१९५१ पासून कोबाल्ट रेडिएशनचा वापर करून कर्करोगाच्या गाठींवर उपचार होऊ लागले. वैद्यक, भौतिकी आणि संगणक यांच्या त्रिवेणी संगमातून आज टय़ूमरवरती विनाशक मारा करणं शक्य होतं आहे. कर्करोगासाठी शस्त्रक्रिया, किमोथेरपी आणि हॉर्मोन उपचार तसेच रेडिएशन उपचार सुसज्ज आहेत.

भौ तिकीच्या क्षेत्रात एक नवा इतिहास १२० वर्षांपूर्वी लिहिला गेला. विल्हेम रोन्टजेन यांनी ‘एक्स-रे’चा आणि पाठोपाठ दुसऱ्या वर्षी मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला. या दोन्हीचे गुणधर्म होते पदार्थ भेदून जाण्याची क्षमता आणि जिवंत पेशींच्या, विशेषत: पटापट द्विगुणित होणाऱ्या पेशींच्या जनुकांवर हल्ला करून त्यांना नष्ट करण्याची विघातक शक्ती.
या गुणधर्माचा उपयोग मानवी शरीरात दडलेल्या कर्करोग पेशींचा नाश करण्यासाठी होऊ शकेल ही कल्पना एमिल ग्रब नामक वैद्यक विद्यार्थ्यांला १८९६ मध्ये म्हणजे एक्स-रेचा शोध लागून एक वर्ष होण्याआधीच सुचली. असेच गुण असलेल्या इतर मूलद्रव्यांचा शोधही यानंतर घेतला गेला आणि त्यातून कोबाल्ट हे द्रव्य अधिक परिणामकारक सिद्ध होऊन १९५१ पासून त्याचा वापर करून कर्करोगच्या गाठींवर उपचार होऊ लागले. याच वेळी या किरणांमुळे इतर चांगल्या पेशींना पोहोचणारा धोका लक्षात येत होता. कर्करोग पेशी मृत झाल्या पाहिजेत, पण चांगल्या पेशींना धक्का लागायला नको हा पेच सोडवणं हे शास्त्रज्ञांपुढचं आव्हान ठरलं आणि अविरत चाललेल्या संशोधनातून आज हा पेच सोडवण्यात बऱ्याच अंशी यश मिळालं आहे. रेडिओथेरपी म्हणजेच किरणोत्सार उपचारांच्या प्रगतीचा आलेख आजच्या लेखात मांडत आहे.
कोबाल्ट रेडिएशन प्रभावी असलं तरी त्यात एक त्रुटी होती. कोबाल्टमधून बाहेर पडणाऱ्या किरणांवर मानवी नियंत्रण काहीच नव्हतं. १९५६ साली स्टॅनफर्ड विद्यापीठात भौतिकी प्रयोगशाळेत निर्माण झाला पहिला लिनियर एक्सलरेटर (लिनॅक), हाताच्या इशाऱ्यावर बंद-चालू करता येणारं किरणोत्सार यंत्र, ज्यामुळे रेडिएशन उपचार पद्धत वयात आली असं म्हणता येईल. या उपकरणात इलेक्ट्रॉन्सचा मारा प्रचंड वेगाने शिशासारख्या जड धातूवर करण्यात येतो, तेव्हा त्यातून फोटॉन नावाचे शक्तिशाली क्ष किरण निर्माण होतात आणि ते मानवाला पाहिजे त्या दिशेने प्रवास करून ज्या पेशींवर पडतील तिथे वज्राघात झाल्याप्रमाणे जनुकांची मोडतोड होऊन त्या पेशी मरण पावतात. लिनॅक म्हणजे एक प्रकारचं शक्तिशाली
एक्स-रे मशीन समजता येईल.
प्रत्यक्ष रेडिएशन घेण्यापूर्वी रुग्ण रोगनिदानाच्या प्रक्रियेतून गेलेला असतो, काही वेळा त्याची शस्त्रक्रियाही झाली असते. कर्करोगचे वैद्यकीय उपचारही झालेले असतात. कर्करोगतज्ज्ञाकडून तो रेडिओथेरपिस्टकडे येतो त्या वेळी त्याच्याकडे आधीच केलेले अनेक स्कॅन असू शकतात. परंतु रेडिएशन अचूक देण्यासाठी लिनॅक मशीनवर अजून एक सिटी स्कॅन काढला जातो. कर्करोग शरीराच्या मऊ भागातला असेल तर सोनोग्राफीसुद्धा तिथेच केली जाते. या वेळी रुग्ण अगदी निश्चल असणे गरजेचे असते. म्हणून त्याला हवा भरलेल्या, त्याच्या शरीराचा आकार धारण केलेल्या विशिष्ट साच्यात ठेवलं जातं. मस्तक, मान, छाती, पोट, कटिबंध आणि पाय अशा वेगवेगळ्या ठिकाणांसाठी अनुरूप साचे किंवा मुखवटे बनवले जातात आणि त्या रुग्णाचा उपचार पूर्ण होईपर्यंत तेच वापरले जातात. रुग्ण लहान मूल किंवा अतिशय घाबरलेला असेल तर तो स्थिर राहावा म्हणून साचा बनवताना त्याला क्वचित भूल द्यावी लागते.
आता या रुग्णाचा नवा स्कॅन तसेच आधीचे सिटी, एमआरआय स्कॅन तपासून रेडिओथेरपिस्ट या रुग्णाला कुठे आणि किती रेडिएशन द्यायचं आहे ते ठरवतो. अलीकडे केल्या जाणाऱ्या ‘पेट सीटी’ स्कॅनमुळे कर्करोग जोमाने वाढत चाललाय की औषधोपचारांनी मृत झाला आहे हेदेखील समजतं. शरीराच्या कुठल्या भागात कर्करोग आहे, तसंच तो रेडिएशनला किती प्रमाणात दाद देणारा आहे यावर रेडिएशनची मात्रा ठरते. बहुधा ६० ते ८० ‘ग्रे’ असा एकंदर डोस द्यायचा असतो. तो अर्थातच सगळा एका वेळी देत नाहीत तर त्याचे लहान लहान भाग (दररोज २-२ ग्रे याप्रमाणे) ५ ते ६ आठवडय़ांत संपवतात. यामुळे रेडिएशनचा त्रास रुग्णाला होणं बरंच कमी झालं आहे. स्कॅनमध्ये जेवढा टय़ूमर दिसतो त्याच्या बाहेरचा काही भाग सूक्ष्म प्रमाणात पसरलेल्या रोगासाठी आणि त्याच्या बाहेर ३-४ मि.मी. भाग रुग्णाच्या नकळत होणाऱ्या हालचाली लक्षात घेऊन रेडिएशनचा परीघ ठरवतात.
एकदा या संपूर्ण उपचाराची रूपरेषा ठरली की फिजिसिस्ट म्हणजे भौतिकशास्त्रज्ञाला याची कल्पना दिली जाते. रेडिओथेरपिस्टला नेमकं कुठे आणि किती रेडिएशन द्यायचं आहे हे लिनॅक मशीनला बिनचूक आदेश देऊन पार पाडण्याचं काम फिजिसिस्टचं आहे. त्यानुसार लिनॅक मशीन सज्ज झाल्यावर रुग्णाला उपचार दालनात आणलं जातं. रुग्णाला वर-खाली करता येणाऱ्या टेबलवर त्याच्या स्वत:च्या साच्यामध्ये झोपवून लेसर मार्कर्सच्या मदतीने ज्या भागाला रेडिएशन द्यायचं आहे तो भाग रेखांकित करतात. आता रुग्ण लिनॅकच्या जवळ आणला जातो आणि मशीनचा नेम बरोबर कर्करोगच्या गाठीच्या मध्यावर केंद्रित करून किरणांचा मारा केला जातो. मशीन ३६० अंशातून रुग्णाभोवती फिरतं आणि वेगवेगळ्या कोनांतून पुन्हा पुन्हा हा मारा केला जातो. या वेळी रुग्णाला यत्किंचितही वेदना होत नाहीत, तसेच कोणतीही जाणीवसुद्धा होत नाही.
लिनॅक मशीन एका वातानुकूलित दालनात ठेवलेलं असून त्याच्याबाहेर ५ फूट जाड काँक्रीटच्या संरक्षक भिंतीच्या पलीकडे याचे नियंत्रक बसवलेले असतात आणि वेगवेगळ्या क्लोज सर्किट कॅमेऱ्यांमधून रुग्णाची परिस्थिती, हालचाल दिसत असते. मशीनमधून किरणोत्सार करण्याचं अतिशय नाजूक आणि चुकांना जराही जागा नसलेलं काम याच ठिकाणी उच्च प्रशिक्षण घेतलेले सॉफ्टवेअर तंत्रज्ञ करत असतात. रेडिओथेरपिस्टने ठरवलेली उपचार योजना लिनॅकच्या भाषेत संक्रमित करण्याचं काम फिजिसिस्टचं, पण त्यासाठी लागणारी प्रचंड आकडेमोड केली जाते विशेष शक्तिशाली संगणकाद्वारे. म्हणजेच वैद्यक, भौतिकी आणि संगणक यांच्या त्रिवेणी संगमातून आज टय़ूमरवरती विनाशक मारा करणं शक्य होत आहे.
वर वर्णन केल्याप्रमाणे रुग्णाच्या शरीराच्या बाहेरून किरणांचा मारा करण्याच्या पद्धतीला टेलिथेरपी म्हणतात. यासाठी वापरण्यात येणारे किरण हे ‘गॅमा’ किरण म्हणून ओळखले जातात. शरीरात प्रवेश करून टय़ूमपर्यंत पोहोचण्याची त्यांची क्षमता असते. कधी कधी शरीराच्या पृष्ठभागावर किंवा अंतर्गत पोकळीत शक्तिशाली पण कमी भेदकता असणाऱ्या बीटा किरणांचा स्रोत ठेवला जातो. यामधून तुलनेने जास्त क्षमतेची रेडिएशन मात्रा वापरता येते. बहुधा हा इलाज एकदाच केला जातो. या उपचाराला ‘जवळून’ करण्याची ‘ब्रेकीथेरपी’ असं नाव आहे. गर्भाशय मुख, गर्भाशय पोकळी, स्तन या अवयवांच्या कर्करोगाला असा उपचार केल्याने आजूबाजूच्या अवयवांना त्रास पोहोचत नाही. कधी कधी शस्त्रक्रियेच्या दरम्यान कर्करोगाच्या जागेवर थेट ब्रेकीथेरपी वापरून कर्करोग पेशींना निष्प्रभ केलं जातं. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांच्या कर्करोगाला रेडिएशनची किती मात्रा द्यायची याचा काटेकोर अभ्यास करून एक तक्ताच बनवलेला आहे, ज्यावरून उपचार नियोजन करणं सुलभ झालं आहे.
युद्ध कुठेही झालं तरी त्याचा उपद्रव केवळ युद्धभूमीवर नव्हे तर आसमंतातही होत असतो. कीमोथेरपीचे दुष्परिणाम शरीरात सर्वत्र होत असले तरी रेडिएशन ज्या भागाला दिलंय तिथेच त्याचे दुष्परिणाम होतात. मुख्यत: त्वचा काळवंडते, निबर होते, शुष्क होते. डोळे, तोंड, योनिमार्ग कोरडे पडतात. ‘तोंड येतं’ त्यामुळे जेवणावर परिणाम होतो. फुप्फुसाची लवचीकता कमी होते. पोटाला दिलेल्या रेडिएशनमुळे जुलाब, पोटदुखी, लघवीत जळजळ असे त्रास होतात. हिमोग्लोबिन कमी होतं. बहुतेक सगळे त्रास उपचारांनी २-३ महिन्यांत बरे होतात.
किरणोत्सारामुळे नॉर्मल पेशींना होणारा त्रास कमी कसा करता येईल यासाठी निरंतर संशोधन चालू आहे. स्कॅनमध्ये दिसणाऱ्या वास्तवदर्शी त्रिमिती प्रतिमा तर मार्गदर्शन करतातच पण आता किरणांची तीव्रता कमी-जास्त करून उपचार करण्याचीही सोय झाली आहे. आव्हान आहे ते अस्थिर लक्ष्याचं, सतत चालणाऱ्या अनैच्छिक हालचालींचं. उदाहरणार्थ, धमन्यांमधून वाहणारं रक्त, श्वासामुळे होणारी फुप्फुसाची हालचाल, भरणारं-रिकामं होणारं मूत्राशय, आतडी आणि अविरत धडधडणारं हृदय यांसारख्या गोष्टींमुळे किरणोत्साराचं लक्ष्य बदलत राहतं. अत्याधुनिक क्षेपणास्त्राप्रमाणे लक्ष्याचा पाठलाग करून ते नष्ट करण्यासाठी आता ६ वेगवेगळ्या दिशांना संचार करणाऱ्या ‘सायबर नाइफ’ची निर्मिती झालीय. या उपचारात केवळ एकदाच संपूर्ण किरणमात्रा दिली जाते किंवा २ ते ५ सत्रांत एकंदर डोस दिला जातो. लहान लहान मात्रेत रेडिएशन दिल्याने काय होतं यासाठी आज ५०-६० वर्षांचा अनुभव वैद्यकशास्त्राला आहे, पण मोठी मात्रा एकदम देण्याने काय होतं याविषयी आताच विधान करणं अवघड आहे, तरीसुद्धा अजून काही वर्षांत सायबर नाइफ उपचार पद्धती चांगली विकसित होईल असं म्हणतात.
यापुढचं ध्येय आहे रेणवीय जीवशास्त्राचा (मॉलिक्यूलर बायोलॉजी) उपयोग करून सूक्ष्म पातळीवर टय़ूमर पेशी आणि सामान्य पेशी वेगळ्या बघण्याचं आणि टय़ूमर पेशींवर अचूक मारा करण्याचं. कर्करोगासारख्या एके काळी असाध्य समजल्या जाणाऱ्या रोगावर मात करण्यासाठी आजच्या घटकेला शस्त्रक्रिया, किमोथेरपी आणि हॉर्मोन उपचार यांच्याबरोबरीने रेडिएशन उपचार सुसज्ज आहेत. यामुळे आज अनेक प्रकारच्या कर्करोगामध्ये (प्रोस्टेट, स्तन, गर्भाशयमुख, अन्ननलिका, गुदद्वार, स्वरयंत्र) संपूर्ण रोगमुक्तीचं स्वप्न सत्यात उतरत आहे. drlilyjoshi@gmail.com

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Gold Silver Price on 15 April 2024
Gold-Silver Price on 15 April 2024: सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांना फुटला घाम, १० ग्रॅमचा दर ऐकून व्हाल थक्क
Best Selling Car
Baleno, Brezza, Nexon, Creta नव्हे तर ‘या’ ५.५४ लाखाच्या हॅचबॅक कारसाठी ग्राहकांच्या लागल्या रांगा, झाली तुफान विक्री
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे

या लेखासाठी विशेष साहाय्य :
डॉ. गौतम शरण, एम.डी. रेडिएशन ऑन्कोलॉजी, प्रमुख कर्करोगतज्ज्ञ, इन्लैक्स बुधरानी हॉस्पिटल, पुणे<br />dr.gautamsharan@gmail.com