हृदयरोगाच्या क्षेत्रात अक्षरश: क्रांती झाली आहे. ज्या दुखण्यामुळे माणसं महिनोन्महिने नामोहरम व्हायची त्यातून आता चार-पाच दिवसांत घरी जात आहेत, आठवडाभरात कामाला लागत आहेत. या घटनांची माहिती आपल्याला निश्चितच वेधक आणि दिलासा देणारी आहे.

आजचा जमाना एक गमतीदार विरोधाभासाचा आहे. म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय की सदोष जीवनशैलीमुळे आजचे बहुतेक आजार उद्भवत आहेत. लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार वाढत चाललेत. देशात एकंदर मृत्यूच्या कारणांमध्ये हृदयविकार सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे अशा काही गोष्टी घडताहेत की त्यामुळे हृदयरोगाच्या क्षेत्रात अक्षरश: क्रांती झाली आहे. ज्या दुखण्यामुळे माणसं महिनोन्महिने नामोहरम व्हायची ती आता चार-पाच दिवसांत घरी जात आहेत, आठवडाभरात कामाला लागत आहेत. या घटनांची माहिती आपल्याला निश्चितच वेधक वाटेल. दिलासा देईल.
पहिली गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये आणि डॉक्टरांमध्येसुद्धा वाढत चाललेली जागरूकता. पूर्वी छाती दुखायला लागली तर ‘अपचन असेल’ म्हणून दुर्लक्ष करणे, फॅमिली डॉक्टरला भेटल्याखेरीज कोणताही उपचार न करणे यामुळे अक्षम्य दिरंगाई होत असे आणि असा रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोचायचा तेव्हा आधीच हृदयाचा झटका येऊन हृदयस्नायूंना कायमस्वरूपी इजा झालेली असायची. मग अशा रुग्णाला काही नेमस्त उपचार केले जात. या दुखापतीतून बरा होऊन पुन्हा कामाला लागायला कमीत कमी सहा आठवडे लागत. शिवाय हृदयस्नायू जेवढय़ा प्रमाणात नष्ट झालेला असे तेवढी हृदयाची कार्यक्षमता कायमची कमी झालेली असायची.
मग आता काय बदल झालाय? आता असा रुग्ण छातीत कळ आल्यापासून हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याचा कालावधी पुष्कळ कमी झालाय. कित्येक रुग्ण स्वत:च ईसीजी करून घेण्यासाठी त्वरा करीत आहेत. डॉक्टरसुद्धा हृदयरोगाची शक्यता विचारात घेऊन ताबडतोब तपासणीचा सल्ला देत आहेत. रुग्णाच्या वेदनेचे स्वरूप आणि ईसीजी या गोष्टी हृदयविकाराच्या झटक्याचे निदान करायला पुरेशा ठरत आहेत. ईसीजीमधील बदल दिसायला कधी कधी वेळ लागतो. अशा वेळी तातडीने एकोकार्डिओग्राफी केली जाते. यासाठी हातात धरून वापरता येतील अशी छोटी एको मशीन्ससुद्धा आता उपलब्ध झाली आहेत. ईसीजीमध्ये बदल असला किंवा नसला तरी छातीतली वेदना ‘अन्जायना पेक्टोरिस’ आणि एकोवर हृदयाच्या आकुंचनात स्नायूचा काही भाग हलत नाही असं दिसलं तर हृदयविकाराच्या झटक्याचा तो पुरावा आहे असं समजून तातडीचे उपचार केले जातात. त्यापैकी एक म्हणजे थ्रॉम्बोलिसिस! शिरेतून इंजेक्शन देऊन हृदय रोहिणीत अडकलेली रक्त गुठळी विरघळून टाकणे आणि थांबलेला रक्तप्रवाह पुन्हा चालू करणे. यासाठी गेल्या ३५ वर्षांपासून स्ट्रेप्टोकायनेज नावाचे वितंचक औषध (एंझाइम) वापरले जाते. आता त्या जागी टेनेक्टेप्लेस नावाचे नवीन अधिक प्रभावी, अतिजलद काम करणारे शक्तिशाली औषध उपलब्ध झाले आहे. हे इंजेक्शन देण्यासाठी रुग्ण मोठय़ा हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत वाट पाहायला नको. त्यात दिरंगाई केल्यास नुकसान होते. निदानाची खात्री असेल तर लहान गावातल्या लहान नर्सिग होममध्ये, रुग्णाला अ‍ॅम्ब्युलन्समधून नेत असताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच किंवा डॉक्टरच्या दवाखान्यातही हे शिरेतले इंजेक्शन देता येते. सुमारे ९० मिनिटांत ईसीजीमधील बदल नाहीसे होऊन तो सामान्य दिसू लागतो.
अशा प्रकारे थ्रॉम्बोलाइज केलेल्या रुग्णांपैकी ५०-६० टक्के रुग्णांची बंद पडलेली रोहिणी एवढय़ा इंजेक्शनमुळेच उघडते. तथापि यानंतर प्रत्येक रुग्णाला, विशेषत: त्याला मधुमेहादी विकारांची साथ असेल तर २४ तासांच्या आत अँजिओग्राफीचा सल्ला दिला जातो. रुग्ण शहरी भागातला असून छातीतली वेदना आल्यापासून तीन तासांच्या आत मोठय़ा हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि हृदयतज्ज्ञ लगेच उपस्थित असला तर कधी कधी थ्रॉम्बोलिसिस न करतासुद्धा १२ तासांच्या आत रुग्णाची कॉरोनरी अँजिओग्राफी (प्रायमरी कॉरोनरी इंटरव्हेन्शन) केली जाते.
या तपासणी अधिक उपचारात रुग्णाच्या जांघेतल्या रोहिणीतून एक प्लास्टिक नलिका सरकवून हृदयापर्यंत नेऊन हृदय रोहिणीतील अडथळा शोधून काढतात, फुगवता येणाऱ्या बलूनच्या मदतीने तिथे अरुंद झालेली रोहिणी पुन्हा रुंद करतात, (अँजिओप्लास्टी). शक्यतो तिथे अडकलेली रक्तगुठळी त्याच वेळी ओढून बाहेर काढतात. ही रोहिणी पुन्हा मिटून जाऊ नये म्हणून त्या जागी धातूची बारीक जाळी ऊर्फ ‘स्टेंट’ बसवण्याची पद्धत १९८६ सालीच सुरू झाली, परंतु पुढे याच ठिकाणी रोहिणी पुन्हा जाड आणि अरुंद होत आहे असे लक्षात यायला लागले. याचा प्रतिबंध करण्यासाठी उपाय काय? आता रोहिणीच्या भिंतीच्या पेशींची वाढ रोखून धरणारी औषधे त्या स्टेंटमधून बरेच महिने सतत स्रवत राहतील, अशी योजना करण्यात आली. २००३ पासून हे ‘ड्रग इल्यूटिंग स्टेंट’ वापरात आले. आता अगदी अलीकडची सुधारणा म्हणजे जैविक विघटन होणारे स्टेंट्स आणि सुमारे दोन वर्षांत शरीरात पूर्ण विरघळून जाणारे स्टेंट्स. अर्थातच रुग्णाचे शरीर हे स्टेंटचा जास्त चांगल्या पद्धतीने स्वीकार करील. धातूच्या स्टेंट्सच्या तुलनेत या स्टेंट्सचा आणखी फायदा असा की त्यामुळे रोहिणीची लवचीकता आणि आकुंचन-प्रसरणातील हालचाल अबाधित राहते आणि त्यामुळे रक्ताभिसरण जास्त नैसर्गिक पद्धतीने होते. गेल्या काही वर्षांत अँजिओग्राफी आणि स्टेंट बसवण्यामध्ये डॉक्टरांचे कौशल्य कमालीचे विकसित झाले असून तज्ज्ञ डॉक्टर एका वेळी दोन-तीन स्टेंटसुद्धा तांत्रिकदृष्टय़ा अवघड ठिकाणी बसवू शकतात.
रक्तगुठळी होऊ नये म्हणून पूर्वी एकमेव अ‍ॅस्पिरिन उपलब्ध होते. आता त्याच्या जोडीला प्रासुग्रेल, टिकाग्रेलोर इत्यादी प्रभावी औषधे आली आहेत. अशी औषधे या रुग्णांना देणे अपरिहार्य असले तरी आताच्या या नव्या स्टेंट्समुळे औषधांचा कालावधी दोन वर्षांवरून तीन ते सहा महिन्यांपर्यंत आला आहे आणि रक्तस्रावाचा धोकाही कमी झाला आहे.
कधी कधी मात्र, विशेषत: मधुमेही रुग्णांमध्ये अँजिओग्राफीनंतर लक्षात येते की एकाच वेळी अनेक रक्तवाहिन्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात अडथळे आहेत. ते सुद्धा ठरावीक ठिकाणी नव्हे तर संपूर्ण रोहिणीच अरुंद झाली असून मेदसंचयाने भरून गेली आहे. अशा खराब रोहिण्यांना ‘बायपास’ करून त्या जागी शरीरात अन्यत्र असलेल्या नीला किंवा रोहिण्यांचा वापर होऊ लागला त्याला ५५ वर्षे लोटली (कॉरोनरी बायपास सर्जरी). यासाठी पूर्वी हृदयक्रिया बंद पाडून रक्ताभिसरण कृत्रिम हृदय-फुफ्फुस यंत्राद्वारे चालू ठेवले जाई. छातीच्या हाडावर मधोमध भला मोठा छेद घेतला जाई (जो भरून यायला तीन महिने लागत). चार ते सहा बाटल्या रक्त दिले जाई. मूळच्या आजारापेक्षा या इतर गोष्टींचा त्रास बरेच महिने होत राही.
आता मात्र बहुतेक हृदयोपचार केंद्रांमध्ये हृदय चालू असताना ‘बीटिंग हार्ट सर्जरी’ होते. यामध्ये कृत्रिम हृदय फुफ्फुस यंत्राचा वापर केला जात नाही. रक्त द्यायची गरज खूप कमी असते. पूर्वीच्या मानाने छेदसुद्धा अगदी लहान घेतला जातो. जखम लवकर भरून येते, साहजिकच हॉस्पिटलमध्ये केवळ पाच-सहा दिवस राहावे लागते. अलीकडे तर काही तज्ज्ञ छातीला दोन-तीन छिद्रे पाडून दुर्बिणीतून ही शस्त्रक्रिया करू लागले आहेत. आता काही मोजक्या केंद्रांमध्ये (दिल्ली) रोबोटिक बायपास सर्जरीसुद्धा होऊ लागली आहे.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अशा प्रकारे अगदी युद्ध पातळीवर भराभर उपचार करून, बंद पडलेला रक्तपुरवठा लवकरात लवकर चालू करून, हृदयाच्या अनमोल स्नायूंना कणभरही कायमची इजा होऊ नये म्हणून प्रयत्नांची शर्थ होत आहे. प्राथमिक उपचार पूर्ण होत असतानाच रुग्णाला स्वस्थ प्रकृतीच्या दिशेने नेण्यासाठी-म्हणजेच या रुग्णाचे ‘पुनर्वसन’ करण्यासाठी आता अनेक मिश्र उपचार केले जात आहेत. या उपचारात मुख्यत: समावेश होतो औषधोपचारांचा. रक्त पातळ ठेवणे, तसेच रक्तदाब, रक्तातली साखर, मेद, होमोसिस्टीन नामक पदार्थ यांची पातळी योग्य ठेवण्यासाठी औषधे-ही बहुधा कायम घ्यायचीच आहेत. याखेरीज महत्त्वाचे वर्तनोपचार म्हणजे-धूम्रपान बंद, मद्यपान माफक, वजन नियंत्रण, ताण कमी करण्याचे प्रयत्न आणि नियमित व्यायाम. या सर्व गोष्टींची पूर्वीपासून माहिती होतीच, पण आता वाढत्या जागरूकतेमुळे या उपचारांना एक बांधीव संघटित रूप आलेय. एक पुनर्वसन कार्यक्रम ठरला आहे. अशा तऱ्हेची अनेक केंद्रे आता शहरी भागांत कार्यरत आहेत आणि त्यांना प्रतिसादही चांगला मिळतो आहे.
दुर्दैवाने असे तातडीचे उपचार मिळण्याआधीच ज्यांना मोठा हृदयाचा झटका येऊन जातो, अशा रुग्णांपुढे दोन समस्या उभ्या राहू शकतात. एक म्हणजे त्यांच्या हृदयाची आकुंचन क्षमता कमी झाल्याने हालचाली करताना धाप लागते (हार्ट फेल्युअर). यासाठी आता खूप प्रभावी औषधे आली आहेत आणि नवी येत आहेत. तरीही त्यांच्या हालचालींवर मर्यादा येते, ही वस्तुस्थिती आहे.
दुसरे म्हणजे हृदयातील विद्युतयंत्रणा खराब झाल्यामुळे स्पंदनाची गती आणि नियमितता यांवर होणारा परिणाम. यामुळे होणारे त्रास टाळण्यासाठी विविध उपाय केले जातात. ठोके फार मंद असतील तर त्यांची गती वाढवण्यासाठी संदेशजनित्र ऊर्फ पेस मेकर वापरतात, ही गोष्ट आता जुनी झाली. यात नवी सुधारणा अशी-हृदयाची डावी आणि उजवी बाजू वेगवेगळ्या वेळी स्पंदन पावू लागली तर असमतोल निर्माण होऊन रुग्णाला दम लागू शकतो. अशा रुग्णांच्या हृदयाच्या दोन्ही बाजूंना एकाच वेळी विद्युत चेतना देऊन हा समतोल साधला जातो, याला ‘बायव्हेंट्रिक्युलर पेसिंग’ म्हणतात.
यामुळे हृदयाची आकुंचन क्षमता बरीच सुधारते. अतिजलद स्वरूपाची अनियमितता हा अत्यंत गंभीर प्रकार असून त्याचे उपचार त्वरित न झाल्यास जिवाला धोका होऊ शकतो. ज्या रुग्णांमध्ये हा धोका असतो त्यांच्या त्वचेखाली ‘आयसीडी’ नामक उपकरण बसवतात. त्यातून निघालेल्या वाहक तारा थेट हृदयापर्यंत जातात. स्पंदन अतिजलद झाल्यास त्याची सूचना क्षणार्धात् उपकरणाला मिळते आणि हृदयाला विद्युत धक्का देऊन पूर्व स्थितीला आणून जीवदान देता येते.
वैद्यकाच्या हृदयरोग शाखेला इतके ग्लॅमर का, या प्रश्नाचे उत्तर देते आजच्या हृदयोपचारांची ही छोटीशी झलक! गेल्या काही वर्षांतली ही घोडदौड पाहून कौतुकयुक्त आश्चर्य वाटते, पण त्याहून जास्त आश्चर्य वाटते आपल्या मानसिकतेचे -जी आपल्याला व्यसने, व्यायामाचा आळस, अपुरी झोप, चुकीचे खाणे, असे अत्यंत निष्काळजी वर्तन करायला लावते आणि हृदयरोगाकडे घेऊन जाते.
drlilyjoshi@gmail.com
या लेखासाठी विशेष साहाय्य :
डॉ. नितीन पत्की प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ, जोशी हॉस्पिटल, पुणे दूरध्वनी- ४१०९६७११ भ्रमणध्वनी : ९३२५३१५९९०८)

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा