एखाद्या मालिकेशी आपले भावबंध जुळतात. एखाद्या कलाकाराच्या आपण नकळत प्रेमात पडतो आणि मग अचानक तो कलाकार त्या मालिकेतून नाहीसा होतो आणि त्याची जागा दुसरा एखादा कलाकार घेतो. खरं तर आपला आवडता कलाकार गायब का झाला, त्यामागची कारणं काय आहेत, हे आपल्याला समजायला हवं. याविषयी विचारणा करणं हा प्रेक्षक म्हणून आपला हक्क आहे.

मालिका आणि त्यातही दैनंदिन मालिका (डेली सोप) आणि प्रेक्षक यांचं घट्ट नातं असतं. मालिका सुरू होण्याच्या आधीपासून प्रोमो झळकू लागतात. शहरातल्या मोठय़ा होर्डिग्जवर मालिकेतल्या प्रमुख कलाकारांचे फोटो, टॅगलाइन आणि वेळ दिसू लागते. रेल्वेस्थानकं आणि बसस्टॅण्डवरही हीच माणसं पिच्छा पुरवतात. मराठी माणूस मालिकेतल्या कलाकाराशी असा जोडला जातो. दिवसभराचा व्याप आटोपून संध्याकाळी चार घटका विरंगुळा देणाऱ्या या मालिका स्ट्रेसबस्टर अर्थात ताणतणाव निर्मूलनासाठी उत्तम उतारा. दिवसभरात स्वयंपाकघरात राबणाऱ्या गृहिणी, प्रवास आणि घर सांभाळणाऱ्या वर्किंग वुमन, आयुष्याच्या संध्याकाळी मोकळा वेळ असलेले वरिष्ठ नागरिक यांच्यासाठी मालिका मोठा आधार असतो. कलाकार, घरं यांच्याशी त्यांचा भावबंध जुळतो. कलाकारांच्या मूळ नावांऐवजी मालिकेतल्या नावाने ओळखू लागतात. त्यांची गुणवैैशिष्टय़ं, लकबी तसंच एखादा खास संवाद चाहत्यांना पाठ असतो. महिला कलाकारांचे ड्रेस, साडय़ा, त्या नेसण्याची पद्धत, दागिने, अ‍ॅक्सेसरीज हे सगळं काटेकोरपणे फॉलो केलं जातं. जान्हवीताईंचं मंगळसूत्र किती लोकप्रिय झालेलं आठवतंय ना!

कथेनुसार पटकथा रचली जाते. दिग्दर्शकाच्या डोक्यात पात्र कसं असावं हे तयार असतं. हे सगळं समजून घेऊन कलाकार तयारी करतो. त्या माणसात शिरतो. त्याचं बोलणं, हालचाली, लकबी समजून घेतो. हळूहळू ते पात्र प्रेक्षकांच्या मनात ठसतं, आवडू लागतं. कलाकाराला काम करायला आवडतं. प्रेक्षकांना पाहायला आवडतं. त्या कलाकारासाठी म्हणून विशिष्ट वेळी टीव्ही लावला जातो. मुख्य वेळी पाहता आली नाही तर रिपिट टेलिकास्ट पाहिला जातो. कलाकाराला त्या कामाचे पैसे आणि समाधान मिळतं. वाहिनीला टीआरपी मिळतो. जाहिराती मिळतात. अर्थकारणाचा गाडा मार्गी लागतो. कलाकाराला उद्घाटनं, लाँचिंग अशा असंख्य कार्यक्रमांना बोलावलं जातं. वृत्तवाहिन्यांवर मुलाखती होतात. फेसबुकवर त्या कलाकाराला फ्रेंड रिक्वेस्टची रीघ लागते. त्याला मर्यादा असल्याने फॅनपेज तयार करावं लागतं. बघता बघता मालिकेचे पन्नास, शंभर, दोनशे भाग होतात. आणि अचानक लोकप्रिय झालेला कलाकार बदलतो. कोणतीही पूर्वसूचना न देता. कारण न सांगता. वाहिनी, मालिकाकर्ते आणि कलाकार यांच्यात मानधनावरून वाद होऊ शकतो. कलाकाराला कौटुंबिक अडचण येऊ शकते. त्याची प्रकृती बिघडू शकते. त्याला अन्य मालिकेत उत्तम पैशासह महत्त्वाची भूमिका मिळू शकते. काहीही कारण असू शकतं. पण एरवी मेकिंग ऑफपासून, सेटवरच्या बर्थडे सेलिब्रेशनपर्यंत सगळ्या गोष्टी पुरवणारं चॅनल अशा बाबतीत गप्प राहतं. वृत्तपत्रात बातमी आली तर पामर प्रेक्षकाला कारण कळतं कलाकार बदलण्याचं. दर वेळी काही भांडणाचं निमित्त नसतं. पटणारं कारण असू शकतं, पण त्याची कल्पना प्रेक्षकांना दिली जात नाही. त्यांना गृहीत धरलं जातं. कलाकारांची काही बाजू असेल ती प्रेक्षकांना कळायला हवी. वाहिनीची भूमिकाही चाहत्यांपर्यंत पोहोचायला हवी. या निमित्ताने मराठी मालिकांतल्या अदलाबदलीचा वेध.

***

खंडोबा, म्हाळसा आणि बानू या पौराणिक कथानकावर आधारित ‘जय मल्हार’ मालिका झी टीव्हीवर सुरू आहे. पौराणिक कथांचा सखोल अभ्यास, उत्तम निर्मितिमूल्यं, कलाकारांचा सुरेख अभिनय, कथानकाला साजेसे पोशाख आणि सेट्स यामुळे ही मालिका चाहत्यांना आवडते. या मालिकेत हेगडी प्रधान ऊर्फ विष्णुदेव यांची भूमिका सुरुवातीला अतुल अभ्यंकर करत होते. खंडोबा यांच्या शिवलीलेत हेगडी प्रधान अर्थात विष्णूचा अवतार असलेले हे काम अतुल उत्तम रीतीने करत होते. प्रेक्षकांनाही त्यांचं काम आवडत असे. मात्र हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अतुलीजींचं निधन झालं. मालिकेसाठी आणि चाहत्यांसाठी हा दुर्दैवी क्षण होता. एका चांगल्या कलाकाराला चाहते मुकले. मात्र काळ कोणासाठी थांबत नाही. विष्णूची भूमिका महत्त्वाची असल्याने ते पात्र वगळून चालणार नव्हतं. थोडय़ाच दिवसांत नकुल घाणेकर यांनी हे काम करायला सुरुवात केली. उत्तम नर्तक असलेल्या नकुल यांनी अल्पावधीतच या कामाद्वारे अभिनयातही छाप उमटवली. विष्णू आणि लक्ष्मीदेवी अर्थात पूर्वा सुभाष यांच्यातली केमिस्ट्रीही उत्तम होती. बदली खेळाडू स्वरूपाचं काम असलं तरी शंभर टक्के योगदानामुळे नवे प्रधानजीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. अगदी अचानक आलेल्या या जबाबदारीला नकुल यांनी न्याय दिला. आख्यान तसंच पार्वती आणि बानू यांना मुळरूपाचं दर्शन होण्यासंदर्भात विष्णूची भूमिका महत्त्वाची आहे. असं असताना तीनच दिवसांपूर्वी विष्णूच्या भूमिकेत नवीन कलाकार अवतरला. नकुल का नाही याचंही कारण नाही. नवीन कलाकार वाईट करतोय असं नाही. तोही चांगलंच करेल, पण बदली कलाकार येण्याचं प्रयोजन तरी स्पष्ट व्हावं. हा म्हणजे ‘देई वाणी घेई प्राणी’ प्रकार झाला. उत्तम काम करत असलेल्या नकुल यांच्याऐवजी नवीनच कलाकाराला पाहून चाहत्यांना आश्चर्यरूपी धक्का बसला. पण कारण शेवटपर्यंत कळलं नाही.

***

‘माझे मन तुझे झाले’ नावाची मालिका ईटीव्हीवर सुरू होती. शेखर आणि शुभ्राची ही गोष्ट. शेखरच्या आईचं काम आसावरी जोशी करत होत्या. गृहिणी, मात्र घरात कर्तेपण सांभाळणारी अशी ही भूमिका होती. मालिका, सिनेमा, नाटक इंडस्ट्रीचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आसावरीताई अर्थातच ही भूमिका उत्तमच करत होत्या. कथानकाची वाटचाल लक्षात घेता ही भूमिका कमी होण्याची शक्यता नव्हती. उलट या भूमिकेचं महत्त्व वाढण्याची चिन्हं होती. अशा वेळी अचानक आसावरीताईंऐवजी मुग्धा शाह दिसू लागल्या. कारण सांगण्याची तसदी वाहिनीने घेतली नाही ना मालिकाकर्त्यांनी. त्यानंतर मालिका संपेपर्यंत मुग्धा शाहच यांनीच शेखरची आई म्हणून काम केलं. मुग्धाताईही सुरेख काम करतात. त्यांच्या कौशल्यावर शंका घेण्याचा मुद्दाच नाही. पण कारण गुलदस्त्यातच राहिलं.

***

झी वाहिनीवर ‘मला सासू हवी’ नावाची मालिका सुरू होती. या मालिकेतही आसावरीताई सासूच्या भूमिकेत होत्या. आधुनिक सुनांना टक्कर देणारी आणि त्यांना वठणीवर आणणारी खमकी सासू असे या भूमिकेचे स्वरूप होते. मालिकेचे प्रोमो, जाहिराती यामध्येही आसावरीताईच केंद्रस्थानी होत्या. मालिका सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच आसावरीताईंना प्रेक्षकांची वाहवा मिळाली. सासूबाईंचा ठसका आणि घर नीट राहावं यासाठीची त्यांची धडपड अनेकांना आवडली. मात्र अचानकच आसावरीताईंऐवजी सविता प्रभुणेजी दिसू लागल्या. सविताताई ज्येष्ठ रंगकर्मी आहेत. बदली कलाकार म्हणून का होईना, बऱ्याच दिवसांनंतर मराठीत त्यांचं काम पाहायला मिळालं. मालिका सोडण्याचं कारण अगदी वैैयक्तिक असू शकतं. तपशिलात जाण्याचं कारण नाही; पण किमान त्याची कल्पना चाहत्यांना देता येऊ शकते. मालिकेतले प्रमुख पात्र मालिका सोडतं. दुसरा कलाकार काम करू लागतो. दोघीही निर्जीव वस्तू तर नाही. नव्या कलाकाराला भूमिका अंगीकारायला वेळ लागतोच. विशिष्ट कलाकार अनेकांचा आवडता असतो. त्यासाठीच तो कार्यक्रम पाहिला जातो. तोच कलाकार गायब झाला तर मालिकेचा प्रेक्षकवर्गही घटू शकतो. प्रत्येक कलाकाराची गुणवैशिष्टय़े असतात. याच्यासारखं दुसरा करेलच असं नाही. त्यामुळे त्या भूमिकेच्या, पात्राच्या लकबीही बदलाव्या लागतात.

***

ईटीव्हीवर ‘चार दिवस सासूचे’ नावाची मॅरेथॉन लांबीची मालिका होती. रोहिणी हट्टंगडी आणि कविता लाड-मेढेकर या दोघी सोडल्या तर या मालिकेत किती बदली खेळाडू आले याची गणतीच नाही. मालिकेचे पाच हजारांहून अधिक भाग झाल्याने प्रेक्षकांनाही आधीचा कोण आणि नंतरचा कोण हे लक्षात ठेवावं असं वाटलं नाही. आशा देशमुखांचे तीन मुलगे दाखवले होते. ते तिघेही बदलले. का? ठाऊक नाही. या मालिकेत एवढे कलाकार दाखवण्यात आले की स्नेहमेळावा होऊ शकेल, कारण सातत्याने कुठला ना कलाकार बदलत असल्याने मालिकेची विश्वासार्हताच एकदम कमी झाली.

***

झी टीव्हीवर ‘वादळवाट’ नावाची मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. संपादक आबा चौधरी, त्यांचे वृत्तपत्र, वकील लेक रमा चौधरी आणि त्यांचे कुटुंब महाराष्ट्रात लाडके झाले होते. या मालिकेत देवराम खंडागळे नावाचं खलनायकी पात्र होतं. निष्णात अभिनेते शरद पोंक्षे यांनी या भूमिकेचं अक्षरश: सोनं केलं. खवीस, स्वार्थी, अप्पलपोटा, प्रतिस्पध्र्याना थेट मारण्याची भाषा करणारा इरसाल देवराम त्यांनी अफलातून उभा केला होता. त्याचं वागणं, बोलणं, लकबी राज्यभरात प्रसिद्ध झाल्या होत्या. सगळ्याच कलाकारांचा उत्तम अभिनय, दर्जेदार कथा, चांगलं दिग्दर्शन यामुळे या मालिकेने वाहिनीची भरभराट केली. देवरामचे त्याच्या पेपरचा माणूस (जयंत घाटे) आणि वकील (अभिजित चव्हाण) यांच्याशी होणारे संवाद प्रचंड लोकप्रिय झाले होते. मालिका ऐनभरात असताना पोंक्षे यांनी मालिका सोडली. त्यांचं पात्र काही दिवस गायब होतं. थोडय़ा दिवसांनंतर भारत गणेशपुरे ही भूमिका साकारू लागले. शरद यांनी त्या भूमिकेसाठी अपार मेहनत घेतली होती. चाहत्यांच्या प्रेमाने त्याला फळही मिळालं होतं. अचानक भारत यांना ते बेअरिंग पकडणं कठीण होतं. तरीही त्यांना पुरेपूर न्याय दिला. मात्र आजपर्यंत देवराम का बदलला समजू शकलेलं नाही.

***

प्राइम टाइममध्ये काळी जादूकेंद्रित ‘असंभव’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. एकापेक्षा एक कलाकार आणि काळ्या गोष्टी दाखवताना शास्त्र, संस्कृती यांना दिलेलं महत्त्व यामुळे ही मालिका झटपट चाहत्यांच्या मनात विराजमान झाली होती. मालिकेच्या सुरुवातीला शुभ्राची भूमिका मानसी साळवी करत होती. मालिकेच्या शीर्षकगीतात, जाहिरातीत तीच दिसली होती. मुलाखतींमध्येही ती होती. मात्र मालिकेचा मुख्य गाभा सुरू होण्यापूर्वीच मानसीऐवजी ऊर्मिला कानेटकर ही भूमिका साकारू लागली. निर्मात्या पल्लवी जोशी यांनी एपिसोडदरम्यान कल्पना दिली, मात्र कारण सांगितलं नाही.

***

स्टार प्रवाहवर ‘पुढचं पाऊल’ नावाची मालिका सुरू आहे. डिझायनर साडय़ा, बटबटीत मेकअप करून घरात काहीही काम न करता वावरणाऱ्या बायका, मधूनच हिंसक होणारी पात्रं असं असूनही ही मालिका लोकप्रिय आहे. या मालिकेत सोहम नावाचं पात्र होतं. ही भूमिका आस्ताद काळे करत होता. अचानकच तो गायब झाला. आस्तादला दूर करण्यामागे काही कारण असेल, पण ते मायबाप प्रेक्षकांना सांगावं, असं वाहिनीला किंवा मालिकाकर्त्यांना वाटलं नाही.

***

स्टार प्रवाहवरच ‘तू जिवाला गुंतवावे’ ही मालिका सुरू होती. प्रसाद लिमये मुख्य भूमिकेत होता. काय घडलं कुणालाच ठाऊक नाही, पण अचानक प्रसादऐवजी अजिंक्य ननावरे दिसू लागला. हे का घडलं हे पडद्याआड राहिलं. मालिकेची जाहिरात सुरू झाली तेव्हा प्रसादलाच दाखवण्यात आलं. मग अचानकच हा मोठा निर्णय घेण्यात आला; पण त्याची कल्पना चाहत्यांना देण्यात आली नाही.

तुम्हीही असंख्य मालिका पाहत असाल. संध्याकाळी सात ते साडेदहा वेळ तुमचा या मालिकांमध्येच जात असेल. या मालिका पाहताना स्क्रीनवर खाली पट्टी येते. आपण सोईस्करपणे दुर्लक्ष करतो; पण चॅनेलच्या कंटेंटमध्ये काही आक्षेप असेल, काही मत असेल, प्रतिक्रिया असेल तर कळवायला सांगा. आपण टाइप करण्याची तसदी घेत नाही. आपला आवडता कलाकार गायब का झाला याविषयी विचारणा करत नाही. तो आपला हक्क आहे. तुमच्या मताचं, पत्राचं, मेलचं काय होईल माहिती नाही, पण किमान कृती तरी करा. न जाणो, तुमच्यासारख्या कृतिशील प्रेक्षकांमुळे निर्णय बदलायचा!
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com