅझेट केंद्रस्थानी येतं.

काळानुसार गोष्टी बदलतात. कुठलीही कलाकृती निर्मिणारे आपल्याच सभोवतालातल्या समाजामधले असतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात जे बदल घडतात ते कलाकृतीत प्रतिबिंबित होतात. गॅझेट्सच्या माध्यमातून अभिनय हा नवाच प्रकार उदयास येत आहे. कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वासाने उभं राहणं, खणखणीत आवाजात पल्लेदार संवाद म्हणणं, ज्येष्ठ कलाकारांसमवेत काम करताना त्यांना पूरक होईल असं काम करणं हे प्रकार हळूहळू मागे पडू शकतात. कार्टून्स मालिका एक फँटसी आभासी विश्व असतं. तसंच एखाद्या मालिकेत स्मार्टफोन्सच्या माध्यमातून संवाद साधणारी पात्रं असे स्वरूप असू शकते. कचेरीतल्या कामापासून, प्रोजेक्ट, असाइनमेंट, शिक्षण, टाइमपास, धमाल, मनोरंजन अशा सगळ्या कामांसाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. मालिकेतही स्मार्टफोन मुख्य पात्र झाल्यास वावगं वाटायला नको. सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना साधारण दहा वर्षांपूर्वी माणसं पेपर वाचताना दिसायची, एकमेकांशी गप्पाही मारायची पण आता ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये चढून स्थिरस्थावर होण्याचा अवकाश की- स्मार्टफोनचा आधार घेतला जातो. हे आक्रमण चूक की बरोबर हा विषयच नाही. आक्रमण झालंय ही वस्तुस्थिती आहे. मालिकेत पात्रं खूप असतात, परंतु २१ ते ३० वयोगटातली पात्रं आणि त्यांचे संवाद गॅझेटद्वारेच होताना दिसतात. म्हणजे अभिनय केवळ ज्येष्ठांनीच करायची गोष्ट राहणार की काय अशी परिस्थिती आहे. क्राइम शोमध्ये तर अनेकदा कथानकाचा आत्माच एखादं गॅझेट असतं. त्या डिव्हाइसद्वारे कथा फिरते. मात्र हा ट्रेंड मराठी कौटुंबिक मालिकांमध्ये रुजू पाहत आहे. आपण यांत्रिक होतोय, ही ओरड आता आपल्या कलाकृतींमध्ये परावर्तित झाली आहे. पटकथा आणि संवादलेखकाचं कामही बदलतं आहे. एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि एकूणच सोशल मीडियावरची भाषा आणि आपली नेहमीची भाषा यात तफावत आहे. गॅझेटकेंद्रित प्रसंगात नेहमीच्या भाषेतले संवाद लिहून उपयोग नाही. त्यामुळे कमीत कमी शब्द आणि जास्तीत जास्त स्माइली असं स्वरूप होऊ शकतं. टीव्ही एक गॅझेट आणि त्यावर दिसणाऱ्या मालिकेतल्या पात्राच्या हातातलं गॅझेट असा सगळा सर्वस्वी यांत्रिक आविष्कार पाहायला मिळू शकतो.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com