आज ‘धनश्री गृहउद्योगा’चे महाराष्ट्रीय नाश्त्याचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ, भाताचे, आमटीचे प्रकार, भाज्या, खिरी, लहान बाळांसाठी खाद्यप्रकार अशी सुमारे पन्नास उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. इन्स्टंट आमटी, झुणका, पिठले आदी पदार्थामुळे झटपट आणि ईझी टू कुकचा फंडा मराठी घरातही वाढवला त्या भारती वैद्य यांच्या उद्योगाची ही भरारी निश्चितच स्फूर्तिदायी.

एखाद्या मोठय़ा चांगल्या वाढलेल्या झाडाला अचानक उपटून दुसरीकडे रुजवायचा प्रयत्न केला तर? नवीन वातावरणाशी, नवीन मातीशी जुळवून घेताना झाडाची किती दमछाक होईल नाही का? तसाच काहीसा अनुभव भारती वैद्य यांनाही आला होता. अंकलेश्वर इथे त्यांचे पती राजा वैद्य यांचा व्यवसाय, दोन शाळकरी मुली असं सगळं सुरळीत असताना अचानक राजा वैद्य यांची तब्येत बिघडली आणि कायमचं मुंबईला येऊन राहणं भाग पडलं. मुलींसाठी ठाण्याच्या शाळेत प्रवेश घेतला आणि सगळं सामानसुमान घेऊन भारतीताईंनी ठाण्यात आपला मुक्काम हलवला. सुमारे अठरा र्वष अंकलेश्वरमध्ये राहिल्यावर इथे जुळवून घेणं त्रासदायक होतं, पण मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्या मदतीमुळे ते जमायला लागलं. इथे राहून काही कमाई नसताना घरखर्च, आजारपणाचा खर्च यांची हातमिळवणी करणं कठीणच होतं.
मग भारतीताईंनी वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी नोकरी शोधली. सामाजिक सेवाक्षेत्रातली ही नोकरी घराला हातभार लावत असली तरी त्यापायी मुलींची हेळसांड त्यांना पाहावत नव्हती. व्यवसायातल्या अनिश्चिततेची त्यांना सवय होती त्यामुळे घरातूनच काम करत स्वयंपाकासंबंधी व्यवसाय करण्याचं त्यांनी ठरवलं. मात्र मोठय़ा प्रमाणात जेवण पुरवणं त्यांना शक्य नव्हतं म्हणून त्यांनी पंचामृती खिरीची पावडर बनवून विकून पाहायचं ठरवलं. एका डायटिशियनने शिकवलेली, स्त्रियांसाठी आरोग्यदायी अशी ही खीर रोज साग्रसंगीत करणे सगळ्याच बायकांना शक्य नाही त्यामुळे त्याची चटकन बनवता येणारी पावडर त्यांनी तयार केली. हे पहिलं उत्पादन सगळ्यांनाच खूप आवडलं. त्यानंतर चकली भाजणी, झटपट लाडू, उपमा, शिरा अशी काही उत्पादने त्यांनी विकसित केली. पंधरा वर्षांपूर्वी असे पटकन बनणारे खाद्यपदार्थ मिळणं कठीण होतं. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांना मागणी वाढली. ही उत्पादने दादरला गोडबोले यांच्या दुकानात आणि ठाण्यातही मोजक्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवली. लोकांचे श्रम कमी करणारी, पटकन पोटभरीचा पण आरोग्यदायी खाऊ बनवता येणारी ही उत्पादने लोकांना आवडली नसती तरच नवल.
‘आपण विकत इडली, डोसा, सामोसे, वडे आणतो, पण कधी कांदेपोहे आणतो का? ‘महाराष्ट्राचे पदार्थ नाही असे कुठे विकत मिळत’ अशा अर्थाच्या एका नाटकातील संवादामुळे आपण या पटकन बनणाऱ्या पदार्थाच्या यादीत महाराष्ट्रीय पदार्थ आणावे असं त्यांना वाटायला लागलं. मग त्यांनी अनेक प्रयोग करून इन्स्टंट आमटी, झुणका, पिठले आदी तयार केले. मोठय़ा प्रमाणात उत्पादन, मार्केटिंग जमेल की नाही अशी भीती भारतीताईंना सुरुवातीला होती, पण जयंतराव परचुरे यांनी ‘तुम्ही उत्पादन सुरू करा, पुढचं सगळं आपोआप जमतं’ असं म्हणत हिंमत दिली आणि भारतीताईंनी आपला व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. आज ‘धनश्री गृहउद्योगा’ची महाराष्ट्रीय नाश्त्याचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ, भाताचे, आमटीचे प्रकार, भाज्या, खिरी, लहान बाळांसाठी खाद्यप्रकार अशी सुमारे पन्नास उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत.
लोकांपर्यंत ही उत्पादनं थेट पोहोचवण्यासाठी भारतीताईंनी ग्राहकपेठ प्रदर्शनाचा आधार घेतला. ग्राहकांकडून मौखिक जाहिरात होऊन झटपट बनणाऱ्या या उत्पादनांची मागणी होऊ लागली. सुरुवातीच्या काळात पंधरा पंधरा किलोचं सामान पाठीवरून घेऊन जाऊन दादरला दुकानात पोहोचवायचं, तिथे नवीन मालाची ऑर्डर नोंदवून घ्यायची. परत कच्चा माल घेऊन यायचं आणि रात्र रात्र जागून उत्पादन तयार करायचं असं कठीण काम होतं. जरा जम बसल्यावर स्वयंपाकघरात मदतीला दोन-तीन स्त्रिया घेतल्या. आता सुमारे अकरा स्त्रिया त्यांच्याकडे कामाला आहेत.
२००० मध्ये सुरू केलेल्या ‘धनश्री गृहउद्योग’ या व्यवसायाने २००५ पर्यंत चांगलं बाळसं धरलं होतं. त्याकाळात राजा वैद्यही बरोबरीने या व्यवसायात उतरले. त्यामुळे व्यवसायाचा व्याप वाढवून राहत्या घरातून नव्या घरात नेला. ‘‘एकदा दुकानात पदार्थ पोहोचवायला गेले असताना ‘सहकार भांडार’चे विनायक आध्ये यांनी विचारणा केली आणि ‘धनश्री गृहउद्योग’चा सहकार भांडारच्या दुकानांमध्ये प्रवेश झाला. अशा मोठय़ा दुकानात सामान ठेवायचं तर त्यांच्या तांत्रिक बाबी बऱ्याच सांभाळाव्या लागतात. उत्पादनाला बारकोड, बॅच, छापील एक्पायरी डेट इत्यादी असणं जरुरी असतं. त्या सगळ्या गोष्टी करत ‘धनश्री गृहउद्योग’ची पाकिटं सहकार भांडार (आताच्या रिलायन्सच्या) दुकानात विक्रीस उपलब्ध झाली. हळूहळू बिग बझार, स्टार बझार या मॉल्समध्येही धनश्री गृहउद्योगची उत्पादने पोहोचली. परदेशात, बाहेरगावी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, नोकरदारांसाठी आणि नोकरीच्या धकाधकीत अजिबात वेळ नसणाऱ्या स्त्रियांसाठीही त्यांची उत्पादने सोपा, पटकन बनणारा पण आरोग्यदायी पर्याय उपलब्ध करून देतात.
या ‘ईझी टू कुक- क्विक टू सव्र्ह’ असणाऱ्या पण तीन-चार महिने टिकणाऱ्या पदार्थात प्रिझर्वेटिव किंवा रंग न घालण्याबद्दल व पदार्थ चांगले आणि आरोग्यदायी असण्याबद्दल भारतीताई खूप आग्रही असतात. पदार्थ बनवताना त्यात पाणी किंवा बाष्प जाणार, राहणार नाही याची काळजी घेतली, पदार्थ बनवण्यासाठी कच्चा माल चांगल्या प्रतीचा वापरला तर तयार होणारा पदार्थ खराब होण्याची शक्यता अगदी कमी होते. त्यानंतर तो पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगल्या प्रतीचे, फूडग्रेड प्लास्टिक आणि अॅल्युमिनियम फॉइल असलेले पाकीट वापरले आणि आत हवा जाणार नाही अशा रीतीने ते बंद केले तर पदार्थ चांगला टिकतो. या सगळ्या गोष्टी हळूहळू शिकत त्यांनी आत्मसात केल्या आहेत. त्यांच्याकडे काम करणाऱ्या बहुतेक स्त्रिया गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याबरोबर आहेत. त्या स्त्रियांनाही पदार्थ बनवताना घ्यायची काळजी, स्वच्छता, पाकीट भरताना घ्यायची काळजी यांची व्यवस्थित माहिती आहे आणि त्या तितक्याच आत्मीयतेने सगळं काम करतात. ‘धनश्री गृहउद्योग’मध्ये काम करणारे हे सगळेच एका कुटुंबाप्रमाणे असून व्यवसाय वाढवण्यासाठी झटत असतात.
२०१०मध्ये ‘धनश्री गृहउद्योग’चा कारभार व्यवस्थित सुरू असताना त्यांच्या पतीच्या अचानक जाण्याने भारतीताईंचं व्यवसायातील लक्ष थोडं कमी झालं. मात्र त्यानंतर अदिती लेले, विदुला आमडेकर या त्यांच्या मुली आणि गेल्या वर्षभरापासून अदितीची मैत्रीण मानसी जोशी यांनी ‘धनश्री गृहउद्योग’च्या कामकाजात लक्ष घालायला सुरुवात केली. तरुण रक्त व्यवसायात उतरल्यामुळे धडाडीचं मार्केटिंग, नवनवीन क्षेत्रं अजमावणं सुरू झालं. खाद्यपदार्थाबद्दलचे बदलते सरकारी नियम समजावून घेणं, वजनमाप नोंदणी, कच्च्या बाजारमालाचे सतत चढ-उतरणारे भाव यावर नजर ठेवून त्यानुसार पुढचं प्लानिंग करून दरनिश्चिती करणं या सगळ्या कामात जास्त शिस्त आली. पदार्थ बनवण्याचं कामही दोन पाळ्यांमध्ये सुरू केले. बाहेरच्या मीटिंग आणि सप्लाय वगैरे आता मुली बघतात मात्र उत्पादनामध्ये अजूनही भारतीताई जातीने लक्ष घालतात.
‘धनश्री गृहउद्योग’च्या भरभराटीमुळे दूरचित्रवाहिन्यांवर अनेक वेळा भारतीताईंची मुलाखत झाली आहे. काही पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. पण त्यांच्या ग्राहकांकडून मिळणारी पसंतीची पावती त्यांच्यासाठी सर्वाधिक समाधान देणारी असते. आता पुढचं पाऊल म्हणजे उत्पादनांची ऑनलाइन विक्री करायची आहे. शिवाय सध्या ग्राहक परदेशात ही उत्पादने घेऊन जातात, तिथे मोठय़ा प्रमाणावर निर्यात करण्याचाही त्यांचा मनसुबा आहे. अर्थात त्यासाठी विविध देशांच्या कठीण आणि जाचक नियमांत हे खाद्यपदार्थ बसवावे लागतील त्याचीही त्यांची तयारी सुरू आहे.
हा व्यवसाय सुरू असतानाही समाजसेवाव्रती भारतीताई आणि पती राज वैद्य यांनी नाना पालकर स्मृती समितीची ठाणे शाखा सुरू करून त्याद्वारे विविध समाजोपयोगी कामे हातात घेतली होती. आता या संस्थेमार्फत उपाध्यक्ष या नात्याने भारतीताई वृद्धांसाठी सशुल्क डे केअर सव्हिस उपलब्ध करून देत आहेत.
आज आपल्या पूर्वीच्या दिवसांबद्दल भारतीताई अगदी सहजतेनं म्हणतात की, ‘‘तेव्हा परिस्थिती खडतर होती तेव्हाचे ते प्रश्न आणि त्रास खूप मोठे वाटत होते. मात्र आज इतक्या वर्षांनी त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडल्यावर त्या वेळी आपण केलं ते काही फार वेगळं नव्हतं. कुणीही स्वत:चं घर सावरायला प्रयत्न करतच.’’ मात्र त्याच वेळी किती जणी अशा कठीण परिस्थितीशी झगडून व्यवसायाचा इतका मोठा व्याप उभा करू शकतात असा विचार मनात येतो आणि तिथेच भारतीताईंचं वेगळेपण दिसून येतं.

Obesity kid
सिडेंटरी लाईफस्टाईल, आऊटिंग, टेस्ट बड्स, स्क्रीन टाईममुळे मुलांचा स्थुलपणा वाढतो? पण म्हणजे काय?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
Can Heart Attack Be Prevented by Aspirin
हृदयविकाराच्या झटक्याचा धोका ऍस्पिरिनची गोळी कमी करते का? तज्ज्ञांचं स्पष्ट उत्तर, “उच्च रक्तदाब, साखर, कोलेस्टेरॉल..”

 

करिअरचा मूलमंत्र
‘कठोर परिश्रमाला पर्याय नाही’
व्यवसायात येणाऱ्या मुलींसाठी सल्ला – ‘व्यवसायात येताना तीन गोष्टी महत्त्वाच्या
* परिश्रम करायची तयारी ठेवा,
* उत्तम प्रतीचा कच्चा माल वापरण्याबाबत आग्रही राहा,
* सरकारी नियमांचे काटेकोर पालन करा.’

भारती वैद्य, ठाणे
धनश्री गृहउद्योग, ठाणे
http://www.facebook.com/dhanashreereadytocook
dhanashreegr@gmail.com
swapnalim@gmail.com