वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दंतवैद्यक शाखेत मिळालेला प्रवेश नाकारत कविता बिडवे यांनी कृषी क्षेत्राचा अभ्यास केला. सरकारी कारभाराला जिद्दीनं तोंड देत कृषिसेवा केंद्राचा परवाना मिळवून ते यशस्वी तर केलंच, परंतु शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कृषी मॉल आणि प्रयोगशाळा उभारली. शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणाऱ्या या उद्योगिनीच्या प्रयोगांविषयी.

आजकालच्या दुष्काळी परिस्थितीत, बेभरवशाच्या हवामानात, शेतीबद्दल अनेक उलटसुलट मतं ऐकायला येत असतात. असे असतानाही एखाद्या मुलीनं जिद्दीनं शेतीविषयक क्षेत्रात शिक्षण घेऊन, आपल्या शिक्षणाचा वापर करत यशस्वी उद्योग उभा करणं आणि आपल्या वडिलांचं स्वप्न साकार करणं हे जितके कौतुकास्पद तितकंच विरळाही म्हणावं लागेल.
कविता बिडवे यांचे वडील शेतकरी आणि आई नगरपालिकेत नोकरीला. त्यामुळे घरात शेतीविषयक आणि शैक्षणिक अशा दोन्ही प्रकारचं वातावरण होतं. साहजिकच कविता यांच्या शिक्षणालाही घरातून पाठिंबा होता. विज्ञान शाखेतून बारावी झाल्यावर दंतवैद्यक शाखेत त्यांना प्रवेश मिळत होता. पण वडिलांची इच्छा होती की आपल्या लेकीनं कृषी विज्ञान क्षेत्रात पदवी (बी.एस्सी. अ‍ॅग्रीकल्चर) घेऊन एक कृषी सेवा केंद्र सुरू करावं. कविता यांनी वडिलांच्या इच्छेनुसार अकोला येथील शासकीय कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. अकोला दूर असल्यानं दोन वर्षे तिथे शिकून मग पुणे विद्यापीठात बदली घेतली आणि उरलेली दोन वर्षे तिथे पूर्ण केली. दुर्दैवानं त्याच दरम्यान त्यांच्या वडिलांचा आकस्मिक मृत्यू झाला. पण आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करायचीच असं ठरवून त्यांनी कृषी सेवा केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली.
कृषी सेवा केंद्र स्थापन करायचं तर जिल्हा परिषदेकडून परवाना लागतो व कृषी विज्ञान पदवी असेल तरच तो मिळतो. जिल्हा परिषदेच्या कचेरीत अर्ज करताना एक मुलगी या क्षेत्रात वळतेय हेच परवाना देणाऱ्या लोकांना पटत नव्हतं आणि या क्षेत्रातली पदवीधर असूनही मुलगी म्हणून परवाना नाकारला जाणं हे जिद्दी कविता यांना पटत नव्हतं. रोजचे हेलपाटे, कटकटी अति झाल्या तेव्हा एकदा त्यांच्या आईनं त्यांना कृषी सेवा केंद्राचा नाद सोडून देण्याविषयीही सुचवलं. पण एकदा निर्णय झाल्यावर माघार नाही, असं म्हणत ठाम राहून शेवटी कविता यांनी परवाना मिळवला. २००६ मध्ये स्वत:च्या जमिनीवरच वडिलांना हवं होतं तसं कृषी सेवा केंद्र सुरू झालं. केंद्र सुरू झालं, पण लोकांचा विश्वास बसून ते केंद्रात तर यायला हवेत. ही नुकतीच शिकून आलेली तरुण मुलगी, हिला शेतीतलं काय कळणार असा विचार करून सुरुवातीला लोकांनी फारसा प्रतिसाद दिलाच नाही. पण मग कविता यांनी फिल्ड व्हिजिट सुरू केल्या. शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेत उपाययोजना सुचवणं, पिकाला रोग असल्यास त्याची माहिती देऊन फवारण्या सुचवणं, कुठली खतं घालायची, किती पाणी द्यायचं याची शेतावर जाऊन माहिती द्यायला सुरुवात केली. हळूहळू आसपासच्या शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसायला लागला आणि शेतकरी स्वत:हून केंद्रात यायला लागले.
२००९ मध्ये तालुक्याच्या ठिकाणी, राहुरीला दुसरं कृषी सेवा केंद्रही कविता यांनी सुरू केलं. त्यानंतर वर्षभरातच कविता यांचं लग्न झालं, ते एका शेतकरी नसलेल्या कुटुंबात. त्यांचे पती प्रवीण जाधव नोकरदार आहेत. पण सासरही त्याच गावात असल्यामुळे कविता यांच्या व्यवसायाबद्दल सासरच्यांना आधीपासून माहिती होती आणि त्यामुळेच व्यवसाय सुरू ठेवण्यात कसलीच आडकाठी आणली नाही. लग्नानंतरही व्यवसाय सुरू राहिला, इतकंच नाही तर भरभराटीला आला.
हळूहळू व्यवसाय वाढवायची कल्पना कविता यांच्या डोक्यात आकार घ्यायला लागली. शेतकरीही बियाणं, औषधं विकत घेताना, रोपटी तयार करायचे. ट्रे, कोकोपिट, फवारायचे स्प्रे अशा वस्तूंची विचारणा करायचे. या वस्तूही आपण विकायला हव्यात असं कविता यांना वाटायला लागलं. शहरातल्या मॉलमध्ये जशा एकाच ठिकाणी अनेक उपयोगी वस्तू मिळतात तसाच कृषीविषयक मॉल सुरू करण्याच्या दृष्टीने कविता यांची पावले पडू लागली. त्याचवेळी त्यांना जाणवलं की लोकांना पीक, खत याबद्दल सुचवायचं तर वरवर अभ्यास करून सुचवण्यापेक्षा माती आणि पाणी यांची चाचणी घेऊन जास्त चांगल्या प्रकारे सल्ला देता येतो. अशा चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा (लॅब) फार दूर होत्या. त्यामुळे कृषी मॉलमध्येच ही सोयही ठेवायला हवी. एकदा कविता यांच्या डोक्यात हा विषय आला म्हटल्यावर तो त्या पूर्ण करणार ही काळ्या दगडावरची रेघ. आपले अकोल्यातले शिक्षक देशमुख सर, राहुरी विद्यापीठातले दुर्गुडे सर आणि कडलक सर यांच्याशी या विषयावर चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेतलं. या प्रयोगशाळा खर्चीक असल्यामुळे बहुतांशपणे सरकारीच असतात. त्यामुळे प्रयोगशाळेचा लोक वापर करतील का, व्यवसाय म्हणून हा व्यवहार फायदेशीर ठरेल का असा चहुबाजूने विचार करून मॉलमध्ये प्रयोगशाळाही उभारायचं नक्की झालं. कर्ज मिळवण्यासाठी बँकेत अर्ज केला आणि अनेक प्रश्न उपस्थित करत कर्ज नामंजूर होऊन पहिला फटका बसला. योगायोगाने देना बँकेतले अधिकारी पठारे कृषीक्षेत्राशी निगडित होते. त्यांना या प्रयोगशाळेचं महत्त्व कळल्यामुळे त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला मदत केली. नाबार्डचा ‘अ‍ॅग्री क्लिनिक’ कोर्स कविता यांनी आधीच पूर्ण केल्यामुळे प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवून आणि इतर अटी पूर्ण करून नाबार्डकडून प्रयोगशाळेसाठी सबसिडी मिळाली, तसेच बँकेकडून कर्जही मिळालं.
२०१२ मध्ये अ‍ॅग्री मॉल आणि त्याला संलग्न माती व पाणी यांच्या चाचण्या करणारी प्रयोगशाळा यांची सुरुवात झाली. एकाच छताखाली शेतकऱ्यांना लागणाऱ्या बहुतांश वस्तू मिळणारे हे ठिकाण शेतकऱ्यांना खूपच सोयीचं व्हायला लागलं. त्या शिकल्या तेव्हाच, तंत्रज्ञान आणि २०१२ मध्ये खरेदी केलेल्या अद्ययावत मशीन यात खूपच तफावत होती. त्यामुळे सुरुवातीला फार अडचणी आल्या. कविता यांना मुळातून सगळं शिकायला लागलं पण हार न मानता सगळ्यालाच त्या जिद्दीनं सामोरं गेल्या. आज चाचण्या करून त्यानुसार कुठली पिकं घ्यायची, किती खत/फवारणी करायची यांचे सल्ले त्या देतात. कधी कठीण प्रश्न आला की इंटरनेटची मदत घेऊन अधिक ज्ञानी व्यक्तीकडून माहिती शोधून शेतकऱ्यांना मदत करतात.
थोडंच पाणी पिकाला जास्तीत जास्त दिवस पुरवायचं तर पाण्याचं बाष्पीभवन कमी होईल अशी उपाययोजना करायची, अवेळी थंडीपावसाचा धोका टाळण्यासाठी काकडी, ढोबळी मिरची यासारखी पिकं पॉलीहाऊसमध्ये घ्यायची, खराब हवामानामुळे पसरलेला रोग कसा आटोक्यात आणायचा, नवीन पिकात खतपाणी, कोणत्या पिकांचा हंगाम कधी अशा अनेक गोष्टींमध्ये त्या सल्ला देतात. अशा वेगळ्या क्षेत्रात जिद्दीने उतरून व्यवसाय यशस्वी करण्याबद्दल आदर्श उद्योजक (नगर जिल्हा), आदर्श उद्योजक (बारामती जिल्हा), महाराष्ट्र उद्योगिनी (सकाळ) असे पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. आपला सल्ला ऐकून एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान कमी झालं किंवा पीक वाचलं हे ऐकण्याचं समाधान मात्र खूपच मोठ्ठं आहे असं कविता यांना वाटतं.
पूर्वी पाणी मुबलक त्यामुळे पारंपरिक शेतीत फारसा त्रास व्हायचा नाही, पण आता पाऊसपाणी कमी, कस कमी झालेली जमीन यामुळे कुठलीही लागवड करताना विचारपूर्वक करायला हवी असं त्यांना वाटतं. उदाहरण द्यायचं तर एखाद्या शेतकऱ्याकडे विहिरीतून दिवसाला दोनशेच लिटर पाण्याचा उपसा शक्य असेल तर त्याने लागवड करताना तो विचार करून दोनशे लिटर पाणी लागणारेच पीक लावायला हवं. पण हा इतका बारीकसारीक विचार आणि आकडेमोड अजून तरी केली जात नाहीये. मात्र नवीन पिढी शेती व्यवसायात उतरताना शेतीकडे एक उद्योग म्हणून बघते. त्यात कसा फायदा होईल, उद्योग कसा वाढेल असा नवा विचार घेऊन येणारी ही पिढी शेतीसाठी नक्कीच आशादायक आहे असं त्यांना वाटतं.
आणखी एक नवा विचार शेती व्यवसायात आणण्यासाठी कविता प्रयत्नशील आहेत. इतर उद्योग ज्या वस्तू बनवतात त्याची किंमतही स्वत:च ठरवतात, मग शेतीच्या व्यवसायात हे का होऊ नये असा त्यांचा रास्त प्रश्न आहे. शेतकऱ्याने आपले पीक पिकवले की त्याचा भावही त्यानेच ठरवायला हवा. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एखादी कंपनी स्थापन करायला हवी. अशी कंपनी स्थापन करायचं कविता यांचं स्वप्न आहे. हे साध्य करण्याचा प्रवास खडतर आहेच, पण करून दाखवायची जिद्द मात्र कविता यांच्याकडे नक्कीच आहे.

व्यवसायातील तत्त्व
ग्राहकांच्या विश्वासाचा मान राखत प्रामाणिकपणे सल्ला देणं खूप महत्त्वाचं आहे. केवळ विक्री वाढवण्यासाठी चुकीचा सल्ला देऊन शेतकऱ्यांचं नुकसान करायचं नाही.

सल्ला
कुठलाही व्यवसाय करताना नकारात्मक दृष्टिकोन ठेवू नका. अडचणी येणारच, पण प्रश्न आहेत म्हणून थांबून राहण्यापेक्षा त्यांची उत्तरं शोधा आणि अडचणींवर मात करा. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्राशी प्रामाणिक राहणे फार जरुरी आहे.

कविता जाधव (बिडवे), अहमदनगर</strong>
९८६०११८९८०
अ‍ॅग्रो सर्विस सेंटर
swapnalim@gmail.com